Gladiolus Flower Agrowon
ॲग्रो विशेष

Floriculture : ग्लॅडिओलस लागवडीचे तंत्र

Flower Farming : ग्लॅडिओलसच्या योग्य आकाराच्या कंदाची लागवड नोव्हेंबरमध्ये करावी. पहिल्या लागवडीनंतर १५ दिवसांच्या अंतराने पुढील लागवड करावी. यामुळे बाजारपेठेच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने फुलदांड्यांची काढणी करता येते.

Team Agrowon

डॉ. युवराज खोब्रागडे, डॉ. डी. एम. पंचभाई

ग्लॅडिओलस हे कंदवर्गीय फुलपीक आहे. विविध रंगांची आकर्षक फुले फुलदांड्यावर जास्त काळ टिकून राहत असल्यामुळे बाजारात कटफ्लॉवर म्हणून चांगली मागणी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पीडीकेव्ही रोशनी, पीडीकेव्ही गोल्ड, पीडीकेव्ही सातपुडा पर्पल आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले गणेश, फुले तेजस, फुले नीलरेखा, फुले प्रेरणा या जाती विकसित केल्या आहेत. याचबरोबरीने अमेरिकन ब्यूटी, नजराणा, सपना, सुचिता, पूनम जाती आहेत.

१) लागवड जमिनीतून कंद काढल्याबरोबर लगेच करता येत नाही. कारण कंदातील सुप्तावस्थेमुळे कंदाची उगवण होत नाही. ही सुप्तावस्था मोडण्यासाठी कंदांना ५ ते ६ अंश सेल्सिअस तापमानात १५ ते २० दिवस ठेवावे लागते. १८ ते २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात वाढ खुंटते.

काही जातींना जास्त प्रकाशात फुलदांडे येतात. तर काहींना १२ तासापेक्षा कमी प्रकाशात फुले येतात. फुलांची उगवण ही प्रकाशाचा काळ १२ तासांपेक्षा कमी असताना होते. परंतु झाडांची उंची, फुलदांड्यांची टक्केवारी फुलदांड्यावरील फुलांची संख्या कमी होताना आढळली आहे.

२) लागवडीस उत्तम निचऱ्याची, सामू ६ ते ७ असणारी जमीन निवडावी. ग्लॅडिओलस कंदवर्गीय पीक असल्यामुळे योग्य वाढीसाठी शेणखताचा चांगला वापर करावा. प्रत्येक हंगामात मुख्य कंदापासून १० ते ५० कन्या कंद मिळतात.

३) योग्य आकाराच्या कंदाची लागवड नोव्हेंबरमध्ये करावी. पहिल्या लागवडीनंतर १५ दिवसांच्या अंतराने पुढील लागवड करावी. यामुळे फुलदांडे एकाच वेळेस काढण्यात येण्याऐवजी टप्प्याटप्प्याने बाजारात येतात. कंदाची लागवड करण्यापूर्वी थंड किंवा गरम पाण्यात कंदावरील आवरण काढून ५ ते ७ दिवस बुडवावे किंवा थायो युरिया १००० पीपीएम किंवा जिबरॅलिक अॅसिड १००-२५० पीपीएमची प्रक्रिया करून लागवड केल्यास लवकर उगवण होण्यास मदत होते.

४) चांगल्या वाढीसाठी प्रति हेक्टरी ३०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश द्यावे. अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. उर्वरित अर्धे नत्र दोन समान भागात विभागून लागवडीनंतर एक महिन्यानंतर आणि उर्वरित नत्र लागवडीनंतर दोन महिन्यांनंतर द्यावे. नत्रामुळे पाने आणि फुलदांड्यांची योग्य वाढ होते. स्फुरदामुळे फुलांच्या निर्मितीस मदत होते. पालाशमुळे पान आणि फुलदांड्यांचा काटकपणा वाढविण्यास मदत होते. रासायनिक खते कंदाच्या सरळ संपर्कात येणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

५) कंदाची लागवड ५ सेंमी ते ७.५ सेंमी खोलीवर करावी. कंदाची लागवड उथळ केल्यास कन्याकंदाची संख्या वाढते. खोल लागवड केल्यास चांगल्या प्रतीची आणि मोठ्या आकाराची फुले मिळतात. पसरट किंवा उंचवटा असलेल्या कंदाच्या लागवडीपासून चांगले परिणाम दिसतात. कंदाच्या खोल लागवडीमुळे फुलदांडा सरळ येण्यास मदत होते.

६) पीक तणविरहित ठेवण्यासाठी वेळोवेळी निंदणी करावी. फुलदांडे कोलमडू नये यासाठी आधार द्यावा. किंवा मातीची भर द्यावी.

फुलदांड्यांची काढणी ः

१) लागवड केल्यानंतर २ ते ३ महिन्यांनंतर जातिपरत्वे फुलदांडे येण्यास सुरुवात होते. फुलदांड्यांवरील खालील ५ ते ६ फुलांना रंग दिसणे सुरू झाल्यानंतर दोन ते तीन पानांसह संध्याकाळच्या दरम्यान काढणी करावी. यामुळे फुलदांडे टवटवीत राहतात. सकाळच्या

वेळेत फुलदांड्यांची काढणी करता येते, परंतु दवबिंदू असल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. दुपारी जास्त तापमानामुळे फुलदांड्यातील ओलावा कमी असल्यामुळे काढणी करू नये. फुलदांडे काढल्यानंतर लगेच बादलीतील पाण्यात ठेवावेत.

२) फुलदांड्यावरील फुलानुसार आणि लांबीनुसार १० फुलदांड्यांचा एक गुच्छ तयार करावा. फुलदांड्यांचा पाकळ्या एकमेकांना घासू नयेत यासाठी क्राफ्ट पेपर किंवा पॉलिथीन शीटमध्ये गुंडाळावे. बॉक्समध्ये पॅकिंग करता येते.

वर्गीकरण ः

ग्रेड ---फुलदांडयाची लांबी (सेंमी)--- फुलांची संख्या

फॅन्सी--- १०७ पेक्षा जास्त--- १६

स्पेशल ---९६ ते १०५--- १५

स्टॅंडर्ड ---८१ ते ९६---१२

युटिलिटी--- ८० पर्यंत--- १०

जातींची वैशिष्ट्ये ः

पीडीकेव्ही रोशनी ः

१) लांब दांडा, जास्त फुलांची संख्या.

२) फिक्कट जांभळ्या रंगाची फुले.

३) जास्त काळ टिकणारी फुलदांडी.

४) मर रोगास कमी बळी पडणारी जात.

पीडीकेव्ही गोल्ड ः

१) आकर्षक गुलाबी पिवळसर रंग.

२) जास्त फुलांची संख्या.

३) रोग, किडीस मध्यम प्रतिकारक.

पीडीकेव्ही सातपुडा पर्पल ः

१) फुलदांडा आणि कंदाचे अधिक उत्पादन

२) आकर्षक जांभळ्या पाकळ्या, त्यावर गडद निळसर जांभळ्या रंगाच्या पट्ट्या.

३) लांब सरळ फुलदांडा.फुलांची अधिक संख्या.

४) अधिक टिकवण क्षमता.

५) मर रोगास मध्यम प्रतिकारक.

संपर्क ः डॉ. युवराज खोब्रागडे, ९८५०४८९०१२

(सहयोगी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख (उद्यानविद्या), कृषी महाविद्यालय, सोनापूर, जि. गडचिरोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT