Farmer E-KYC Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer E-KYC : अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावे

E-KYC Update : केंद्र शासनाच्या युआयडीएआय आधार पोर्टलला काही तांत्रिक अडचणी येत असल्याने बायोमॅट्रिक पडताळणी आणि ओटीपी तयार होत नसल्याबाबत माहिती मिळाली आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात जून-जुलैमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीने ई-केवायसी करून घ्यावे.

ई-केवायसी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर शासनाकडून रक्कम जमा करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तलाठी किंवा तहसीलदार यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात जून-जुलै २०२३ मध्ये अतिवृष्टी झालेल्या पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ६ लाख बाधित शेतकऱ्यांसाठी ४२० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अनुदानाच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर तहसील कार्यालयामार्फत संबंधित तलाठी यांनी अपलोड केल्या आहेत. ही माहिती अपलोड केलेल्या बाधित शेतकऱ्यांना वि. के. नंबर प्राप्त झाले असून, हे नंबर संबंधित गावाचे तलाठी यांच्याकडे उपलब्ध आहेत.

ई-केवायसी होत नसल्याची बाब अनेक शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्याअनुषंगाने शासन स्तरावर संपर्क केला असता, केंद्र शासनाच्या युआयडीएआय आधार पोर्टलला काही तांत्रिक अडचणी येत असल्याने बायोमॅट्रिक पडताळणी आणि ओटीपी तयार होत नसल्याबाबत माहिती मिळाली आहे. ही समस्या लवकरच सोडवली जाईल, असे वडदकर यांनी कळविले आहे.

सोयाबीन नुकसानग्रस्तांबाबत मात्र संभ्रम

जिल्ह्यात सोयाबीनचे बुरशीजन्य रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासकीय यंत्रणांनी संयुक्तपणे केलेल्या पंचनाम्यानुसार ४७८ गावांतील दोन लाख ११ हजार ४४९ शेतकऱ्यांच्या ९३ हजार ६८६ हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता.

या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना ७९ कोटी ६३ लाखांची मागणी शासनाकडे केली आहे. परंतु या सोयाबीन नुकसानग्रस्तांना कधी भरपाई देण्यात येणार आहे, याबाबत मात्र अद्याप हालचाली दिसत नाहीत. याबाबत जिल्हा प्रशासनाने माहिती द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

अनुदान थेट जमा करा : वाटेगावकर

नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने त्यांना सीएससी केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीने ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हाताचे अंगठे उमटत नसल्याने अनुदानाची रक्कम सरसकट खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकरी नेते आत्माराम पाटील वाटेगावकर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यात जून-जुलैमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीने ई-केवायसी करून घ्यावे. ई-केवायसी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर शासनाकडून रक्कम जमा होणार आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

परंतु हदगाव तालुक्यात वाटप करण्यात येणाऱ्या अनुदानांबाबत शेतकऱ्यांना ई-केवायसी करताना हाताचे अंगठे उमटत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अनुदानांसाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना अनुदान देताना बायोमॅट्रिक पद्धतीऐवजी सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, यामुळे नुकसानग्रस्तांना वेळेवर भरपाई मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT