Mango Orchard Management Agrowon
ॲग्रो विशेष

Kesar Mango Management : केसर आंबा बागेत काटेकोर व्यवस्थापनावर भर

Team Agrowon

शेतकरी नियोजन

पीक : केसर आंबा

शेतकरी : समर्थ सोपानराव कारेगावकर

गाव : कारेगाव, ता.जि. परभणी

एकूण शेती : ४० एकर

केसर आंबा क्षेत्र : ५ एकर (जुनी लागवड), ३ एकर (नवीन लागवड)

परभणी जिल्ह्यातील कारेगाव (ता. परभणी) येथील तरुण शेतकरी समर्थ सोपानराव कारेगावकर हे मागील १२ वर्षांपासून केसर आंबा बागेचे कोटेकोर व्यवस्थापन करत आहेत. दरवर्षी दर्जेदार केशर आंबा उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या केसर आंबा विक्रीची व्यवस्था त्यांनी केली आहे.

समर्थ यांनी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून बी.एस्सी. ॲग्री, तर गुजरातमधील दंतेवाडा येथील सरदार पटेल कृषी विद्यापीठातून एम.एस्सी.(कृषी अर्थशास्त्र) पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी किंवा व्यवसायाच्या मागे न लागता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. मागील ८ वर्षांपासून समर्थ हे पूर्णवेळ फळबाग केंद्रित शेती करत आहेत.

त्यांच्या संयुक्त कुटुंबाची हलक्या ते भारी प्रकारची ४० एकर जमीन आहे. सिंचनासाठी विहिरीची सुविधा आहे. पावसाच्या असमान वितरणामुळे या भागात वर्षे दोन वर्षाआड दुष्काळी स्थिती उद्भवते. अशा स्थितीत कमी पाण्यावर येणाऱ्या फळपिकांवर त्यांनी लक्षकेंद्रित केले.

सध्या त्यांच्याकडे आवळा ८ एकर, ऊस ३ एकर, सोयाबीन ८ एकर, हरभरा ४ एकर आणि हळद ३ एकरांत आहे. याशिवाय त्यांनी मागील वर्षी घन पद्धतीने ३ एकरांत केसर, तर २ एकरांत दशहरी आंब्याची नव्याने लागवड केली आहे. समर्थ यांनी शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करीत प्रयोगशीलता जपली आहे. त्यांची फळपीक रोपवाटिकादेखील आहे.

केसर आंबा लागवड

कारेगावकर यांनी २०१२ मध्ये ६ बाय ५ मीटर अंतरावर ५ एकरांवर केसर लागवड केली आहे. त्यात ५०० झाडे आहेत.

लागवडीनंतर पाचव्या वर्षी आंबा उत्पादन घेण्यास सुरुवात केली. पहिली तीन वर्षे कमी आंबा उत्पादन मिळाले. मात्र हळूहळू आंबा उत्पादनात वाढ होत गेली. मागील ३ वर्षांत एकरी सरासरी २० ते २८ टनांपर्यंत आंबा उत्पादन त्यांनी घेतले आहे.

मागील वर्षी घन पद्धतीने ३ एकरांत केसर आंब्याची १५०० झाडे, तर दशहरी आंब्याची १००० झाडे लावली आहेत. संपूर्ण लागवड १२ बाय ६ फूट अंतरावर आहे.

खत, सिंचन व्यवस्थापन

संपूर्ण लागवडीत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात येते. तसेच त्या माध्यमातून सिंगल सुपर फॉस्फेट, शेण स्लरी फर्टिगेशनद्वारे दिली जाते.

शेणखत आणि शेण स्लरी यांचा वापर जास्त करण्यावर विशेष भर दिला जातो. दरवर्षी जून महिन्यात पाऊस पडण्यापूर्वी ५ एकरांत सुमारे १० ते १२ ट्रॉली प्रमाणे शेणखत मात्रा दिली जाते.

कीड-रोग व्यवस्थापन

वातावरणातील बदलांचा आंब्याच्या झाडांवर परिणाम होतो आहे. त्यामुळे खत व्यवस्थापनासह कीड-रोगांचे काटेकोर व्यवस्थापन करण्यावर त्यांचा भर असतो.

फळमाशीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावले जातात.

तुडतुडे, फुलकिडे, तसेच बुरशीजन्य रोगांच्या व्यवस्थापनासाठी दरवर्षी वेळापत्रकानुसार प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातात. जैविक आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो.

