Tomato Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Farming : शेतकरी वळताहेत टोमॅटो पिकाकडे

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : गेल्या काही वर्षांत सीताफळ, अंजीर या फळबागांमुळे ओळख तयार झालेल्या पुरंदर तालुक्यात शेतकरी पीकबदल करू लागले आहेत. शेतकरी आता टोमॅटो पिकाकडे वळत आहेत. टोमॅटोची चालू वर्षी ७६५ हेक्टरवर लागवड केली असून, या भागातील शेतकरी विक्रमी उत्पन्न घेऊ लागले आहेत. वीर आणि बेलसर हे टोमॅटो पिकाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मागील वर्षी शेतकऱ्यांना चांगला दर मिळाल्याने बहुतांश शेतकरी टोमॅटोकडे वळले आहेत.

पुरंदर तालुक्यात मागील वर्षी सुरुवातीच्या काळात टोमॅटोची अत्यंत कमी क्षेत्रावर लागवड झाली होती; परंतु दर वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीला पसंती दिली होती. तर या वर्षी तालुक्यात पाणीटंचाई असली तरीही शेतकरी टोमॅटो पीक लागवडीस प्राधान्य देत आहेत. अत्यंत कमी पाण्यावर पिकाचे नियोजन शेतकऱ्यांनी केलेले पाहायला मिळत आहे.

बेलसर, वीर व दिवे परिसरात टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. वीर धरण व पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी लागवड केल्याचे शेतकरी सांगतात. पावसाचे वातावरण पाहून व पाण्याची उपलब्धता यावर शेतकऱ्यांनी लागवडीचे नियोजन केले आहे.

उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीची मशागत पूर्ण केली आहे. त्यामध्ये नांगरट, काकर-पाळी, बेड तयार करणे, ड्रीप बसविणे यासह इतर टोमॅटो पिकांच्या लागवडीसाठी लागणाऱ्या गोष्टींची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. तर काही प्रमाणात लागवडी सुरू झाल्या आहेत.

तालुक्यामध्ये सध्या विविध वाणांच्या रोपांची लागवड सुरू आहे. शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीसाठी जमीन तयार करून ठेवली आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी बेड तयार करून त्यावर ड्रीप जोडून जमीन लागवडीयोग्य केली आहे; परंतु अद्याप पाऊस पडत नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा

मागील वर्षी राज्यभरात जुलैमध्ये टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे टोमॅटोचे दर २००० ते ५००० रुपये प्रति क्रेट होते. त्यामुळे यंदाही दर असेच राहतील. शेतकऱ्यांना टोमॅटोतून अधिकचे उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

मल्चिंगचा वापर :

टोमॅटो लागवडीसाठी बेलसर परिसरातील शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरचा वापर केला आहे. पाण्याची बचत, खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन त्यासोबतच पिकांच्या वाढीसाठी मल्चिंग पेपर फायदेशीर ठरतो.

उष्णतेचा टोमॅटो पिकावर परिणाम

आता उष्णतेची तीव्रता कमी झाली असली तरी पाणीटंचाईचे परिणाम सोसावे लागत आहेत. कमी-अधिक उष्णतेमुळे पानांच्या कडा करपून रोपांना इजा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकची काळजी घ्यावी लागत आहे.

...ही गावे टोमॅटोसाठी प्रसिद्ध :

बेलसर, वीर, धालेवाडी, कोथळे, भोसलेवाडी, खळद, सासवड, मांडकी, जेऊर, पिंपरे, थोपटेवाडी, पारगाव, परिंचे, नीरा, दिवे.

एकूण १५ एकर शेती आहे. त्यापैकी दरवर्षी उसाची सहा ते सात एकरांवर लागवड असते. तर टोमॅटोची एक ते दीड एकरावर लागवड असते. त्यातून १००० हजार ते १२०० कॅरेटचे उत्पन्न मिळत असून मार्केटमध्ये चढ-उतार असतात. कमीत कमी दर मिळाले तरी खर्च निघून काही प्रमाणात थोडेफार पैसे मिळतात. त्यामुळे यंदा अर्धा एकरांवर टोमॅटोची लागवड केली आहे.
- गणेश थोपटे, टोमॅटो उत्पादक, थोपटेवाडी, ता. पुरंदर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bioplastic Production : ‘बायो प्लॅस्टिक’ चे उत्पादन वाढविणे काळाची गरज

Non Spinning Crisis : रेशीम कोष उत्पादकांसमोर ‘नॉन स्पीनिंग’चे संकट

Agriculture Department : पदोन्नत्या थांबवा; अन्यथा न्यायालयात जावे लागेल

Agriculture Projects : ‘कृषी, पशुसंवर्धना’साठी २३,३०० कोटींचे प्रकल्प

Pomegranate Rate : डाळिंबाचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT