राज्यात अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारनं निधी वाटपाला मंजूर दिली आहे. राज्यात जानेवारी २०२४ ते मे २०२४ दरम्यान अवकाळी आणि अतिवृष्टिनं नुकसान केलं, त्यामुळं विभागीय आयुक्ताकडून निधीच्या मागणीचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारनं नुकसान भरपाई देण्यासाठी ५९६ कोटी २१ लाख ५५ हजार इतका निधी वितरित करण्यासाठी मंजूरी दिली आहे. त्यामुळं जानेवारी ते मे २०२४ च्या दरम्यान अवकाळी पाऊस, अतिवृष्टिचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, या सहा महिन्यात एकूण २ लाख १७ हजार ६९० हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला. त्यामध्ये ३ लाख ५४ हजार ७६५ शेतकऱ्यांची नुकसान झालं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी पोर्टलवरून भरपाई रक्कम थेट जमा करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत.
तसेच २ हेक्टरची मर्यादा वाढून ३ हेक्टर करण्यात आल्याचा उल्लेखही शासन निर्णयात करण्यात आला आहे. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३ हेक्टरमर्यादेपर्यंत निधी मिळणार आहे. यामध्ये १ जानेवारी २०२४ च्या महसूल विभागाच्या निर्णयानुसार मदत देण्यात येणार आहे. म्हणजेच जिरायत पिकांसाठी प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपये, बागायत पिकांसाठी २७ हजार रुपये प्रतिहेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये प्रतिहेक्टर ३ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे.
राज्यात जानेवारी ते मे महिन्यात विविध भागात पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळं रब्बी आणि उन्हाळ पिकांचं नुकसान झालं. वादळी वाऱ्यांमुळे पीक भुईसपाट झाली. शेतकऱ्यांना मोठा तडाखा बसला. सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत होते. सरकारनं पंचनामे करण्याचे आदेश दिले परंतु ६ महीने झाले तरीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. त्यावरून पावसाळी अधिवेशनात कॉँग्रेसचे आमदार बाळसाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत यांनी आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना धारेवर धरलं होतं. त्यावेळी पाटील यांनी १५ जुलैपर्यंत अतिवृष्टी आणि अवकाळीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू असं सांगितलं होतं. परंतु शासन निर्णयासाठी २ ऑगस्ट उजडावा लागला.
नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबाद पुणे विभागातील सोलापूर, पुणे, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, तर नागपूर विभागात गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये जानेवारी २०२४ ते मे २०२४ च्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टि, अवकाळीचा समावेश आहे.
काही जिल्ह्यात जानेवारी महिन्यात अवकाळीने नुकसान केलं तर काही जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अतिवृष्टि झाली, अशा जिल्ह्यांसाठी मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मदतीची अपेक्षा होती. परंतु पंचनामे वेळेत पूर्ण करण्यात आले नाहीत, तर दुसरीकडे नुकसानीचं क्षेत्र अधिक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं सरकारनं तुटपुंजी मदत दिल्याचं शेतकरी सांगतात. यापूर्वी राज्य सरकारनं नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील शेती पिकांच्या मदतीसाठी १४४ कोटी आणि २ हजार १०९ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिलेली आहे. परंतु मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून जमा झाला नसल्याची शेतकरी तक्रार करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.