This is a conversation with Director of Central Cotton Review Dr. Vijay Waghmare:
देशाची कापूस उत्पादकता कमी आहे. त्या संदर्भात काय करणार?
हे खरे आहे, की देशाचे प्रति हेक्टर प्रति किलो रुई उत्पादन कमी आहे. त्यात वाढ करण्यासाठी सघन कापूस लागवड पद्धती (हाय डेन्सिटी प्लॅन्टिंग सिस्टिम-एचडीपीएस) राबविण्यात आला. त्याकरिता केंद्र सरकारने ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली. आठ राज्यांत हलक्या जमिनींमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी झाली. सोबतच चांगल्या प्रतीच्या जमिनीत अतिसघन कापूस लागवड प्रकल्प राबविला गेला. या लागवड पद्धतीत एकरी २९ हजार ४०० झाडे बसतात. यात ९० बाय १५ सेंटिमीटर असे अंतर राहते. परंतु यामध्ये बियाणे दर वाढतो. पारंपरिक पद्धतीत एकरी दोन पाकिटे (प्रत्येकी ४७५ ग्रॅम बियाणे) लागतात. सघन लागवडीत सहा पाकिटांची गरज राहते.
बियाण्यांच्या उपलब्धतेचा प्रश्न कसा सोडवणार?
सघन कापूस लागवड पद्धतीसाठी एकरी अडीच ते तीन किलो बियाणे लागते. देशाचे सरासरी कापूस लागवड क्षेत्र १३० हेक्टर आहे. इतक्या मोठ्या क्षेत्रावर सघन लागवड तंत्राचा वापर झाल्यास बियाणे उपलब्धतेची अडचण भासणार आहे. त्यावर उपाय म्हणजे संकरित ऐवजी सरळ वाणांचा वापर योग्य ठरेल. यातूनच शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरता येईल. शेतकऱ्यांचा बियाण्यांवरचा खर्च कमी होईल.
सरळ वाणांचा वापर जगात होतो का?
अपवाद वगळता जगात सर्वदूर सरळ वाणांचाच वापर होतो. ९०० रुपयांना ४५० ग्रॅम बियाणे असा सध्या बीटी बियाण्यांचा दर आहे. याउलट सरळ वाणाचे बियाणे ३०० रुपये किलोने मिळू शकेल. शेतकऱ्यांचा बियाण्यावरील खर्च यामुळे वाचणार असल्याने आम्ही येत्या काळात सरळ वाणाच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यामध्ये बोंडाचा आकार, फायबर साइज, जिनिंग टक्केवारी या बाबी विचारात घेतल्या जातील. अशा वाणात रुईचे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा अधिक हवे, यावरही भर असेल.
कापसाच्या सरळ वाणांची उपलब्धता आहे का?
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत असताना माझ्या विभागाकडून देशी कापसाचे पाच वाण विकसित करण्यात आले आहेत. सीएनए-१०२८, १०३२, १०३१, १०५४, १००३ याप्रमाणे ते आहेत. कापसाच्या या सरळ वाणांना मध्य प्रदेशात मोठी मागणी आहे. एका एकराला सरळ वाणाच्या अडीच ते तीन किलो बियाण्यांची गरज पडते. या वाणांचा उतारा एकरी १० क्विंटलपेक्षा अधिक मिळाला आहे. याची स्टेपल लेंग्थ २६ आहे. या वाणांच्या माध्यमातून मिळणाऱ्या कापसाची जाडी अधिक आहे. कमी लांबीच्या धाग्याचा वापर अंतर्वस्त्र तयार करण्यासाठी होऊ शकतो. याची पाणी पकडून ठेवण्याची क्षमता अधिक आहे. हलक्या जमिनीत हा कापूस चांगला येतो, असेही निरीक्षण आहे.
आपण कापूस पिकातील तंत्रज्ञानात कोणत्या क्रमांकावर आहोत?
जगात उपलब्ध असलेले कापसातील सर्वच तंत्रज्ञान प्रभावी नाही. त्यामुळे त्याचा सरसकट अंगीकार अपेक्षित नाही. आपण विदेशी जर्मप्लाझम भारतात आणल्यास तो जीन आपल्या वाणात टाकल्यानंतर त्याच्या विविध प्रक्षेत्रांवर चाचण्या घेतल्या जातील. या सर्व बाबींना पाच ते सहा वर्षाचा कालावधी लागणार आहे. विशेष म्हणजे १२० दिवसांनंतर यातील जिवाणूचा प्रभाव कमी होतो. ते तितकेसे परिणामकारक राहत नाही. याच कारणामुळे नजीकच्या काळात देशात गुलाबी बोंड अळीची प्रतिकारशक्ती वाढत असल्याचे निरीक्षण आहे. जगातील इतर कापूस उत्पादक देशांमध्ये देखील गुलाबी बोंड अळीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविता आलेले नाही. त्यामुळेच जगात असलेल्या सर्वच तंत्रज्ञानाची मागणी उपयोगाची नाही.
बोंडसडबद्दल काय सांगाल?
कापसाचा कालावधी जसा वाढेल तसा त्यावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. फरदड घेताना नवी पालवी फुटते. अशा वेळी मावा, तुडतुडे पुन्हा सक्रिय होतात. त्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठी पुन्हा कीटकनाशकाची फवारणी करावी लागते. त्यामुळेच कापसात फवारणीचे प्रमाण अधिक आहे. यातून उत्पादन खर्चही वाढतो. पाऊस बरसल्यावर तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण कायम राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत बोंडसड होते. त्याची दखल घेत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने काही शिफारशी केल्या आहेत.
गुलाबी बोंड अळीबद्दल काय सांगाल?
गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण जगात कोठेही शक्य झाले नाही. त्यामुळेच याचा प्रादुर्भाव वाढता असल्याने जागतिक स्तरावर संशोधकांची चिंता वाढली आहे. त्याचा परिणाम कापूस लागवड क्षेत्र कमी होण्यावर झाला आहे. पंजाबमध्ये कापसाची लागवड साडेचार लाख हेक्टरवरून गेल्या वर्षी दीड लाख हेक्टरवर आली. हरियानात देखील कापूस लागवड घटली. गुलाबी बोंड अळीमुळे हे क्षेत्र कमी झाले, असे निरीक्षण आहे. महाराष्ट्रातही कापूस लागवड ४२ लाख हेक्टरवरून ४० लाख हेक्टरवर आली. एकूण देशाचा विचार करता कापूस लागवड क्षेत्र १३० लाख हेक्टरवरून गेल्या हंगामात ११३ लाख हेक्टरवर घसरले.
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी काय प्रयत्न होत आहेत?
देशातील आठ राज्यांत २०१८ पासून गुलाबी बोंड अळी नियंत्रण प्रकल्प राबविला जात आहे. २०२५ पर्यंत त्याची मुदत आहे. या प्रकल्पामधून गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाविषयी काही शिफारशी करण्यात आल्या आहेत. लखनौ येथील नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने गुलाबी बोंड अळीवर तंत्रज्ञान विकसित केले आहे. या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्याचा विचार आहे. जमिनीचा कर्ब ०.७ ते १ पर्यंत गेल्यास अशा जमिनीत पिकाची प्रतिकारशक्ती वाढते आणि असे पीक सुदृढ असल्याने अशा पिकात कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो, असेही निरीक्षण आहे.
कापसाच्या पिकाचे ६०, ६० ते ९०, ९० ते १२० दिवस या कालावधीत शिफारशीत पद्धतीप्रमाणे व्यवस्थापन केल्यास गुलाबी बोंड अळीचे काही अंशी नियंत्रण होऊ शकते. असे असले तरी एका शेतकऱ्याने कापसाचे पीक काढल्यास बाजूच्या शेतात पीक उभे असते. त्यामुळे गुलाबी बोंड अळीला खाद्य मिळत राहते. परिणामी गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण पूर्णपणे शक्य नाही.
इतर देशांविषयी काय सांगाल?
उझबेकिस्तान देशात कापूस पिकासाठी मी सल्लागार म्हणून काम पाहत आहे. दोन वर्षांपासून हा प्रकल्प सुरू आहे. त्या भागातही कापूस शेती होते. त्या ठिकाणी व्यवस्थापन चांगले आहे. वातावरण पोषक असल्याने उत्पादकता अधिक राहते. कीड-रोग कमी तसेच फायबर क्वालिटीदेखील चांगली आहे. मात्र सरसकट तेथील शिफारशी आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी उपयोगाच्या ठरणार नाहीत. त्याचप्रमाणे भारतातील तंत्रज्ञान तेथे उपयोगाचे ठरत नाही.
कापूस पिकातील यांत्रिकीकरणाविषयी काय सांगाल?
मजुरांच्या उपलब्धतेची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यातून उत्पादन खर्चही वाढतो. परिणामी कापूस शेतीत यांत्रिकीकरण झाले पाहिजे. सध्या काही कंपन्यांची वेचणी यंत्र आहेत. मात्र अशा वेचणीत कचऱ्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे कचरा काढण्यासाठी ट्रॅक्टर माउंटेड क्लिनिंग युनिट हवे. भोपाळ (मध्य प्रदेश) मध्ये असलेली केंद्रीय अभियांत्रिकी संस्था यावर काम करीत आहे. आमच्याकडे अभियांत्रिकी शाखा असली तरी त्यात मनुष्यबळ कमी असल्याने आमच्या अभियांत्रिकी विषयक संशोधनास मर्यादा आहेत. यंत्रद्वारे कापसाची वेचणी करावयाची असल्यास त्याकरिता झाडावरील पाने गळून पडावी, असा निकष आहे. आतापर्यंत भारतात यंत्राद्वारे वेचणी होत नव्हती. त्यामुळे पाने गळतीसाठी उपयोगात येणाऱ्या डिफॉलियंटच्या वापराविषयी धोरण तयार नाही. नजीकच्या काळात कापूस वेचणी यंत्राला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता पाहता संस्थेने डिफॉलियंटचे फॉर्म्यूलेशन विकसित केले आहे. ते ९२ टक्के प्रभावी असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे. संस्थेतील तज्ज्ञ मेश्राम यांनी यावर काम केले आहे.
कापसातील तणनाशक वापराबद्दल आपले मत काय?
तणनाशकाची फवारणी केल्यानंतर ते जमिनीवर पडल्यास न्यूट्रल होते, असा दावा कंपन्यांकडून केला जातो. मात्र तणनाशकाची फवारणी केल्यास त्याचा अंश (रेसिड्यू) किती दिवस राहतो, विशेषतः कापसात याचे परिणाम कोणते हे अभ्यासण्याची गरज आहे. तणनाशकाचे रेसिड्यू जमिनीत अधिक दिवस राहिल्यास त्यानंतर लागवड केलेल्या दुसऱ्या पिकावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या पिकाची उत्पादकता देखील प्रभावित होईल, अशी भीती आहे. जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंवर देखील त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळेच कापूस पिकात तणनाशकाला सहनशील तंत्रज्ञान उपलब्धतेची मागणी होत असली तरी त्याचे दृश्य-अदृश्य परिणाम अभ्यासले पाहिजेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.