Soil Science
Soil Science Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Science : मृदा विज्ञानासमोरील वाढती आव्हाने

Team Agrowon

सविता शिंदे

कोणत्याही पिकाची वाढ आणि त्यातून अन्नाची निर्मिती यासाठी माती (Soil) अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मातीमध्ये घडणाऱ्या प्रक्रिया समजून घेण्यासाठी सर्वांगीण अभ्यास करताना आंतरशाखीय दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता आहे.

बदलते वातावरण (Change Weather), जीवनशैली आणि वाढत्या लोकसंख्येच्या (growing population) पोषणाचा दबाव अशा नानाविध समस्यांमुळे मृदा विज्ञानासमोर (Soil Science) असंख्य आव्हाने तयार होत आहेत.

त्यातील लोकसंख्येच्या पोषणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या तीन बाबी...

१) जमिनीची विशेषतः सुपीक मातीची होणारी धूप, प्रदूषण यामुळे निर्माण होत असलेल्या वर्तमान आव्हानांचे मूल्यांकन करणे.

२) पाण्याची उपलब्धता सुनिश्‍चित करणे.

३) हवामान बदलामुळे वाढत चाललेला मातीतील कर्ब जपणे.

उपाय ः

१) मातीच्या समस्या लक्षात घेऊन प्रभावी मृदा संवर्धन धोरणे राबवणे.

२) नवीन संगणकीय तंत्रज्ञान, मॉडेल्स आणि प्रत्यक्ष मातीतील वेळीच केले जाणारे मोजमाप याद्वारे मातीतील प्रक्रियेसंदर्भात नवीन दृष्टी आणतील.

३) माती पुनर्वसनासाठी हरित तंत्रज्ञानाचा विकास

४) मातीतून होणारे कार्बन आणि नायट्रस ऑक्साइड (हरितगृह वायू) उत्सर्जन कमी करणे.

माती आणि मानवी आरोग्य संबंध ः

मातीचा संपूर्णच जिवावर विशेषतः मानवी आरोग्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव पडतो. कारण त्यांच्या अन्नाचा आणि पोषक तत्त्वाचा पुरवठा मातीद्वारे होतो.

प्रत्येक अन्नसाखळीच्या मुळाशी माती आहे. त्यातील अजैविक, सेंद्रिय संयुगे आणि सूक्ष्म जिवांपासून औषधे उपलब्ध होतात. तर मातीतील धातू/मेटलॉइड्स, सेंद्रिय रसायने, मातीचे रोगकारक घटक आणि रेडिओन्युक्लाइड्स यांचे अधिक प्रमाण मानवी आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकतात.

त्यामुळे शहरी, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रांमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रदूषण रोखण्याबाबत गंभीर राहिले पाहिजे. त्यासाठी नावीन्यपूर्ण आणि अधिकाधिक नैसर्गिक उपायांचा शोध घेतला पाहिजे. कोणताही दूषित घटक अन्नसाखळीमध्ये येणार नाही, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

मातीची जैवविविधता ः

माती ही पृथ्वीवरील सर्वांत वैविध्यपूर्ण अधिवासांपैकी एक आहे. एक ग्रॅम मातीमध्ये अब्जावधी पेशी, जिवाणू आणि बुरशींचे बीजाणू असू शकतात.

त्यातील अनेक पुढे अनेक अन्नसाखळीमध्ये, औषधांमध्ये महत्त्वाच्या ठरू शकतात.

जंगलातील आग/वणवे ः

जंगलातील वणव्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे मातीच्या अधिवासांची लवचिकता धोक्यात येत आहे. वणव्यांमुळे दरवर्षी एकूण जागतिक जमिनीच्या पृष्ठभागाच्या अंदाजे ४ टक्के भाग भाजून निघतो.

त्यातच आगीची वारंवारता, व्याप्ती आणि तीव्रता भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. या आगी कशा प्रकारे रोखायच्या यावर अधिक काम करण्याची आवश्यकता आहे.

मायक्रोप्लॅस्टिक :

जागतिक पातळीवर दरवर्षी ३५९ दशलक्ष टनांपेक्षा अधिक प्लॅस्टिक उत्पादन होते. त्यापैकी सुमारे ४० टक्के प्लॅस्टिक हे पॅकेजिंग आणि एकदाच वापरण्यासाठी असते.

सुमारे ५० टक्के प्लॅस्टिकचे सेवा आयुष्य १० मिनिटे ते ३० दिवस इतकेच मर्यादित असते. त्याचा कचरा पृथ्वीच्या पृष्ठभागावर, पाण्यामध्ये वाढत असून, सर्वांत मोठा पर्यावरणीय मुद्दा बनला आहे.

मातीमध्ये वाढणारे मायक्रो प्लॅस्टिक (५ मिमीपेक्षा लहान) या बाबीवर मृदा विज्ञानामध्ये अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. कारण संपूर्ण अन्नसाखळीमध्ये त्यांचा प्रवेश होत असून, अगदी मानवी रक्तातही मायक्रोप्लॅस्टिक सापडण्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे. यावरून त्याचे गांभीर्य आपल्या लक्षात येईल.

माती आणि पाणी परस्परसंवाद ः

माती, पाणी, ऊर्जा आणि अन्न यांच्यातील संबंध अलीकडेच संसाधन-व्यवस्थापन संकल्पना म्हणून विकसित झाला आहे. त्यामुळे त्यातील अनेक गुंतागुंती आणि वातावरण बदलांमुळे त्यावर पडणारा प्रभाव समजून घ्यावे लागेल.

मातीतील पाण्याच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण आणि अनुकरण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक मॉडेल्स विकसित केली आहेत. त्यातून वनस्पतींच्या मूळ प्रणालीसाठी उपलब्ध पाणी आणि पोषक तत्त्वांची उचल याबाबत अंतर्दृष्टी मिळू शकते.

वाढत्या पाणी वापरामुळे निर्माण होणारी क्षारता आणि दुष्काळी स्थितीमध्ये जलसंधारण यासाठी मातीच्या कणांचे, संरचनेचे व्यवस्थापन आवश्यक ठरणार आहे. हवामानातील विविध घटकांचे मातीच्या कणांवरील परिणाम जाणून घ्यावे लागतील.

सविता शिंदे, ८२७५५६३०४९, (सहायक प्राध्यापिका, के. के. वाघ कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नाशिक)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

Rice Export Ban : न्यायालयाने दिला तांदूळ निर्यातदारांच्या बाजूने निर्णय; केंद्र सरकारला सुनावले!

Mango Festival : कोल्हापूर, सांगलीत ‘आंबा महोत्सव’

SCROLL FOR NEXT