Palghar News : डहाणू तालुक्यात हिरव्या मिरचीच्या उत्पादनाला जोरदार सुरुवात झाली आहे. तरुणवर्गही आता मिरची उत्पादक बनला आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात अनेक शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली होती. सध्या डहाणूच्या बाजारात ताजी मिरची दाखल झाली आहे. सुरुवातीला ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव असलेली मिरची आता ५५ ते ६० रुपयांनी विकली जात आहे.
डहाणू तालुक्यात रब्बी हंगामातील प्रमुख नगदी पीक म्हणून मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. डहाणू, कासा आणि वाणगाव या तीन मंडळांत एकूण १०७१.३५ हेक्टर क्षेत्रावर मिरचीचे उत्पादन घेतले जाते.
त्यापैकी ७७२ हेक्टरवर तिखट मिरची, तर २९९.०५ हेक्टरवर ढोबळी मिरचीची लागवड होते. अल्प भूधारक शेतकरी ठिबक सिंचन आणि शेडनेट तंत्रज्ञानाचा अवलंब करून मिरचीचे उत्पादन घेत आहेत.
यंदा काही शेतकऱ्यांनी नियोजनपूर्वक मिरची लागवड केली. ग्रामीण भागातील तरुणही मिरची शेतीकडे आकर्षित झाले आहेत. कासा येथील नरेश गायकवाड आणि त्याच्या दोन मित्रांनी सात ते आठ एकर क्षेत्रात मिरची लागवड केली.
बाजारपेठेची मागणी
फेब्रुवारी-मार्च महिन्यात मिरचीच्या भावात वाढ होण्याचा अनुभव शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे अनेक भागांत अजूनही मिरची लागवड सुरू आहे. एप्रिल-मेपर्यंत हा हंगाम चालतो. तरुण मिरची उत्पादकांनी स्थानिक कृषी उत्पन्न बाजारपेठ स्थापन करण्याची मागणी केली आहे. जवळपास बाजारपेठ नसल्यामुळे योग्य हमीभाव मिळत नाही. बाजारपेठ असल्यास स्थानिक शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल आणि स्थलांतर टळेल, असे शेतकऱ्यांचे मत आहे.
स्थानिकांना रोजगार
शेतीतून उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने आम्ही तीन मित्र मिळून मिरची लागवड करण्याचा निर्णय घेतला. नाल्याच्या पाण्यावर मिरची उत्पादन घेतले आणि आता दिवसाला ८०० ते हजार किलो मिरची काढली जाते. सध्या चांगला भाव मिळत असल्याने उत्पन्नही चांगले आहे. यामुळे ३० ते ४० स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण कमी होईल, असे मत नरेश गायकवाड यांनी व्यक्त केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.