Nashik News : मॉन्सूनोत्तर पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला नाशिक विभागात द्राक्ष पिकाला दणका दिला. त्यामध्ये आगाप छाटण्यांमध्ये बागांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तर ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यांत पीक संरक्षण खर्च वाढता राहिला. त्यामध्ये पारंपरिक वाण व लांबट वाणांचे नुकसान अधिक असल्याचे दिसून येत आहे. द्राक्ष उत्पादनात २५ टक्क्यांपर्यंत यंदा घट शक्य असल्याचे चित्र आहे.
सप्टेंबरमध्ये छाटणी सुरू झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात पावसामुळे द्राक्ष उत्पादक पट्ट्याला मोठा तडाखा बसला. द्राक्षबागांमध्ये डाऊनी, करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला. तर घड कमी निघण्यासह ते कमकुवत निघाल्याचे दिसून आले. तर गोळी घड होऊन कोवळ्या फुटींचे नुकसान आहे. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात द्राक्ष उत्पादनात घट होण्याचे प्रमाण अधिक असेल.
पहिल्या टप्प्यात ५ ते २५ सप्टेंबर दरम्यान गोडी बहर छाटणी झालेल्या द्राक्ष बागांमध्ये गळकुज होऊन नुकसान २५ टक्क्यांपर्यंत होते. तर प्रामुख्याने छाटण्या २५ सप्टेंबर ते ऑक्टोबर अखेरपर्यंत ६५ टक्के छाटण्या झाल्या. त्यामध्ये सर्वाधिक फटका बसला. डाऊनी, घड जिरण्याची समस्या, करपा यांचा प्रादुर्भाव दिसून आल्याने १० टक्क्यांपर्यंत नुकसान तर पीक संरक्षण खर्चात १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
नुकसान टप्प्याटप्याने वाढत गेले
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला व अखेरीस दोन वेळेस पावसाने पुन्हा तडाखा दिला. त्यामध्ये द्राक्ष बागांचे नुकसान वाढले. पाऊस उघडल्यानंतर धुके व आर्द्रतेमुळे तयार होणाऱ्या, पाणी उतरण्याच्या अवस्थेतील बागेत द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची समस्या अधिक दिसून आली. चांदवड, दिंडोरी, निफाड व सिन्नर पट्ट्यात फटका बसला. अगोदरच माल कमी त्यात हे नुकसान टप्प्याटप्याने वाढत गेल्यामुळे मालाची उपलब्धता तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे, असे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी सांगितले.
नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. उत्पादनावर संभाव्य परिणाम असल्याने वाण बदल, क्रॉप कव्हर महत्त्वाचा पर्याय आहे. त्यासाठी अनुदान मिळावे म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ
निर्यातक्षम मालाची उपलब्धता टप्प्याटप्याने होण्याची चिन्हे आहेत. तसेच देशाअंतर्गत बाजारात लांबट व रंगीत वाणांची उपलब्धता कमी असल्याने दर टिकून राहतील. यंदा पुरवठा संतुलित राहणार असल्याने चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. उत्पादकांनी मालाची प्रतवारी ज्यामध्ये रंग, चव, साखर यांचे प्रमाण तपासूनच खुडे करावेत.अनंत मोरे, संचालक, फ्राटेली फ्रूट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.