Tur Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Farming: तूर पिकात ठिबकद्वारे नियमित सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Tur Cultivation: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दादासाहेब दौलतराव शिंदे यांच्याकडे ९ एकर १४ गुंठे इतके शेती क्षेत्र आहे. गतवर्षी त्यांनी ५३ गुंठे क्षेत्रावर ५ बाय २ फूट अंतरावर तूर लागवड केली होती.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Management:

शेतकरी नियोजन । पीक : तूर

शेतकरी : दादासाहेब दौलतराव शिंदे

गाव : सिंदोन, ता. जि. छत्रपती संभाजीनगर

एकूण शेती : ९ एकर १४ गुंठे

तुरीचे क्षेत्र : २ एकर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दादासाहेब दौलतराव शिंदे यांच्याकडे ९ एकर १४ गुंठे इतके शेती क्षेत्र आहे. गतवर्षी त्यांनी ५३ गुंठे क्षेत्रावर ५ बाय २ फूट अंतरावर तूर लागवड केली होती. मागील पाच वर्षांपासून श्री. शिंदे तूर लागवड करत असून, गेल्या वर्षी कृषी विद्यापीठाच्या गोदावरी या नवीन सुधारित वाणाची लागवड केली होती. त्यापूर्वी व्हर्जिन जातीची तूर घेतली जात असे. त्या तुलनेत गोदावरी या वाणाचा अनुभव समाधानकारक असून, उत्पादनात वाढ झाली असल्याचे दादासाहेब शिंदे सांगतात.

लागवड नियोजन

लागवड करण्यापूर्वी शेताची पूर्वमशागत करण्यात आली. जमिनीची नांगरणी करून रोटाव्हेटर मारून घेतला.

पूर्वमशागत झाल्यानंतर पाच फूट अंतरावर ठिबक सिंचनाच्या नळ्या अंथरून घेतल्या.

टोकण पद्धतीने दोन फूट अंतरावर मजुरांच्या मदतीने लागवड करण्यात आली. लागवडीसाठी एकरी २ किलो बियाण्याचा वापर करण्यात आला. साधारणपणे २५ जूनच्या दरम्यान लागवड करण्यात आली.

लागवडीपूर्वी शिफारशीत घटकांची बीजप्रक्रिया करण्यात आली.

सध्या पिकाची उगवण चांगली झाली असून, पुढील ५ ते ६ दिवसांत ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे १ फूट रुंदीचे बेड तयार करण्यात येतील.

लागवडीनंतर २० ते २२ दिवसांनी बेड तयार केल्यानंतर घरी तयार केलेल्या गांडूळ खताचा वापर केला जाईल. लागवडीमध्ये गांडूळ खताचा पुरेसा वापर केल्यामुळे पिकास त्याचा चांगला फायदा होतो.

लागवडीनंतर सुरुवातीच्या ५५ ते ६५ दिवसांच्या कालावधीत दोन वेळा शेंडा खोडला जातो. साधारण ३५ व्या आणि ५५ व्या शेंडा खुडणी केली जाते.

शाश्‍वत सिंचनाची सोय होण्याकरिता शेतामध्ये २ कोटी लिटर पाणी क्षमतेचे शेततळे उभारले आहे. शिवाय उपलब्ध पाण्याचे योग्य वापर व्हावा, यासाठी संपूर्ण क्षेत्रावर सूक्ष्म सिंचनाची सोय केली आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार पावसाअभावी सुद्धा पिकाला पाणी मिळते.

अन्नद्रव्ये व्यवस्थापन

रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्यावर भर दिला जातो. बेड तयार केल्यानंतर म्हणजेच लागवडीनंतर १५ दिवसांनी एकरी पाच किलो युरियाची मात्रा देण्यात येईल. त्यानंतर १२.६१.०, २४.२४.०, २४.२४.०, ०.५२.३४, ०.५२.३४, ०.०.५० या खतांच्या मात्रा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार टप्प्याटप्प्याने दिली जातील. त्यानुसार अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर करण्यावर भर दिला जातो. उत्पादन वाढ मिळविण्यासाठी ठिबकद्वारे वेळेवर सिंचन आणि खत व्यवस्थापन या दोन बाबींवर भर दिला जात असल्याचे श्री. शिंदे सांगतात.

सुरुवातीच्या ५५ ते ६५ दिवसांत शेंडा खोडल्यानंतर पिकाची वाढ चांगली होण्यासाठी युरिया, १२ः६१ः००, २४.२४.० या खताच्या मात्रा दिल्या जातात.

फुलधारणा होण्यासाठी ०ः५२ः३४ या खताचे ३ डोस ८ ते १० दिवसांच्या अंतराने दिले जातात.

शेंगधारणा झाल्यानंतर शेंगा तयार होऊन दाणे पोसण्यासाठी ०.०.५० या खताचे १० आणि १५ दिवसांच्या अंतराने २ डोस दिले जातील.

कीड- रोग नियंत्रण

तूर पिकाचे कीड-रोगाच्या प्रादुर्भावासाठी नियमित निरीक्षण केले जाते. तूर पिकामध्ये शेंग लागण्याच्या काळात शेंग पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव मागील वर्षी दिसून आला होता. त्या वेळी अळीच्या नियंत्रणासाठी शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांची वेळेत फवारणी केल्यामुळे पुढील नुकसान टाळणे शक्य झाले.

या वर्षी देखील कीड-रोगाच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण केले जाईल. आवश्यकता भासल्यास रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची फवारणी घेतली जाईल. योग्य वेळी उपाययोजना केल्यामुळे प्रभावी कीड नियंत्रण होण्यास मदत मिळते, असे श्री. शिंदे सांगतात.

आगामी नियोजन

सध्या पिकाची उगवण चांगली झाली आहे. पुढील आठवडाभरात ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे बेड तयार केले जातील. त्यानंतर रासायनिक खतांच्या मात्रा टप्प्याटप्प्याने दिल्या जातील.

पुढील काळात पावसात खंड पडल्यास सूक्ष्म सिंचनाने पिकाची पाण्याची गरज भागविण्यावर भर दिला जाईल.

पुढील पंधरवड्यात पिकाची वाढ चांगली होण्यासाठी नॅनो युरियाची फवारणी घेतली जाईल.

- दादासाहेब शिंदे, ९८२२५०४२०५, ९८८१२५७१७२

(शब्दांकन : संतोष मुंढे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US trade deal: अमेरिकेच्या व्यापार करारामुळे भारतातील दूध उत्पादकांना धोका; एसबीआयच्या अहवालात इशारा

Crop Insurance: पीक विम्यात आता बदल अशक्य; तरीही आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी बैठक: कोकाटेंची विधानपरिषदेत घोषणा

Kharif Sowing : धाराशिवमध्ये उडीद, कांदा लागवडीला प्राधान्य

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप

Onion Cultivation : खरीप कांदा लागवड यंदा स्थिर राहणार

SCROLL FOR NEXT