- शेखर गायकवाड
बदलत्या ग्रामीण महाराष्ट्राचे शब्दचित्रण करायचे ठरवल्यास निवडणुकांचा समावेश केल्याशिवाय ते अपूर्ण ठरेल. भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका १९५२ मध्ये झाल्या. त्या वेळी मुंबई आणि गुजरात राज्य एकत्र होते. पहिल्या निवडणुकीच्या वेळी लोकांमध्ये अतिशय उत्साह होता. अनेक लोक बैलांना झुली घालून, बैलगाड्या रंगवून निवडणुकीला गेल्याचे जुने लोक सांगतात. मतदानाच्या वेळी या निवडणुकीत प्रबळ विरोधक नसल्यामुळे बहुतेक बूथवर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मर्यादित संख्येने हजर असत. मतपत्रिका देऊन टेबल वर जाऊन योग्य त्या नावासमोर व चिन्हावर शिक्का मारा असे सांगितले, तरी बरीच माणसे मतपत्रिका तशीच बाजूला ठेवून शिक्का टेबलवर मारत असत. त्या वेळी देशातील १७ कोटी ६० लाख जनतेपैकी ८५ टक्के लोकांना लिहिता वाचता येत नव्हते.
देशाच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीसाठी स्टीलच्या मत पेट्या तयार करण्यासाठी सुमारे १६ हजार ५०० कामगार कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आले होते. तब्बल ८२०० टन पोलाद वापरून २० लाख मतपेट्या तयार करण्यात आल्या. पहिल्या निवडणुकीची आणखी एक गंमत म्हणजे उत्तर भारतातील बहुसंख्य महिला स्वतःच्या नावाची नोंद मतदार यादीत करायला तयार नव्हत्या. नाव विचारल्यास या महिला मी याची बायको म्हणून नाव सांगत. या कारणामुळे २८ लाख स्त्रियांची नावे काढून टाकण्यात आली होती. पहिलीच निवडणूक असल्यामुळे उमेदवार निहाय चिन्ह लावून वेगवेगळ्या पेट्या तयार करण्यात आल्या. सर्व मते एकाच पेटीत न टाकता ज्या उमेदवाराला मत द्यायचे त्या पेटीत टाकावे लागत असे. मतदान प्रक्रिया समजून सांगण्यासाठी पहिल्यांदाच एक लघुपट तयार करण्यात आला व देशातल्या ३००० चित्रपटगृहातून तो दाखवण्यात आला. डोंगराळ भाग, सपाटीचा भाग, दक्षिण भारत अशा वेगवेगळ्या अनेक पट्ट्यात ही निवडणूक झाली व त्या सुमारे पाच महिने चालल्या.
१९५२ पासून १९९७ पर्यंत भारताने छापील मतपत्रिका वापरून निवडणुका घेतल्या. निवडणुकांमध्ये उमेदवारांचे चिन्ह असणारे प्राणी, पक्षी, वस्तू यांचा प्रचारात वापर करताना अनेक गमती-जमती घडत. मतदारांना पुन्हा पुन्हा आठवण करून देण्यासाठी व कायमचे लक्षात राहण्यासाठी उमेदवार अनेक शक्कल लढवत असत. १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत हत्ती चिन्ह असणाऱ्या एका उमेदवाराने हत्ती वर बसून प्रचार केला होता. याच हत्तीला सोंडेमध्ये मोठा पेपर पकडायला शिकवून जवळच्या बॉक्समध्ये टाकायला शिकवले.
हे पाहून लोकांनी पण आपल्याला असे मत द्यावे असे त्याला भासवायचे हेाते. वाघ हे चिन्ह मिळालेल्या एका उमेदवाराने वाघ एका पिंजऱ्यामध्ये ठेवून त्या पिंजऱ्याचा वापर प्रचारासाठी केला होता. १९५७ च्या निवडणुकीत एका उमेदवाराला कोंबडी हे चिन्ह मिळाले होते. त्यांनी मतदान केंद्रापर्यंत त्या कोंबडीला आणले होते. पण दुर्दैवाने गिधाडाने त्या कोंबडीवर हल्ला केला. त्यात ती कोंबडी मेली होती. हा उमेदवार कोंबडीचे रक्षण करू शकत नाही तर हा आपले रक्षण काय करणार असा विचार करून लोकांनी त्या उमेदवाराला पाडले होते.
काही वेळेस पक्षाचे धोरण एक असते आणि मिळालेले चिन्ह एकदम त्याच्या विचाराच्या विरुद्ध टोकाचे असते. गरिबांचा पक्ष म्हणवणाऱ्या एका राजकीय पक्षाला ‘बंगला’ हे श्रीमंताचे चिन्ह मिळाले होते. तर एका पक्षाला गरिबांचे वाहन असलेले सायकल चिन्ह मिळाल्यावर उमेदवाराच्या आयात केलेल्या महागड्या गाड्यांवर चिकटवावे लागले होते. त्यापूर्वी निवडणूक म्हणजे प्रचंड गदारोळ प्रचार बॅनर, पोस्टर, झेंडे, बॅजेस, वाहनांचा वापर, लाउडस्पीकर वर गाणी, रिक्षा मधून प्रचार, मतदारांची वाहतूक, मोठ्या प्रचार सभा व त्यासाठी अनेक वाहनातून आणलेली माणसे असे चित्र सर्रासपणे दिसत होते.
आदर्श आचारसंहिता येण्याआधी सर्रासपणे ढोल-ताशांच्या गजरात ‘ताई माई अक्का, विचार करा पक्का, आईचे मत, बापाचे मत, भावाचे मत अमक्याला,’ अशा घोषणा सर्रासपणे ट्रक किंवा ट्रॅक्टरवर लाउडस्पीकर लावून मतदार संघातील सर्व गावांमध्ये फिरवून प्रचाराचा गदारोळ उडवून दिला जात असे. आता आचारसंहितांचा अंमल अधिक कडक झाल्यावर राजकीय उमेदवारांनी सुद्धा प्रचारात योग्य तो बदल केला आहे. प्रचारातील प्रत्येक गोष्ट व्हिडिओ कॅमेरात चित्रित होऊ लागल्यामुळे व त्या आधारे खर्चाचे गणित मोजले जाऊ लागल्यामुळे प्रचार सभेला हजर राहणाऱ्या लोकांना केवळ पिण्याचे पाणी देऊन सभा होऊ लागली. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचे मानसिक समाधान करण्याची नवी कार्यपद्धती निर्माण झाली. एका निवडणुकीमध्ये हजारो अकाउंटमधून पेटीएमद्वारे २००-३०० रुपये हस्तांतरित केल्याचे उघडकीस आले.
निवडणुकीत एवढी धावपळ असते, की अनेक वेळा फार किस्से घडतात. मंत्री पदावर असलेल्या व उमेदवाराचा असाच एक किस्सा घडला. दररोज ५-६ सभांना हजेरी लावताना एकदा शेवटच्या सभेला जाण्यापूर्वी त्यांना खोकला आला व घसा थोडा दुखू लागला. प्रचार सभेच्या जवळ आल्यावर रस्त्यात गाडी थांबवून त्यांनी कार्यकर्त्यांना औषधाची बाटली घ्यायला सांगितली. सभेची वेळ संपण्यापूर्वी घाईत जायचे असल्यामुळे कार्यकर्त्यांनी कार मध्येच बसले असतानाच हाताने औषधाची बाटली फोडून दिली. बोलता-बोलता एक घेाट औषध घेण्याऐवजी मंत्र्यांनी पूर्ण बाटलीच पिऊन टाकली. सभेच्या जवळ गाडी पोहोचली तेव्हा त्यांना गाढ झोप लागली होती. ग्रामपंचायत निवडणुकीतील तर असे असंख्य किस्से सांगता येतील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.