सूर्यकांत नेटके
Experimental Agriculture : पारगाव सुद्रीक (जि. नगर) येथील संभाजी हिरवे यांनी काही वर्षांपूर्वी माळरानावर गावशिवारात सर्वप्रथम द्राक्ष लागवड केली. दूरदृष्टी, परिश्रम व व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रगती साधत द्राक्षासह विविध फळपिके, भाजीपाला व ऊस अशी जोखीम कमी करणारी व विविधता जपलेली पीक पद्धती तयार केली. शेतीतून मोठे वैभव उभे केले. त्यांच्या प्रयोगांची प्रेरणा घेत आज पारगाव सुद्रीकचा परिसर द्राक्षाचे आगार झाला आहे.
नगर जिल्ह्यात पारगाव सुद्रीक (ता. श्रीगोंदा) येथील मधुकर दगडू हिरवे यांची प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी अशी ओळख आहे. त्यांचे आजचे वय ८३ वर्षे आहे. आज ते शरीराने थकले असले, तरी कुटुंबाची सर्व ८५ एकर शेती चिरंजीव संभाजी पाहतात. मधुकरराव उमेदीत होते त्या वेळी वडिलोपार्जित ५० एकर क्षेत्र होते. हे सगळे माळरान होते. ते सुपीक व लागवडयोग्य करण्यासाठी त्यांनी अतीव मेहनत घेतली. त्या काळात जेसीबी यंत्र आणून ताशी दोन ते अडीच हजार रुपये वेतन देऊन जमिनीची सुधारणा केली.
बाहेरून गाळाची माती आणून शेतात वापरली. त्यांचे चिरंजीव संभाजी सांगतात, की आज आम्ही जी प्रगती केली आहे, त्याला कारणीभूत त्या वेळी वडिलांनी घेतलेले कष्ट आहेत. मधुकररावांनी १९७४ मध्ये तीस गुंठ्यांत ‘सिलेक्शन सेव्हन’ या वाणाच्या लागवडीतून द्राक्ष शेतीचा प्रारंभ केला. या भागात द्राक्ष शेती करणारे ते पहिले शेतकरी ठरले. त्यांना मिरजगाव (ता. कर्जत) येथील कै. जगन्नाथ म्हैत्रे यांनी मार्गदर्शन केले.
द्राक्ष शेतीतून झाला विकास
मधुकरराव यांनी दूरदृष्टीने टप्प्याटप्प्याने शेती खरेदी करण्यास सुरुवात केली. आज अशी ३५ एकर शेती आहे. एकूण जमिनीपैकी तीस एकरांवर द्राक्षे, साडेसहा एकरांवर तैवान पेरू, पाच एकर डाळिंब, दोन एकर पपई,
एक एकरावर भरताचे जांभळे वांगे आणि वीस एकरांवर ऊस आहे. कुटुंबाने पाण्याबाबत अत्यंत जागरूक राहून तेरा वर्षांपूर्वी अडीच एकरांत एक व सात वर्षांपूर्वी दीड एकरात एक अशी दोन मोठाली शेततळी घेतली. वेगवेगळ्या ठिकाणी सात विहिरी घेतल्या. सुमारे ३५ वर्षांपासून ठिबक सिंचनाचा वापर सुरू केला.
शेतीचे व्यवस्थापन
-तीस एकर द्राक्ष शेतीचे व्यवस्थापन करताना एकाचवेळी माल विक्रीस येण्याऐवजी वेगवेगळ्या टप्प्यात ती उपलब्ध व्हावीत यासाठी २५ सप्टेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत छाटणीचे नियोजन.
-माणिक चमन, सुपर सोनाका, अनुष्का आदी व्हाइट तर सरिता सीडलेस, जंबो या रंगीत द्राक्षांचे वाण.
-सन २००० पासून दहा वर्षे आखाती देशांत निर्यात. आता स्थानिक बाजारपेठेतच विक्री. एकरी १२ ते १५ टनांपर्यंत उत्पादन.
-पपईची फेब्रुवारी २०२३ मध्ये लागवड. नगर, पुणे येथे १० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे.
