Buldana News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी महिनोमहिने थांबावे लागत आहे. आता सुमारे ७२ कोटींपेक्षा अधिक निधीची गरज असताना केवळ सहा कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. हाही निधी शेतकऱ्यांच्या खात्यात पडायला विलंब होत असल्याने अनुदानाचे लाभार्थी रोष व्यक्त करीत आहेत.
कृषी आयुक्तालयाकडून सूक्ष्म सिंचनाकरीता पूरक अनुदान घटकासाठी प्राप्त निधी मागणी व प्रलंबित दायित्वाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनपूरक अनुदान घटकासाठी १२३ कोटी ९२ लाख रुपये ५ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आले. त्यात बुलडाणा जिल्ह्यासाठी ५ कोटी ९३ लाख ४२ हजार रुपयांचा समावेश आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राज्यात राबविली जात आहे. सन २०२४ -२५ मधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या ४०० कोटीच्या कार्यक्रमास १६ मे २०२४ रोजी मंजुरी देण्यात आली आहे.
कृषी आयुक्तालयाकडून सूक्ष्म सिंचनासाठी पूरक अनुदान घटकासाठी प्राप्त निधी मागणी व सद्यःस्थितीत असलेल्या प्रलंबित दायित्वाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी पूरक अनुदान घटकासाठी १२३ कोटी ९२ लाख रुपये निधी वितरित करण्याला मंजुरी देण्यात आली होती.
त्यात बुलडाणा जिल्ह्यासाठी ५ कोटी ९३ लाख ४२ हजार रुपये निधीचा समावेश आहे. निधी मंजूर होऊन दोन आठवडे उलटले तरी शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे अद्याप लाभार्थ्यांना मिळू शकलेले नाहीत.
माझ्या शेतात विहिरीला पाणी कमी असल्यामुळे कमी पाण्यात सिंचनाच्या उद्देशाने मी सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षात कपाशी पिकासाठी ४ एकर क्षेत्रात ठिबक सिंचनासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर स्वतःच्या पैशातून साहित्य खरेदी केले आहे. अनुदान प्रस्ताव शासनाकडे तेंव्हाच सादर केला आहे. मात्र, एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला तरी अनुदान मिळालेले नाही.- प्रकाश जनार्दन चोपडे, शेतकरी, टाकरखेड, जि. बुलडाणा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.