Nashik News : मनेगाव येथे ग्रामपंचायत जमिनीवरील अवादा कंपनीच्या प्रस्तावित ५२ एकरवरील आठ मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणास गेलेल्या ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी रोखले.
ग्रामपंचायतीची जागा प्रकल्पाला देणार नसल्याचे सांगण्यात आले. चार-पाच दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. दरम्यान, अधिकाऱ्याऱ्यांनी हा प्रकल्प शासकीय असल्याने सांगत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जमीन देण्यास नकार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितल्याने अधिग्रहण होऊ शकले नाही.
नायब तहसीलदार सागर मुंदडा, पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील, सहायक निरीक्षक दिलीप राठोड, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता हेमंत राठोड, अवादा कंपनीचे अधिकारी जमीन अधिग्रहणसाठी गेले होते.
सरपंच सुनीता सोनवणे, उपसरपंच शोभा भालेराव, राजाराम मुरकुटे, माजी सरपंच संजय सोनवणे, अॅड. सी. डी. भोजने, योगेश घोडेकर, दीपक जाधव, अण्णासाहेब सोनवणे, दीपक गायकवाड, राम बुचूडे, मधुकर घोडेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायतीला तीन वर्षे प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. यातील एक हप्ताही दिला आहे, शिवाय शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होईल. हा प्रकल्प सरकारचा असून, त्याला विरोध करू नये. ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे बनसोड, झाल्टे यांनी केले. तथापि, या जागेवर वीज केंद्र होणार असल्याचे सांगितले गेले होते. सोलर प्रकल्पाबाबत सांगितले नाही. त्यामुळे ही फसवणूक झाल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे.
तोडगा न निघाल्याने अखेर अधिकारी माघारी
अवादा कंपनीला ही जागा दिली जात असून, त्यास आमचा विरोध असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भविष्यात गोंदे हब सेंटर होणार आहे. त्यामुळे या जागेला महत्त्व येणार आहे. ग्रामपंचायतीची ही मिळकत गावासाठी महत्त्वाची आहे.
त्यामुळे या प्रकल्पास विरोध असल्याचे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सांगितले. तथापि, अवादा ही ठेकेदार कंपनी आहे. मात्र हा प्रकल्प ‘महावितरण’चा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र ही जमीन ‘अवादा’ साठीच घेतली जात असल्याच्या म्हणण्यावर ग्रामस्थ ठाम राहिले. तोडगा न निघाल्याने अखेर प्रशासकीय अधिकारी माघारी परतले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.