Maharudra Manganale : शेतात कुत्र्यांसारखी दुसरी सोबत नाही...

शेतात कुत्र्यांसारखी दुसरी सोबत नाही. इतका सजगपणा, निष्ठा माणसांकडून अपेक्षित नाही. कुत्र्यांना खायला दिलं आणि थोडसं प्रेम दिलं की, ती एखाद्या अंगरक्षकाप्रमाणे आपल्या अवतीभोवती फिरत राहतात.
Indian Agriculture
Indian Agriculture Agrowon

महारूद्र मंगनाळे

शेतात कुत्र्यांसारखी (Importance Of Dogs In Agriculture) दुसरी सोबत नाही. इतका सजगपणा, निष्ठा माणसांकडून अपेक्षित नाही. कुत्र्यांना खायला दिलं आणि थोडसं प्रेम दिलं की, ती एखाद्या अंगरक्षकाप्रमाणे आपल्या अवतीभोवती फिरत राहतात. दूर असली तरी एका हाकेसरशी पळत येतात.

कधी झोपायचं आणि कधी जागायचं, ते त्यांना बरोबर कळतं. झोपेतही कान सावध असतात. कुठे वेगळा आवाज, हालचाल जाणवली तरी त्यांचं भुंकणं सुरू असतं. आपल्या सोबतीला कुत्रे आहेत, ही बाब तुम्हाला सुरक्षेबाबत निश्चिंत करते. (Latest Agriculture News)

मी शेतात रुद्रा हटला राहायला आल्यापासून कायम एक तरी कुत्रा सोबतीला असतोच. कधी साप चावून, कधी काळविटामुळे तर कधी पिसाळल्याने कुत्रा मरतो. त्याच्या मृत्यूचं दु:ख जवळच्या व्यक्तिच्या मृत्यूच्या दु:खापेक्षा कमी नसतं.

मृत्यूची अटळता स्विकारून नवीन पिल्लू घेऊन यावं लागतं. दोन वर्षांपूर्वी काळविटाचं शिंग रॉकीच्या गळ्यातील पट्ट्यात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. रॉकीने खूपच लळा लावला होता. त्याच काळात सेवालयातून हॅप्पी कुत्री आणली होती.

तिला रॉकीपासून सहा पिल्लं झाली. ती सगळीच वारली. त्यानंतर गावठी कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. त्यातून बरी झाल्यावर तिला सेवालयात सोडलं.

Indian Agriculture
Indie Dog : पशुपालक, शेतकरी का करतात पश्मी श्वानांचे संगोपन?

हॅप्पी असतानाच सेवालयातून कारवान जातीचं पिल्लू हटवर आणलं होतं. टायसन त्याचं नाव. आमच्याकडंच खाणं व निगा यामुळे वर्षाच्या आतच ते भीती वाटावी इतकं मोठं झालं. त्याला रस्त्यावर बघूनच लोक घाबरू लागले.

ते दुचाकी वाहनांचा पिच्छा करू लागल्याने दोघेजण पडले. प्रचंड उर्जा होती त्याच्यात. मी असलो की साखळी लावून डोंगरावर फिरायला न्यायचो. मी नसलो की त्याला फिरवता येईना. नरेशला वेळ देता येईना.

रस्त्यावरून जाताना एखाद्याला चावले तर कसं? अशी भीती वाटू लागली. शेवटी विचारपूर्वक त्याला सेवालयात परत दिलं. तिथं गेल्यावर आक्रमक टायसन संपला.

त्यानंतर लातूरहून विजय स्वामी यांच्या घरातून बगिरा आणला. गावरान पिल्लू जेमतेम दीड महिन्याचं. आमच्याकडं दुध, ताक कायम असल्याने कुत्र्याची चंगळ असते. वर्षभरात बगिरा मस्त बनला. तो शांत, गरीब वाटतो पण नवख्यांना एकट्याने गेटच्या आत प्रवेश करू देत नाही.

भुंकत आक्रमकपणे अंगावर जातो. त्यामुळं अनोळखी माणूस गेटमधून आत येऊ शकत नाही. त्याला खेळायला कंपनी नसल्याने, दररोज सकाळी दोन एक तास परिसरातील दोन कुत्र्यांबरोबर खेळून यायचा. त्याला एक सोबती हवा म्हणून लातूरहून श्याम बरूरे या मित्राकडून तीन महिन्यांपूर्वी डोडो आणला.

हा गावरान शिकारी कुत्रा. आता मस्त रूळलाय. बगिरा आणि डोडो दोघे तासनतास खेळत राहतात. बगिराकडून एक प्रकारचं प्रशिक्षणच त्याला मिळतंय. डोडोमुळे बगिराचं बाहेर जाणं बंद झालं. दोघेही कॅंपस सोडून जात नाही. या दोघांमुळे कधीच एकटेपणा जाणवत नाही.

Indian Agriculture
Dog Bite : पिसाळलेले कुत्रे चावल्याने बारा गाईंचा मृत्यू

डोडोचा आवाज मोठा आहे. तो लगेच सावध करतो. दोघेही रस्त्यावर घाण करीत नाहीत. भरपूर पानांचा कचरा असलेल्या, आडबाजूला जाऊनच शी-शू करतात. खरं सांगायचं तर त्यांचा कसलाच त्रास नाही. रुद्रा हटवरच्या आमच्या जगण्याचे हे खरे सोबती आहेत.

सकाळी मी शेडमध्ये व्यायाम करण्यासाठी सतरंजी अंथरली. डोडो पलंगाखाली झोपला होता. मी कशासाठी तर बाहेर आलो. तेवढ्या वेळात तो सतरंजीवर येऊन झोपला.

मी परत येऊन फोटो काढला. मी जवळ आलो की लगेच उठून पलंगाखाली गेला. रुद्रा हटसमोर पायऱ्यावर किंवा शेडमध्ये दिवसभर दोघेही झोपलेले असतात. या दोन सुरक्षारक्षकांना ओलांडून घरात प्रवेश करणे कोणालाच शक्य नाही.

वर्षाला दीड- दोन लाख रूपये देऊनही जे काम नीट होऊ शकेल याची खात्री नव्हती; ते काम बगिरा आणि डोडो करताहेत. त्यांच्याकडून खोटेपणा, फसवणूक, दगाबाजीची अजिबात शक्यता नाही.

आज माणसांवर विश्वास ठेवणं मोठं कठीण आहे.चांगला वाटणारा माणूस कुठल्या क्षणाला वाईट बनेल याची काहीच खात्री देता येत नाही. माणूस कसा वागेल, कसा बदलेल याबाबत अंदाज करणं शक्य नाही. अशा काळात ही कुत्री आमच्यासाठी जिवलग आणि लाख मोलाची आहेत.

(लेखक लातूर येथील पत्रकार व शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com