Pune News : राज्यातील ४८ लोकसभा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारांकडून अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. यादरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे आधीच घोषित केले होते. याप्रमाणे ते आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी (ता.०२) भरणार आहेत. याआधी तुपकर यांनी महायुतीसह महायुतीचे उमेदवार माजी खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर टीका केली आहे. तसेच, 'ही निवडणूक सर्वसामान्यांसह भूमिहीन आणि शेतकऱ्यांनी हाती घेतली असून मी अपक्ष नाही. तर भूमिहीन आणि शेतकऱ्यांचा उमेदवार आहे. यामुळे आपला विजय होईल', असा विश्वास तुपकर यांनी व्यक्त केला आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर बुलढाण्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून ते माजी खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. तुपकर, आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी शेतकरी, तरूण आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असेल. यामुळे सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली असून आपला विजय निश्चित होईल, असे तुपकर यांनी म्हटले आहे.
तसेच सर्वसामान्य, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी लढत असून ही लढत सामान्य जनता विरुध्द नेता अशी आहे. तर कोणी फक्त भूमिपुत्र गाडीवर लिहले म्हणून तो भूमिपुत्र होत नाही. ते आपल्या कामातून दाखवून द्यावे लागते. तर तीन वेळा खासदार असणाऱ्या नेत्याने शेतकऱ्यांचे किती प्रश्न सोडवले. किती प्रश्न संसंदेत मांडले? असा सवाल तुपकर यांनी माजी खासदार जाधव यांना केला आहे.
तसेच 'आपला अर्ज भरण्यासाठी लोक स्वत: येणार असून महायुतीच्या लोकांना रॅलीसाठी लोकांना मजुरीवर आणावे लागते. लोकांना मटण, दारू आणि दाब्याचे आमिष द्यावे लागते', अशी टीका देखील तुपकर यांनी केली आहे. तसेच फक्त एक नाली बांधली आणि सभागृ बांधले म्हणजे विकास झाला का? असा सवाल तुपकर यांनी केला आहे.
तसेच आज शेतकरी आत्महत्या करत असून बुलढाणा जिल्हा देशात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापसाला भाव नाही. यावर आपल्या खासदरांनी कधी आवाज उठवला? ते जिल्ह्यात कधी दिसले नाहीत? उलट जिल्ह्यातील सर्व कामे रखडली असून फक्त पैशाच्या भरवशावर निवडणुका जिंकता येत नाहीत, असा टोला तुपकर यांनी महायुतीसह महायुतीचे उमेदवार माजी जाधव यांना लगावला आहे.