Rain Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : खेड, चिपळूणमध्ये दुकाने, घरांचे पावसामुळे मोठे नुकसान

Team Agrowon

Ratnagiri News : खेड, चिपळूणात गुरुवारी (ता. १६) सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने दुकाने, घरे यांसह निवासी संकुलांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच महाकाय वृक्ष कोसळल्यामुळे रात्री उशिरापर्यंत खेड-दापोली मार्ग ठप्प होता.

चिपळुणात घरांवर वृक्ष व फांद्या कोसळल्या तर अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे व कौले उडून नुकसान झाले. तीन तास परिसरातील वीजपुरवठा खंडित होता. गोठा कोसळून चार गुरे दगावली.

मागील आठवड्यात येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. चिपळूण तालुक्यातील रामपूर, कोळकेवाडी, कामथे, खेर्डी आणि पोफळ येथील सहा घरांचे सुमारे साडेतीन लाखाचे नुकसान झाले होते. त्यानंतर गुरुवारी पुन्हा संपूर्ण तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाचा सर्वाधिक फटका सावर्डे, दसपटी तसेच चिपळूण शहर परिसराला बसला. सावर्डे धनगरवाडी येथे वादळामुळे बबन बाबू बावदाने यांचा गोठा कोसळून चार जनावरे दगावली आहेत.

त्यांचे एकूण ५ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले तर सावर्डे बौद्धवाडी येथील योगेश सावंत यांच्या घरावर झाड कोसळून मोठे नुकसान झाले. अडरे येथील मनिषा मोहन बद्रिके यांच्या घरावर झाड कोसळून ३५ हजार रुपये, राजेंद्र धनगराज गिरी यांच्या घराचे २५ हजार रुपये, कापसाळ येथील अरुण तुकाराम केळसकर यांच्या घराचे पाच हजार पाचशे, कापरे येथील भार्गव केरू तामुंडकर यांच्या घराचे १३ हजार ५०० रुपये, कौंढरताम्हाणे येथील भिकाजी बाळ साळुंखे यांच्या घराचे १ लाख २० हजार रुपये, पालवण येथील प्रभाकर नानू भूवड यांच्या घराचे ५ हजार रुपये व रामचंद्र महादेव भुवड यांच्या घराचे १५ हजार रुपये, हडकणी येथील प्रदीप काशिनाथ आग्रे यांच्या घराचे ६ हजार ५०० रुपये असे घरांचे एकूण २ लाख ४५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

रामपूर येथील महेश गंगाराम सावर्डेकर यांच्या गोठ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. टेरव येथील चंद्रकांत बावदाने व रामचंद्र बावदाने यांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. प्रकाश कदम यांच्या बागेचेही वादळीवाऱ्याने मोठे नुकसान झाले. शहरातील गोवळकोट रोड येथील श्री देवी करंजेश्वरी कमानीजवळ झाड पडल्यामुळे विद्युतखांब कोसळला. बाजारपेठेतील स्वामी कॉप्लेक्सचे पत्रे उडून नुकसान झाले. पत्रे उडाले असताना दोघेजण त्यातून बालंबाल बचावले.

खेडमध्ये दुपारी झालेल्या पाऊस व वादळाने मोठे नुकसान केले आहे. खेड-दापोली मार्गावर खेड पंचायत समितीसमोर महाकाय वृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक सुमारे अर्ध्या तासाने पूर्ववत झाली. झाडांच्या फांद्या तुटून वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

या पावसामुळे आंबापिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे आंबा व्यवसायाचेही नुकसान झाले आहे. आंबा बागायतदारांसह आंबा काढणीचे काम करणाऱ्या मजुरांना फटका बसला. खेड तालुक्यात १० इमारती, २५ घरे, ७ गोठे आणि ५ दुकानांचे अंशतः नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT