Vietnam Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Maharudra Manganale : कष्टाळू आणि आनंदाने जगणारा व्हिएतनाम

Maharudr Mangnale

महारुद्र मंगनाळे

आज जो काही सुंदर व्हिएतनाम दिसतोय; त्यामागे तेथील स्त्री -पुरुषांचे अफाट कष्ट आहेत. अनेक शतके परकीय सत्तेच्या जोखडाखाली राहिलेल्या जनतेला हलाखीचे जीवन जगावे लागले. या देशाने ६०, ७० च्या दशकात महाभयानक युद्धाला तोंड द्यावे लागले.

अमेरिकेसारख्या बलाढ्य महाशक्तीने या चिमुकल्या देशावर आण्विक व रासायनिक अस्त्रयुक्त युद्ध लादले. या युद्धात व्हिएतनाममधली सगळी महत्त्वाची शहरं बेचिराख झाली. लाखो लोक मरण पावले. कित्येक जखमी झाले.

हजारो व्यंगयुक्त मुलं जन्मली. लोकांनी तुरुंगातील छळछावण्यांमध्ये भयंकर हालअपेष्टा भोगल्या. तरीही या देशाने राष्ट्रपिता हो-ची- मिन्ह यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी चिवट लढा दिला. गनिमी कावा वापरून बलाढ्य अमेरिकी सैन्याला सळो की पळो करून सोडले. शेवटी अमेरिकेला व्हिएतनाममधून माघार घ्यावी लागली.

या सगळ्या विध्वंसानंतर व्हिएतनामच्या समाजवादी शासनाने देशाची नव्याने उभारणी केली आहे. आजच्या व्हिएतनामकडे बघताना हा इतिहास नजरेसमोर ठेवला तरच अनेक बाबींचं आकलन नीट होतं.

व्हिएतनाम हे गरीब राष्ट्रांच्या यादीत आहे. केवळ शेती आणि उद्योगांवर देशाची प्रगती होणे शक्य नाही, हे लक्षात घेऊनच त्यांनी पर्यटनावर भर दिला आहे.

साहजिकच स्वच्छता आणि सुरक्षितता या दोन बाबी तिथे महत्त्वाच्या आहेत. केवळ भारतात फिरलेला माझ्यासारखा माणूस व्हिएतनाममधली स्वच्छता बघूनच अचंबित होतो.

व्हिएतनाममध्ये आपल्याला रस्त्यावर पोलिस दिसत नाहीत. पण तरीही कुठंच गडबड, गोंधळ, हाणामाऱ्या, भाडणं, कर्णकर्कश भोंगे दिसले नाहीत. रात्री-अपरात्री कधीही कुठेही फिरा. कुठेच भीतीचं वातावरण नाही. गैरवर्तन होण्याची, लुबाडले जाण्याची भीती नाही.

यामुळे सगळी शहरं पर्यटकांच्या गर्दीने ओसंडून वाहत असतात. जगभरातील पर्यटक इथं दिसतात. त्यातही एकेकट्या आलेल्या मुलींची संख्या लक्षणीय होती. हॉस्टेलवर राहणाऱ्या या मुली भाड्याची बाइक घेऊन एकट्याने बिनधास्त फिरत होत्या.

दणांग, होईयान, हूये, राजधानी हनोई या शहरांत तर व्हिएतनामी नागरिकांपेक्षा पर्यटकच जास्त दिसत होते. पर्यटकांच्या मनात विश्‍वासाची, सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात व्हिएतनामी नागरिक किती यशस्वी ठरले आहेत, याचाच हा पुरावा म्हणावा लागेल. याबाबतीत आपण व्हिएतनामच्या फारच मागे आहोत.

व्हिएतनाममध्ये चकचकीत रस्ते, उत्तम पायाभूत सुविधा यामुळे कुठेही फिरताना संपर्क तुटत नाही. मी तिथे उतरल्याबरोबर एका टपरीवजा हॉटेलात लोकल सीम कार्ड घेतलं होतं. माझ्या २५ दिवसांच्या प्रवासात हे कार्ड एकदाही बंद पडलं नाही. सगळीकडं उत्तम दर्जाचं नेटवर्क राहिलं.

आपल्या तुलनेत ही सेवा खूप स्वस्त आहे. तसेच एकूणच रस्ते, वीज, पाणीपुरवठ्याची कामे अतिशय दर्जेदार आहेत. अवाढव्य डोंगर फोडून बनविण्यात आलेले रस्ते बघून त्यांनी घेतलेल्या अफाट कष्टाची जाणीव आपल्याला होते.

व्हिएतनामी माणसांचं कामावर आणि आनंददायी जगण्यावर मनापासून प्रेम दिसतं. पाट्या टाकणं हा प्रकार तिथं दिसला नाही. शहरी भाग असो की ग्रामीण; कुठंही गप्पा मारत, टवाळक्या करीत माणसं बसलीत असं चित्र मला बघायला मिळालं नाही.

प्रत्येक जण आपापल्या कामात व्यग्र दिसला. प्रत्येकाला काम करून पैसे मिळवायचेत आणि आनंदी जगायचंय. यात पुरुषांपेक्षा स्त्रिया पुढे आहेत. बाइक मेकॅनिकपासून ते सलूनपर्यंत सगळीकडं स्त्रिया काम करताना दिसतात. बहुतेक स्त्रिया स्ट्रीट फूडच्या व्यवसायात आहेत.

काम करणं हा व्हिएतनामच्या संस्कृतीचा भाग असावा. अनेक शतकं अतिशय अस्थिर, त्रासाचं जगणं वाट्याला आलेलं असल्यामुळे त्यांनी सुखी, समाधानी जगणं अंगीकारलं असावं. मला खऱ्या अर्थानं इथं स्त्री-पुरुष समानता पाहायला मिळाली. स्त्रिया अगदी सहजतेनं, मोकळेपणानं, आत्मविश्‍वानं वावरतात. अनोळखी पुरुष समोर आला, तरी सहजपणे हॅलो म्हणून संवाद साधतात.

मांसाहार हेच व्हिएतनामी माणसांचं मुख्य अन्न आहे. सोबत नूडल्स, भात, हिरव्या कच्च्या भाज्या आणि पाव. (तिथं तिखट, तेलकट, मसालेदार अपवादानंच दिसतं.) भरपूर पौष्टिक असं हे खाद्य असतं. त्यामुळे व्हिएतनामी स्त्री-पुरुष आणि मुलंही सुदृढ प्रकृतीचे दिसतात.

त्यामुळं जास्तीत जास्त काम करीत असावेत. मोठ्या शहरांमध्ये कॉफी आणि ग्रामीण भागात चहा लोकप्रिय आहे. कॉफीचे खूप प्रकार आहेत. त्यात साखर नसतेच. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर खूप कमी आहे.

व्हिएतनाममध्ये बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. त्या स्वच्छ राहाव्यात यासाठी विशेष लक्ष दिलं जातं. अशा स्वच्छ नद्या आपल्याकडं अपवादानंही राहिलेल्या नाहीत. हे पाणी कालव्यांच्या, पाटाच्या माध्यमातून शेतीपर्यंत आणून सोडलेलं आहे. त्यामुळं पावसाचे खंड पडले तरी यांना चिंता नाही. मुख्य पीक भात हेच आहे.

भातशेतीत प्रत्यक्ष फिरून त्यांची लागवड, पाणी देण्याच्या पद्धती, मशागत बघितली. पीक हमखास हाती लागतेच. काही ठिकाणी वर्षांतून दोन वेळा, तर काही ठिकाणी तीन वेळा सुद्धा भात घेतला जातो. भात हे आहारातील मुख्य अन्न असल्यानं त्याला मागणी आहे.

भाताचे चांगले पैसे होतात. आम्ही जी माहिती घेतली त्यावरून तिथं बहुतांश शेतकऱ्यांकडं शेतीचे छोटे तुकडेच आहेत. दहा-वीस एकरांचा मालक वगैरे कोणी नाही. बरेचसे शेतकरी भाजीपालाही घेतात. बहुतेक लोक आपल्या परसबागेत गरजेपुरता भाजीपाला लावतात. काकडी आणि कोबी या दोन भाज्यांचा तिथल्या खाद्यपदार्थांत, जेवणात भरपूर वापर होतो.

इथल्या शेतकऱ्यांचं राहणीमान इतर व्यावसायिकांसारखंच आहे. जीन पॅंट, कोट, हॅट घालून शेतात काम करणारे शेतकरी जागोजाग दिसले. इथं केवळ शेतीवर अवलंबून असलेले पूर्णवेळ शेतकरी नाहीतच. प्रत्येक शेतकरी शेतीसोबत पर्यटनपूरक व्यवसाय करतोच.