-बारा वर्षांपासून पाच एकरांवर डाळिंब होते. जुनी बाग काढून पाच एकरांवर नव्याने लागवड.
-दहा वर्षांपासून भरीताच्या वांग्याचे एक ते दोन एकरांवर उत्पादन. जुनी द्राक्ष बाग काढल्यानंतर त्याच जागी वांगी घेतल्याने आधीचा मांडव, ठिबक आदी साहित्य कामी आले. जून ते ऑक्टोबर हा हंगाम राहून एकरी २५ टनांपर्यंत उत्पादन. झाडे साडेसहा फुटांपर्यंत वाढतात. त्यात खालून रिकट घेतला आहे. पुन्हा फळांना सुरुवात झाली आहे. मुंबई बाजारात वांगी पाठवली जातात. त्यास २० ते २५ रुपये प्रति किलो दर मिळत आहे.
-फळपिकांमधील जोखीम कमी करण्यासाठी हंगामी सोयाबीन, कापूस आदींचीही लागवड.
-दररोज ६० मजूर कार्यरत. त्यांच्या राहण्याची व अन्य व्यवस्था. काही मजुरांनी पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ काम केल्याने फळशेतीतील बारकावे त्यांना ज्ञात झाले आहेत.
पशुपालन आणि शेणखत
-१२ दुभत्या गायी व लहान- मोठी मिळून सुमारे २५ जनावरे.
-मुक्त संचार गोठा. दररोज १०० ते १२५ लिटर दूधसंकलन. डेअरीला पुरवठा.
-वर्षाला ६० ते ६५ टन शेणखत मिळते.
-सर्व पिकांसाठी शेणखत, जिवामृत, स्लरी यांचा मुबलक वापर.
-दुग्ध व्यवसायातून शेतीला फायदा होतोच शिवाय पूरक उत्पन्नाची जोडही मिळाली आहे.
परिसरात तयार झाले द्राक्ष कल्चर
मधुकरराव यांनी द्राक्ष पिकातून प्रगती केली. त्यांच्याच प्रेरणेतून पारगाव सुद्रीकसह श्रीगोंदा, बेलवंडी, आढळगाव, लोणीसह परिसरातील पंधरा गावांत द्राक्ष क्षेत्र वाढत गेले. केवळ पारगाव सुद्रीक परिसरात सुमारे एक हजार एकर किंवा त्याहून अधिक द्राक्ष क्षेत्र असावे असे संभाजी म्हणतात. परिसरातील अनेक शेतकरी आज मधुकररावांचा सल्ला घेतात.
कुटुंबाच्या एकीतून प्रगती
शेतीला वैभव प्राप्त करून देण्यासाठी झटणारे संभाजी यांचे बंधू नाना यांचे तीन वर्षांपूर्वी अचानक निधन झाले. कुटुंबावर मोठा आघात झाला. मात्र दुःखातून सावरत कुटुंबाने शेतीतील प्रयोग सुरूच ठेवले आहेत. संभाजी सांगतात, की शेतीतूनच दोन चारचाकी, बंगला, दोन मोठी शेततळी, शेती खरेदी या बाबी
साध्य झाल्या. मुलांना उच्चशिक्षण देता आले. संभाजी यांना वडिलांसह आई भामाबाई, पत्नी सविता, मुलगा अभिषेक, भावजय निर्मला व शारदा यांची मदत व पाठबळ आहे. अभिषेक, भाग्यश्री, मयूरी, वृषाली, स्नेहल या नव्या पिढीने उच्चशिक्षण घेतले आहे. सार्थक आणि आदित्य शिक्षण घेत आहेत.
संभाजी हिरवे, ९५५२२२१०९७
१२) संभाजी हिरवे यांचा संयुक्त परिवार.
४) हिरवे यांनी द्राक्ष शेतीची परंपरा अनेक वर्षांपासून जपली आहे.
५ व ६- फळपिकांची जोखीम कमी करण्यासाठी पपई लागवड.
७- मुक्तसंचार पद्धतीचा गायींचा गोठा
८- संभाजी हिरवे
(छायाचित्रे ः सूर्यकांत नेटके)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.