
Pune News: गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. शनिवारी (ता.२६) सकाळी ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २५० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. पश्चिम महाराष्ट्रातील चासकमान, वरसगाव, पवना, कासारसाई, मुळशी, राधानगरी, वारणा, दारणा, वालदेवी व वाकी अशा अनेक धरणांतील पाणीपातळीत वाढ होत असून हळूहळू विसर्गामध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस
पंधरा दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप दिली होती. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. परंतु मागील आठवड्यापासून पावसाने पुन्हा जोर धरण्यास सुरुवात केली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गनगरी, ठाणे, पालघर जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी-वाऱ्यांसह पाऊस सुरू असून, समुद्राच्या मोठ्या लाटा किनाऱ्यांवर धडकत आहे. हवामान विभागाने ४.८ मीटर उंचीच्या लाटांचा इशारा दिल्याने प्रशासनाकडून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील अनेक धरणातून विसर्ग
मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. इगतपुरी, नाशिक व दिंडोरी तालुक्यांतील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथे सर्वाधिक ९५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व पेठ या तालुक्यांमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. दारणा धरणातून सर्वाधिक ५,१९८ क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने, पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी हे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सांगलीतील शिराळा तालुक्यात पावसाने उघडीप दिली होती. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग ३२२० क्युसेकने वाढवून तो १० हजार २६० क्युसेक इतका केला आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत १३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे कोयना धरणासह पाच धरणांतून पाण्याचा विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटाने उचलून १६,५६५ क्युसेक विसर्ग सुरू कऱण्यात आला आहे. या धरणातच्या पायथा व दरवाज्यातून एकूण १८,६६५ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू केला.
विदर्भात पिकांना दिलासा
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून भंडारा वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. अकोला, अमरावती, वाशीम जिल्ह्यांत पावसाअभावी पिके सुकण्याच्या स्थितीत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने हा पाऊस पिकांसाठी संजीवनी ठरला आहे.
दरम्यान पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांत अनुक्रमे ७७ आणि ७९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. परिणामी गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम विदर्भात गेल्या २४ तासांपासून रिमझिम स्वरूपात पावसाची हजेरी लागलेली असून अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
मराठवाड्यात हलक्या सरी
मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळत असून शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. काही ठिकाणी अजूनही पाऊस नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस
घाटमाथ्यावर मुसळधार कोसळधारा
पुणे, नाशिक, सातारा भागात पावसाने पुन्हा जोर धरला
मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम सरी
या घाटमाथ्यावर झाला सर्वाधिक पाऊस (मिलिमीटरमध्ये)
ताम्हिणी २५०, दावडी २१९, शिरगाव २१५, लोणावळा १९५, ठाकूरवाडी १२५, वळवण १५१, वानगाव १२६, आंबोणे १२४, भिवपुरी १४०, डुगरवाडी १९२, कोयना नवजा १६६, कोयना पोपळी १३१, खोपोली १५७, खांड १६७, भिरा १२९, शिरोटा ७२, धारावी ६०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.