Raju Shetti Criticize Sugar Factory Owners : गत हंगामातील गाळप उसापासून झालेल्या उपउत्पादनांची विक्री जादा दराने झाली. त्याचे अतिरिक्त दोनशे रुपये शेतकऱ्यांना यंदाच्या ‘एफआरपी’बरोबर मिळाले पाहिजेत. सरकारने कारखानदारांना याबाबत आदेश द्यावेत; अन्यथा आमच्या हातात उसाचा बुडखा आहेच, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिला. सोमवारी (ता.०७) जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
शेट्टी म्हणाले, ‘‘यंदाची ऊस परिषद २५ ऑक्टोबरला आहे. त्याआधी आम्ही गेल्या वर्षीच्या अतिरिक्त दोनशे रुपयांची मागणी केली आहे. कारण गेल्या हंगामातील साखरेसह, बगॅस, मोलॅसिस, इथेनॉल, स्पिरीट यांची जादा दराने विक्री झाली आहे. त्यामुळे यंदाच्या एफआरपीबरोबरच गेल्या हंगामातील उसाला प्रतिटन २०० रुपये अतिरिक्त मिळावेत, अशी आमची मागणी आहे. ती आम्ही सुमारे एक महिनाभर आधी केली आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी याबद्दल त्वरित विचार करावा अशी मागणी शेट्टी यांनी केली.’’
पुढे शेट्टी म्हणाले, ‘‘कारखाने १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू करता येणार नाहीत; पण जे करतील त्यांच्यावर नियमाप्रमाणे प्रतिटन ५०० रुपये दंड आकारावा. कारखानदार सरकारपेक्षा मोठे झालेत का? सरकारने कारवाई करावी; अन्यथा आमच्या हातात उसाचे बुडखे आहेच. बारा टक्के उतारा असणारा माळेगाव कारखाना ३ हजार ६०० दर देतो. अकरा टक्के रिकव्हरी असणारा विठ्ठल कारखाना ३ हजार ५०० रुपये पहिली उचल जाहीर करतो; मग आपल्या येथील १३ टक्के उतारा असणाऱ्या कारखान्यांना दर देण्यास काय झाले? असा प्रश्नही शेट्टी यांनी उपस्थित केला’’
राज्यात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परिवर्तन महाशक्ती आघाडीबाबत शेट्टी म्हणाले, ‘‘राज्यात दोनशे ते अडीचशे घराणी राजकारण करतात. त्यांच्यातील व्यक्तीच आलटून- पालटून विविध पक्षातून निवडून येतात. या सर्वांना बाजूला करून स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना लोकप्रतिनिधी करणे, हाच आमच्या आघाडीचा उद्देश आहे.
यामुळेच आम्ही ३० ते ३५ संघटनांना घेऊन एकत्र आलो आहोत. राज्यातून विविध ठिकाणांहून आम्हाला उमेदवारीसाठी संपर्क साधला जात आहे; मात्र इच्छुकांची तपासणी करूनच आम्ही उमेदवारी देणार आहोत. जागा वाटपाबद्दल आमच्यात कोणतीच मतभिन्नता नाही." असंही शेट्टी यांनी सांगितलं.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.