Pune News : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २८९ मिलिमीटर पाऊस पडला. तर अनेक धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणांत वेगाने पाण्याची पातळी वाढत आहे.
अनेक धरणे ७५ टक्क्यांहून अधिक भरल्याने नद्यांना पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात बहुतांश धरणे भरली :
कोकणात मागील चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. भात खाचरे भरून वाहू लागली असून ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेअंतर्गत असलेली आणि इतर अनेक धरणे ७५ टक्क्यांहून अधिक भरली आहेत. अजूनही या भागात पाण्याची आवक वेगाने सुरू आहे.
त्यामुळे भातसातून १७४७८ क्युसेक, सूर्या धरण (कवडास) ५१३७, वैतरणा (अप्पर) ३५२०, जगबुडी नदी (कोकण) ५४६, गडनदी (कोकण) ६८३, सातंडी नाला (कोकण) ४७२१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.\
मध्य महाराष्ट्रात धरणांतून विसर्गात वाढ :
घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणांत वेगाने आवक वाढत आहे. पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर अधिक आहे. पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांत वेगाने आवक वाढत असून जवळपास १९ धरणांतून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. तर चार धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे भीमा, मुठा, पवना, आरळा, कुकडी, मीना, नीरा, घोड, हंगा या नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे.
नाशिकमधील दारणातून ११५५९ क्युसेक, कडवा २४५८, हतनूर धरणातून ३४२८५, नांदूर मधमेश्वर (गोदावरी) १५७७५ क्युसेक, कृष्णा खोऱ्यातील धोम ७२७०, वारणा १३५३०, दूधगंगा १६००, राधानगरीतून ५७८४, कोयना २३००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नगरमधील भंडारदरा धरण (प्रवरानदी) ९२५२, निळवंडे धरण (प्रवरा नदी) ९४७५, देवठाण (आढळा नदी) २७७ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
विदर्भात काही धरणे भरली :
विदर्भात मागील दोन ते तीन दिवसांपासून अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतातून पाणी वाहत असून ओढे भरून वाहत आहेत. नागपूर विभागातील पेंच तोतलाडोह, इटियाडोह, शिरपूर, गोसी खुर्द, वर्धा, अमरावती विभागातील ऊर्ध्व वर्धा, बेंबळा, अरुणावती, काटेपूर्णा, वान, पेनटाकळी, खडकपूर्णा या धरणांत पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे. अनेक धरणांत ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. तर नागपूर विभागातील गोसी खुर्दतून (धरण) १,९०,४५४ क्युसेकने वैनगंगा नदीला, निम्न वर्धा धरणातून ४ हजार ६८१ क्युसेकने वर्धा नदीला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
मराठवाड्यातील धरणांना पावसाची प्रतीक्षा :
पावसाचे जवळपास दोन महिने होत आले आहे. तरीही मराठवाड्याच्या अनेक भागांत अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. जूनमध्ये काही प्रमाणात पाऊस झाल्याने धरणांत आवक सुरू झाली होती. परंतु जुलैमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने आवक मंदावली आहे. त्यामुळे जायकवाडी वगळता उर्वरित धरणांत अजूनही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही.
तर तेरणा, पैनगंगा, येलदरी अशा काही मोजक्याच धरणांतील पाणीसाठा हा ५० टक्क्यांहून अधिक झाला आहे. तर जायकवाडी धरणात नगर, नाशिकमधील धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडल्याने पाणीपातळी चांगलीच वाढली आहे.
त्यामुळे जायकवाडीत जवळपास ७८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहराचा व मराठवाड्यातील काही गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. परंतु अद्याप कोणत्याही धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला नाही.
विभागनिहाय धरणांतील उपलब्ध पाणीसाठा (टीएमसी)
विभाग --- धरणाची संख्या --- उपलब्ध पाणीसाठा -- टक्के
नागपूर -- ३८३ -- ९२.१० ---५६
अमरावती --- २६४ --७४.४० ---५५
छत्रपती संभाजीनगर --- ९२० --- १३६.१७ ---५३
नाशिक --- ५३७ -- १३२.४७ ---६३
पुणे --- ७२० ---४३३.४४---८०
कोकण -- १७३ --- ११०.३१ ---८४
घाटमाथ्यावर झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
ताम्हिणी २८०, दावडी २३३, शिरगाव १९४, कोयना नवजा १८८, लोणावळा १५१, वळवण १२६, आंबोणे १३७, डुंगरवाडी १५८, खांड ११३, भीरा १२०.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.