तो शेतीत अडकलेला नसल्यानं शेतीबाह्य उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध आहेत. शेतकरी आत्महत्या हा विषय तिथं नाही. शेतीत पुरुषांपेक्षाही स्त्रिया अधिक काम करताना दिसल्या. कमरेला कोयता अडकवून बिनधास्तपणे रस्त्यावरून निघालेली स्त्री मला खऱ्या अर्थानं स्वतंत्र वाटली. ट्रॅक्टर, ट्रेलर चालविणाऱ्या स्त्रियाही मी पाहिल्या.

शेती उपयोगी अनेक छोटी छोटी यंत्रं तिथं शेतीत पाहायला मिळाली. शेती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून नसल्याने मोठी जोखीम नाही. शेतीमाल योग्य किमतीला विकला जाण्याची आणि त्यामुळं उत्पन्नाची खात्री आहे.

ग्रामीण भागातही पर्यटन व्यवसाय वाढलाय. अनेक पर्यटक खेड्यांत, गावांत राहण्याचा अनुभव घेण्यासाठी येतात. त्यांच्यासाठी गावागावांत पेइंगगेस्ट पद्धतीच्या सुविधा निर्माण झाल्यात. यात त्यांना चांगले पैसे मिळतात.

व्हिएतनाममध्ये जाणीवपूर्वक केल्या जात असलेल्या वृक्ष लागवडीचं आणि त्यांच्या संवर्धनाच्या कामाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शेकडो नव्हे तर हजारो एकरांवर विशिष्ट वृक्षांची नियोजनबद्ध लागवड सुरू आहे. वृक्षतोड झाली, की लगेच नव्यानं लागवड केली जाते. इथं पडीक जमिनी दिसतच नाहीत.

एकतर तिथं पिकं, भाजीपाला घेतला जातो. नाहीतर वृक्ष लागवड. या कामाकडं सरकारचं विशेष लक्ष असल्याचं जाणवतं. ठिकठिकाणी जंगलाची देखरेख करणारी माणसं दिसतात. या लाकडाला जगभर मोठी मागणी आहे. फर्निचरसाठी हे लाकूड वापरलं जातं. यातून सरकारला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं.

शहरांप्रमाणेच गावंही नीट वसलेली आहेत. शहरात असलेले चांगले रस्ते, वीज, पाणी, इंटरनेट या सुविधा खेड्यांतही आहेत. त्यामुळे शहरं आणि खेडं अशी काटेकोर विभागणी करता येत नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मर्यादित आहे. त्यामुळं लोक अनावश्यक प्रवास करीत नाहीत. आपल्या कामात गुंतून राहातात. बहुतेकांकडं दुचाकी आहेच. त्यावरच त्यांचा प्रवास होतो.

व्हिएतनाममध्ये पर्यटक म्हणून सरकारचं अस्तित्व जाणवलं नाही. लोकांनाही कोण सत्ताधारी आहेत, याच्याबद्दल फारशी उत्सुकता दिसली नाही. मंत्री, आमदार, खासदार, प्रशासनातील लोक यांचा जो बडेजावी दिखावा आपल्याकडं दिसतो; तो तिथं कुठंच आढळला नाही. सत्ता, संपत्ती, जात, धर्माचा जो माज आपल्याकडं पावलापावलांवर दिसतो;

तसा तो तिथं कुठंच जाणवला नाही. व्हिएतनाम हा आपल्यापेक्षा सर्वार्थाने वेगळा देश आहे. त्याच्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे. मात्र आपल्या सरकारचा आणि समाजाचा प्रवासच उलट्या दिशेने सुरू असल्याने त्याची चर्चा करण्यात अर्थ नाही.

व्हिएतनाममध्ये सर्वाधिक लोकसंख्या बौद्ध धर्मीयांची आहे. पण सार्वजनिक ठिकाणी कुठेच या वा इतर कोणत्याही धर्माचं अस्तित्व जाणवत नाही. कोण कुठल्या धर्माचा आहे, हे सहजपणे कळत नाही.

धर्माच्या नावावर कसल्या अस्मितांचं स्तोम नाही, की रस्त्यावरच्या डीजेयुक्त मिरवणुका नाहीत. बुद्धाचा शांततेचा संदेश मात्र व्हिएतनामी जनतेनं अमलात आणलाय. ‘जगा आणि जगू द्या’ असा संदेश देणारे अनेक जण आहेत पण तो संदेश आचरणात आणणारा देश म्हणून व्हिएतनामचं नाव आवर्जून घ्यावं लागेल.

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.) ९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT