जिओपॅथिक स्ट्रेस झोन ः भाग ७
जिओपॅथिक स्ट्रेसमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची आपण भरपूर चर्चा केली. तो ज्या भूमिगत पाणी प्रवाह व अन्य कारणांमुळे तयार होतो, त्यांचा शोध घेण्याची साधने, यंत्रे पाहिली. आता हा प्रभाव कसा कमी करता येईल, यावर जगभरामध्ये मोठा अभ्यास झाला आहे. काही उपाययोजना तर व्यावसायिक पातळीवरही वापरल्या जाऊ लागल्या आहेत.
ताणरहित घरांच्या बांधकामांसोबतच रस्त्यांच्या, महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. या तंत्रज्ञानाला नावराज ऑटोनिएशन असे संबोधले जाते. अगदी शासकीय यंत्रणांकडूनही अधिकृतपणे याचा वापर होऊ लागला आहे. ‘पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे’ वर पथदर्शी प्रकल्प म्हणून या तंत्रज्ञानाचा वापर करून पाहण्यात आला. त्यानंतरच्या सात वर्षामध्ये अपघाताचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसत आहे.
जिओपॅथिक स्ट्रेस हा जमिनीतील वाहणारे पाणी आणि खडकाच्या घर्षणातून तयार होणारा विद्युत चुंबकीय भार क्षेत्र (इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड) असल्याचे आपण पाहिले आहे. आता हा जमिनीखालचा प्रवाह व त्याचे खडकाबरोबरचे घर्षण थांबवणे अवघड वा अशक्यच बाब आहे. म्हणजेच त्यातून तयार होणारे विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होण्याचे थांबवणे हेही अशक्य आहे. विज्ञानातील महत्त्वाच्या ऊर्जा अक्षयतेच्या सिद्धान्ताप्रमाणे ऊर्जा निर्माण करता येत नाही, वा ती नष्टही करता येत नाही. मात्र ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरित करता येते.
याच तत्त्वाचा वापर करून हे विद्युत चुंबकीय क्षेत्र वरील दिशेला जाण्यापासून अटकाव करता येईल किंवा या ऊर्जेचे रूपांतर अन्य ऊर्जेत करून किंवा जमिनीत विभागून निष्प्रभ करणे शक्य आहे. या तंत्रातून आपली खोली, घर, फ्लॅट, इमारत असो वा साधा रस्ता किंवा महामार्गावरील ‘जिओपॅथिक स्ट्रेस’चा प्रभाव शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून दहा वर्षांपूर्वी पुणे येथील प्रा. रविराज सोरटे यांनी प्रा.डाॅ. अविनाश खरात यांच्या मार्गदर्शनात संशोधन सुरू केले.
तीन वर्षांच्या संशोधनात नावराज ऑटोनिएशन तंत्र विकसित केले. त्याच्या अनेक ठिकाणी असंख्य चाचण्या घेतल्या. अन्य तज्ज्ञांकडून पडताळणी झाल्यानंतर तंत्राला मान्यता मिळाली. प्रा. रविराज सोरटे यांना डॉक्टरेट मिळाली. काही काळातच २०२४ मध्ये डॉ. सोरटे आणि सहकाऱ्यांना भारत सरकारचे दोन पेटंटही प्राप्त झाले आहेत.
जिओपॅथिक स्ट्रेसचा प्रभाव कसा कमी करतात?
डाउझिंगने निश्चित केलेल्या जिओपॅथिक स्ट्रेस झोनची जागेची नाव मीटरच्या साह्याने मोजमापे घेतली जातात. त्यातून त्या स्ट्रेस झोनची लांबी रुंदी निश्चित केली जाते. जमिनीखालून वाहणाऱ्या पाणी प्रवाह वेगवेगळ्या हंगामात कमी अधिक असू शकते. त्यामुळे प्रवाह कमी अधिक असलेल्या काळामध्ये प्रवाहाची रुंदी निश्चित केली जाते.
त्यावर जिओपॅथिक स्ट्रेसची तीव्रताही मोजली जाते. त्यावर आधारित काही सूत्रांचा वापर उपाययोजना ठरवली जाते. त्या खोलीच्या/ घराच्या/ रस्त्याच्या किती क्षेत्रफळावर उपाययोजना करायची, त्यात कोणते साहित्य व किती प्रमाणात वापरायचे हे सूत्रांनुसार ठरवले जाते. ही सूत्रे स्वतः डॉ. सोरटे यांनी ‘पीएचडी’च्या अभ्यासादरम्यान विकसित केलेली आहेत. विशिष्ट धातूच्या विशिष्ट व्यासाच्या सळया वापरून बनवलेली जाळी या स्ट्रेस झोन असलेल्या
ठिकाणी बसवतात. या जाळीला एक तांब्याची तार जोडून अर्थिंग केले जाते. हे अर्थिंग साधारणपणे विजेच्या धोक्यापासून बचावासाठी करतो तसेच असते. या स्ट्रेस झोनमधील ऊर्जा या जाळीत येते. जाळीतील ऊर्जा या तांब्याच्या तारेतून जमिनीत वाहून नेली जाते. जमिनीत सोडताना ही तांब्याची
तार विशिष्ट मटेरिअलमध्ये खोचली जाते. या खोलीमध्ये बसवलेल्या जाळीच्या वर मग जिओपॅथिक स्ट्रेसची ऊर्जा जाऊ शकत नाही. इमारती बांधकामाच्या टप्प्यात असताना तिच्या पायातच किंवा इमारतीच्या पहिल्या स्लॅबच्या काॅंक्रीटमध्येच ही जाळी बसवतात.
पण इमारत पूर्ण झालेल्या व सध्या लोकांचा रहिवास असलेल्या स्थितीत ही जाळी किंवा त्या धातूचा पातळ पत्रा स्लॅबवर किंवा टाइल्सवर बसवला जातो. त्याचे व्यवस्थित अर्थिंग केले जाते. मग ही जाळी चटई, गालिचा वा फर्निचरने झाकली
गेल्यामुळे अन्य लोकांना ती कळतही नाही. काही स्थितीमध्ये वरच्या मजल्यावर हा त्रास होऊ नये म्हणून सिलिंगला किंवा छतालाही जाळी बसवता येते. पुणे शहर व जिल्ह्यातील अनेक वास्तूंमध्ये अशा प्रकारे कामे त्यांनी केलेली आहेत.
रस्त्यावरील उपाययोजना
जिओपॅथिक स्ट्रेस झोनमध्ये असलेल्या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यासाठी डॉ. सोरटे व डॉ. खरात यांनी काम केले आहे. त्याचेही मूळ तत्त्व वर उल्लेख केल्याप्रमाणेच आहे. स्ट्रेस झोनमधील विद्युत चुंबकीय ऊर्जा विशिष्ट धातूचा वापर करून त्याचा प्रभाव शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ वरील कामांसाठी ‘एम.एस.आर.डी.सी.’ आणि ‘नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ या संस्थांची परवानगी घेत वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी जीपीएस असल्याची खात्री केली. त्यावर उपाययोजना केलेली आहे. या महामार्गावरील वाहनांची कमाल वेगमर्यादा ही ८० कि.मी. प्रतितास निश्चित केलेली आहे. त्यात गाड्यांचे वाहक बेजबाबदारपणे ही मर्यादा अनेक वेळा तोडत असतात. ८० किमी प्रति तास या वेगाने वाहन चालले असता एका सेकंदात वाहन २२ मीटर अंतर पार
करते. जिओपॅथिक स्ट्रेस झोन परिसरातून गाडी जाताना वाहकांच्या प्रतिक्षिप्त क्रियेचा वेग खूप मंदावतो. त्यामुळे या पंधरा-वीस मीटर अंतरात बरेच काही घडून जाते आणि अपघात होतो. बऱ्याच वेळा या परिसरात जीवघेणे अपघात झालेले आहेत. अपघातातून वाचलेले वाहकांना त्या काळात नेमके काय घडले तेच सांगता नाही. कारण त्यांना ते समजलेलेच नसते.