मोहर येण्यास सुरुवात झाल्यावर निंबोळी अर्क, दशपर्णी अर्काच्या फवारण्या घेतल्या जातात.

फळ रोपवाटिका

कारेगावकर यांनी शेतामध्ये फळपिकांची रोपवाटिका तयार केली आहे. यात केसर आंबा, दशहरी आंबा तसेच सीताफळ रोपे तयार केली जातात. रोपवाटिकेच्या माध्यमातून सरासरी १० हजारांवर रोपे तयार करून त्यांची विविध जिल्ह्यांमध्ये विक्री केली जाते. या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत त्यांनी तयार केला आहे.

मागील कामकाज

मोहर फुटण्यापूर्वी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सूक्ष्म अन्नद्रव्ये, बुरशीनाशके, कीटकनाशकांची फवारणी घेतल्या आहेत. पुन्हा १५ दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये, बुरशीनाशके आणि कीटकनाशकांच्या आलटून पालटून फवारण्या घेतल्या जातात.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सून्नोत्तर पाऊस झाला. त्यामुळे जास्त मोहर फुटला आहे. त्यामुळे झाडे मोहराने बहरली आहेत.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निंबोळी अर्क व ट्रायकोडर्मा यांची फवारणी केली.

मोहर व फलधारणा सुरू झाल्यानंतर तुडतुडे, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या आहेत.

सध्या ठिबकद्वारे बागेस पाणी देणे सुरू केले आहे. सध्या आठवड्याला प्रति झाड ६० लिटर पाणी देणे सुरू आहे.

आगामी नियोजन

सद्यःस्थितीत आंबा झाडे मोहराने बहरून गेलेली आहेत. काही झाडांवर फलधारणा सुरू आहे. मोहर आल्यापासून साधारण १४० ते १५० दिवसांत आंबा परिपक्व होतो.

पुढील आठवडाभर प्रति झाड ६० लिटर प्रमाणे, तर त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रति झाड प्रति आठवडा १२० लिटरपर्यंत सिंचन केले जाईल.

साधारण २० फेब्रुवारी आणि २० मार्चला प्रवाही पद्धतीने दोन सिंचन केले जातील. त्यानंतर पाणी देणे बंद केले जाईल.

मार्च महिन्यात कैऱ्यांचा आकार वाढून फळे आकारास येतात. मे महिन्यात फळे काढणीस येतील.

आंबा काढणीच्या एक महिना आधी निंबोळी अर्क व ट्रायकोडर्मा फवारणी घेतली जाईल. ही फवारणी सकाळी ७ पूर्वी व सायंकाळी साडेपाचनंतर केली जाते.

संपूर्ण बागेतील फळांची काढणी पूर्ण झाल्यानंतर झाडांवरील वाळलेल्या फांद्या काढून बागेची स्वच्छता केली जाईल. त्यानंतर रासायनिक फवारणी घेतली जाईल.

विक्री नियोजन

दरवर्षी उत्पादन खर्च आणि बाजारभावाचा अंदाज घेऊन आंबा विक्री केली जाते. व्यापाऱ्यांनी प्रतिकिलो किमान ७० रुपये दर दिले, तर थेट बागेतून विक्री केली जाते. परंतु व्यापाऱ्यांनी कमी दराने मागणी केल्यास स्वतः विक्री करण्यावर समर्थ यांचा भर असतो. चांगला दर मिळविण्यासाठी परिपक्व आंबा फळांची तोडणी ही महत्त्वाची बाब आहे. तोडणी कामासाठी कुशल मजूर लावले जातात.

संपूर्ण बागेतील फळांची तोडणी पूर्ण झाल्यावर शेतामध्ये साळीचे (साळवण) तणस, गवताचे काड, पेपर कटिंग याचा माच लावून नैसर्गिकरीत्या आंबे पिकविण्यास ठेवले जातात. त्यासाठी साधारण ८ ते १२ दिवसांचा कालावधी लागतो. आंबा तयार झाल्यावर कागदी बॉक्समध्ये २ किलो, ५ किलो, १० किलो आणि २० किलो वजनामध्ये पॅकिंग करून विक्री केली जाते. परभणी शहरातील ग्राहकांना मागणीनुसार घरपोच थेट विक्रीही केली जाते, असे समर्थ कारेगावकर सांगतात.

समर्थ कारेगावकर, ९४२३४४३३१८ (शब्दांकन : माणिक रासवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT