Pune News : रासायनिक खतांच्या किमती भडकल्या असताना बोगस खत बनविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. मराठवाड्यात दोन ठिकाणी धाडी टाकून बनावट डीएपी जप्त करण्यात आले आहे.
कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक सुनील बोरकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. टी. एस. मोटे, जालना येथील जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. बी. बनसावडे, उपसंचालक पी. बी. कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या धाडी टाकण्यात आल्या आहेत. श्री. बोरकर यांनी सांगितले, की जालना व बीड जिल्ह्यांत १८:४६:० श्रेणीचे बनावट डीएपी विकले जात होते.
या संदर्भात गुणनियंत्रण विभागाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर निरीक्षकांची पथके तयार करण्यात आली व सापळा रचून दोन्ही जिल्ह्यांमध्ये छापा टाकून बनावट डीएपी जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बनावट खताचा पुरवठा बीड जिल्ह्यातून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी माजलगाव (जि.बीड) व घनसांगवी (जि.जालना) पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, माजलगावच्या रामनगर (टा.) येथील माऊली कृषी सेवा केंद्रावर छापा टाकण्यात आला. तेथे चंबल फर्टिलायझर्स अॅन्ड केमिकल्स या नामांकित कंपनीच्या नावाचे साम्य असलेले डीएपी खत आढळले. कंपनीच्या प्रतिनिधीला घटनास्थळी बोलावण्यात आले असता त्याने हे खत ‘चंबल’चे नसून बनावट असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कृषी सेवा केंद्रचालक गोपीनाथ अप्पाराव वाघ यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी हे खत रमेश पिंपळे याने पुरवल्याचे सांगितले.
ई-पॉस प्रणालीत या खताची नोंद करण्यात आलेली नाही. याबाबत गुणनियंत्रण विभागाने खताचा साठा जप्त करीत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पिंपळेने बनावट डीएपी नेमके कोठून आणले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घनसांगवीत नाथनगरच्या योगेश्वरी कृषी सेवा केंद्रावर टाकलेल्या छाप्यात जप्त करण्यात आलेले बनावट डीएपीदेखील ‘चंबल फर्टिलायझर्स’च्या बनावट पिशव्या तयार करुन विकले जात होते. या छाप्यात राहुल आरडे यांच्या दुकानातून ५६ गोण्या डीएपी आढळले आहे. त्याचा पुरवठासुद्धा गोपीनाथ वाघ व रमेश पिंपळे यानेच केलेला आहे. गुणनियंत्रण विभागाचे तंत्र अधिकारी ए. एल. काळुशे, एस. जी. बंडगर, एस. जी. गरांडे तसेच एन. डी. भदाणे, व्ही. डी. गायकवाड, एम. के. काटे, डी. एस. काकडे यांनी या कारवाईत भाग घेतला.
खत उद्योगातून चिंता
मराठवाड्यात गुणनियंत्रण टाकलेल्या दोन्ही धाडीत जप्त केलेले डीएपी बनावट असल्याने खत उद्योगातून चिंता व्यक्त केली जात आहे. खत कंपन्यांनी संयुक्त खताचे दर गेल्या पंधरवड्यापासून वाढविण्यास सुरुवात केली आहे. ही दरवाढ ५० किलोच्या गोणीमागे १०० ते २५० रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे १०:२६:२६ श्रेणीचे १७०० ते १७२५ रुपये दराने विकत घ्यावे लागत आहे. तसेच, २०:२०:०:१३ श्रेणीचे खत प्रतिगोणी १३०० ते १३५० रुपये दराने विकले जात आहे.
‘बनावट खतांचे अड्डे शोधून उद्ध्वस्त करा’
‘‘दरवाढीमुळे बनावट खते तयार करणाऱ्या टोळ्यांनी संधी मिळाली आहे. त्यामुळेच बनावट खते कमी दरात विकण्याचे प्रकार वाढले आहेत. गुणनियंत्रण विभागाने केवळ बनावट खते जप्त करण्यात धन्यता मानू नये; तर बनावट खतांचे अड्डे शोधून ते उद्ध्वस्त करायला हवेत,’’ असे खत उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.