Marketing Federation : कापसाचे दर दबावात असल्यामुळे राज्यातील कापूस उत्पादक मेटाकुटीस आले होते. त्यामुळेच बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत शासनाने खरेदी केंद्रे उघडावीत, अशी मागणी उत्पादकांद्वारे होत होती.
अखेरीस महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचा पाठपुरावा आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत केंद्र सरकारने ‘सीसीआय’चा सबएजंट म्हणून खरेदीस मान्यता दिली आहे. परिणामी, दरात सुधारणांची अपेक्षा आहे.
२०२१-२२ मध्ये कापसाला ८५०० ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. स्थानिक उद्योगाची मागणी, कृत्रिम धाग्याचे दर अधिक होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाला मागणी असल्याने हे घडले होते. २०२२-२३ या वर्षीच्या हंगामात ७००० ते ८५०० असा दर होता. यंदाच्या हंगामात कृत्रिम धाग्याचे दर कमी झाल्याने त्याचा वापर वाढला आहे.
परिणामी, कापसाचा हमीभाव ७०२० रुपये असताना बाजारात कापूस दर ७००० रुपयांवर स्थिरावले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी कमी झाल्यास त्याचा दरावर आणखी परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळेच ‘सीसीआय’सह स्थानिक संस्थांद्वारे बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत खरेदी केंद्र वाढवावे, अशी मागणी होत होती. त्यामुळे केंद्र सरकारने अखेर पणन महासंघाला खरेदीस परवानगी दिली आहे.
राज्यात ‘सीसीआय’चा सबएजंट म्हणून कमिशनवर ही खरेदी होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कापूस खरेदीस परवानगी मिळावी, याकरिता पणन महासंघाकडून पाठपुरावा सुरू होता. परंतु केंद्राकडून त्यास दाद मिळत नव्हती.
पणन महासंघाकडे उत्पन्नाचा दुसरा कोणताच आर्थिक स्त्रोत नसल्याने त्यांची आर्थिकस्थिती देखील खालावली होती. आता खरेदीला मान्यता मिळाल्याने कमिशनच्या माध्यमातून पणन महासंघाला ऊर्जितावस्था मिळण्यास हातभार लागणार आहे.
खरेदीदारांची संख्या वाढेल. परिणामी, भाव टिकून राहण्यासह वाढण्यासही मदत होईल. यंदाच्या हंगामात २९० ते २९५ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज असला तरी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याचा उत्पादकतेवर परिणाम होईल.
- गोविंद वैराळे, कापूस विपणन क्षेत्राचे अभ्यासक, नागपूर
पणन महासंघाला परवागनी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी पणन महासंघाला कापूस खरेदीची परवानगी मिळाली आहे. ‘सीसीआय’शी लवकरच करार होऊन खरेदी केंद्रांची संख्या निश्चित होईल.
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.