अशा ठिकाणी जिओपॅथिक स्ट्रेस झोनमधील ऊर्जा कमी किंवा शून्यावर आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे वाहकांवरील ताण कमी होऊन त्यांची प्रतिक्षिप्त क्रिया सुधारते. वाहकाचे गोंधळणे व त्यातून होणारा अपघात होत नाही. अशी उपाययोजना प्रत्यक्षात केल्यानंतर ‘एक्स्प्रेस वे’च्या त्या भागातील अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचेही संबंधित यंत्रणांनी मान्य केले आहे.
या विषयातील सखोल अभ्यासामुळे २०१४ मध्ये प्राध्यापक डाॅ. रविराज सोरटे डॉ. खरात व डॉ. धर्माधिकारी यांना अमेरिकेतील ‘सिटी युनिव्हर्सिटी, न्यू यॉर्क’ या नामांकित विद्यापीठात चर्चासत्रासाठी खास निमंत्रित म्हणून बोलवले होते.
त्या वेळी अमेरिकेतील याच विषयावर अभ्यास करणाऱ्या माक क्लिंकरस गायकोडोश या संशोधकांनी भारतीय तीनही शास्त्रज्ञांचे कौतुक केले. पुढे एकत्रित काही संशोधन करण्यासंदर्भातील शक्यतांची चाचपणी केली.
‘एआय’ वापरातून भविष्यातील अपघात टाळणे
विविध देशांतील ‘हायवे ॲथॉरिटी’ यासारख्या संस्थांनी अपघात होण्याची सात प्रमुख कारणांची यादी निश्चित केलेली आहे. त्यात जिओपॅथिक स्ट्रेसचीही भर घालण्यात आली आहे. या सर्व कारणांवर आधारित फझी लॉजिक (Fuzzy logic) अल्गाॅरीदम बनवले. त्याच्या साह्याने प्रा. सौ. स्नेहल बोबडे- सोरटे यांनी अपघात स्थळे व तेथील अपघात होण्याच्या शक्यतांचे प्रमाण, तेथील अपघाताच्या तीव्रतेची शक्यता (गंभीर/ कमी गंभीर /कमी नुकसानीचे) मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील पुणे- बंगळूर, पुणे- सोलापूर महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्ग या तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचा अभ्यास केला. त्यात वरील अपघाती ठिकाणांची तीव्रता निर्देशांक तसेच अपघाताचे तीव्रता पातळी शोधली.
या सर्व निष्कर्षातून त्यांनी फज्जी लॉजिक अॅल्गोरिदम वर आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार केली आहे. या संशोधनासाठी डॉ. स्नेहल यांनी डॉ. रवींद्र लाड यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळाले. या साॅफ्टवेअरच्या वापरामुळे रस्त्यावरील अपघातांची संख्या खूप कमी करणे शक्य असल्याचे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. अशा पद्धतींचा वापर करून महामार्गांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने लेखापरीक्षण (ऑडिट) व त्यावरील उपाययोजना केल्या गेल्यास अपघातांमध्ये जाणारे हजारो प्राण वाचू शकतील.
संशोधनाने पकडला वेग...
भारतामध्ये डॉ. खरात यांच्यापासून जिओपॅथिक स्ट्रेस संदर्भात सुरू झालेले संशोधनकार्य अन्य तरुण संशोधकही पुढे नेत आहेत. आतापर्यंत या विषयामध्ये ९ पीएच. डी. पदव्या मिळवल्या आहेत. आपल्या संशोधनाचा सर्वसामान्यांसोबत शासनालाही फायदा पोहोचावा यासाठी पुणे येथील ‘सोसायटी फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ डाउजिंग’ या संस्थेचे तज्ज्ञ
जिओपॅथिक स्ट्रेस झोन व त्याच्या परिणामांबाबत शासनातील राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग, वाहतूक पोलिस, केंद्र व राज्य सरकारचे रस्ते बांधकाम खात्यातील उच्चपदस्थांना प्रशिक्षण देत आहेत.
- सतीश खाडे, ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.