
Dharashiv News : तामलवाडी (ता. तुळजापूर) एमआयडीसीसाठी संपादित केल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीला सर्वाधिक दर मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने कौडगाव एमआयडीसीत भूसंपादन करताना राज्यात सर्वांत चांगला दर शेतकऱ्यांना दिला, अगदी त्याच पद्धतीने येथेही प्रयत्न सुरू आहेत.
रेडिरेकनरच्या चारपट अथवा मागील तीन वर्षांत त्याहूनही अधिक दराने एखादा अधिकृत व्यवहार झाला असेल तर त्याच्या चारपट मोबदला मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
तामलवाडी येथे एमआयडीसीचे अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच तामलवाडी एमआयडीसी साकारणार असल्याचेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचा विचार करूनच ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी एक सुकाणू समिती गठीत करण्याचेही या वेळी ठरविण्यात आले.
तामलवाडी येथे ३६७ एकर क्षेत्रावर एमआयडीसी मंजूर झाली आहे. ३०० एकर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, त्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देऊनच सर्वांच्या संमतीनेच भूसंपादन करण्यात येणार आहे.
एमआयडीसी रेडीरेकनर दराच्या चारपट दर देते. मात्र शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता मागील ३ वर्षांत त्यापेक्षाही जास्त दराने खरेदी किंवा विक्री व्यवहार झाला असेल तर ती मूळ किंमत गृहीत धरून त्याच्या चारपट दर मिळवून देण्यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचेही आमदार पाटील यांनी या वेळी सांगितले.
.. तर मगरपट्ट्याच्या धर्तीवर टाऊनशिपही..
संपादित जमिनीच्या १० टक्के जमीन मूळ मालकांना देण्याची पद्धत आहे. त्यानुसार या जमिनीवर पुणे येथील मगरपट्ट्यात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन टाऊनशिप उभारून अधिकाधिक फायदा मिळवला आहे. त्या धर्तीवर तामलवाडी येथे शेतकऱ्यांना टाउनशिपच्या माध्यमातून कामगार व अधिकारी यांच्या निवासासाठी, औद्योगिक वसाहतीत मूलभूत सोयीसुविधा, भोजनालय व आनुषंगिक व्यवसाय आदींच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळवता येणार आहे.
त्यातूनही स्थानिकांना व्यवसाय आणि रोजगार उपलब्ध होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात तीनशे एकर व दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जमीन संपादित करण्याचे नियोजन आहे. जागेच्या पाहणीत एकेठिकाणी खदान आढळून आली आहे. ती वगळून इतर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.