Pomegranate Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Farming: डाळिंबाचा दर्जा, चकाकी योग्य राखण्यासाठी प्रयत्न

Pomegranate Fruit Production: सोलापूरच्या माढा तालुक्यातील बेंबळे गावातील कांतिलाल काळे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने डाळिंब शेतीत दर्जा, उत्पादन व चमक राखण्यात यश मिळवले आहे. पावसाळी हवामानातही बुरशी व रोगांवर नियंत्रण ठेवत त्यांनी साडेसहा एकरांत २९२५ झाडांची उत्कृष्ट बाग उभी केली आहे.

सुदर्शन सुतार

Pomegranate Farming Management:

शेतकरी नियोजन । पीक : डाळिंब

शेतकरी : कांतिलाल मारुती काळे

गाव : बेंबळे, ता. माढा, जि. सोलापूर

एकूण शेती : १५ एकर

डाळिंब क्षेत्र : साडेसहा एकर

एकूण झाडे : २९२५ झाडे

बेंबळे (ता. माढा) येथे कांतिलाल मारुती काळे यांची १५ एकर शेती आहे. त्यात साडेसहा एकरांवर डाळिंब लागवड आहे. उर्वरित क्षेत्रावर ऊस लागवड आहे. सिंचनासाठी दोन विहिरी असून त्याद्वारे सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाते. सध्या सुमारे साडेसहा एकरांत डाळिंब लागवड असून, त्यात २९२५ झाडे आहे. सर्व लागवड ही भगव्या वाणाची आहे. बागेत प्रामुख्याने आंबिया बहरातील फळांचे उत्पादन घेतले जाते. सध्या साडेतीन एकरांतील बाग फळधारणा अवस्थेमध्ये आहे. पुढील महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात बागेतील डाळिंब काढणीच्या कामांस सुरुवात होईल. त्यातून प्रतिझाड सरासरी २५ ते ३० किलो डाळिंब उत्पादन अपेक्षित आहे. सध्या डाळिंब फळांचा दर्जा, चकाकी आणि आकार योग्य राखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे कांतिलाल काळे सांगतात.

लागवड क्षेत्रात वाढ

कांतिलाल काळे यांचे एकत्रित कुटुंब असून वडील मारुती, आई शकुंतला, बंधू शांतिलाल यांच्यासह संपूर्ण कुटुंबातील सदस्य शेतात राबतात. बंधू शांतिलाल यांच्या मदतीने कांतिलाल यांनी २००८ पासून शेतीमध्ये लक्षकेंद्रित केले. त्यावेळी ऊस हे प्रमुख पीक, तर हंगामी केळी लागवड केली जात असे. २०१६ मध्ये प्रायोगित तत्त्वावर एक एकर क्षेत्रात डाळिंब लागवड करण्यात आली. हळूहळू डाळिंब बाग व्यवस्थापनातील बारकावे समजून प्रत्येक बाबीचा अभ्यास करून सुयोग्य नियोजनावर भर दिला. त्यानंतर २०२० मध्ये आणखी अडीच एकरांवर डाळिंब लागवड केली. दरम्यानच्या काळात बागेत तेल्या रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात जाणवला. परंतु त्यावर यशस्वीरीत्या मात करत बाग राखली. या वर्षी मार्च महिन्यात आणखी तीन एकरांत नव्याने डाळिंब लागवड केली आहे. संपूर्ण डाळिंब लागवडीत दोन ओळींत १२ फूट, तर दोन झाडांत ८ फूट अंतर राखत करण्यात आली आहे. बागेत प्रामुख्याने आंबिया बहर धरला जातो.

बहर नियोजन

प्रामुख्याने डिसेंबर-जानेवारीमध्ये आंबिया बहर धरला जातो. बहर नियोजनानुसार १५ नोव्हेंबरनंतर बाग ताणावर सोडली जाते.

जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात बागेची छाटणी करून बोर्डोची फवारणी घेतली जाते. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी इथ्रेलची फवारणी केली जाते.

बागेत छाटणीच्या कामांस सुरुवात करण्यापूर्वी शेणखत आणि रासायनिक खताची मात्रा दिली जाते. छाटणीच्या अगोदर ८ ते १० दिवस १०ः२६ः२६, सिंगल सुपर फॉस्फेट, सिलिकॉनयुक्त खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, निंबोळी पेंड यांच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

बागेस साधारणपणे ६० ते ७० दिवसांचा ताण दिला जातो. ठिबकद्वारे ८ तास सिंचन करून बागेचा ताण तोडला जातो. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा दिली जाते.

फुलकिडे आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीच्या काळात प्रतिबंधात्मक रासायनिक फवारण्या घेतल्या जातात.

ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ०ः४२ः४७ आणि ०ः ६०ः२० या खतांचा आलटून-पालटून वापर केला जातो. फवारणद्वारे चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि ०ः५२ः३४ चा वापर केला जातो.

पांढरी मुळी सुदृढ होण्याकरिता शिफारशीत घटकांचा वापर केला जातो. शिवाय जैविक खते दिली जातात.

जमिनीतील वाफसा स्थिती पाहून सिंचनाचे नियोजन केले जाते. वातावरणानुसार रासायनिक घटकांच्या फवारण्या घेतल्या जातात.

मागील कामकाज

डाळिंब बागेचा बहार धरून पाच महिने झाले आहेत. सध्या फळे पक्वतेच्या अवस्थेत आहेत.

फळांचा आकार, चकाकी आणि दर्जा उत्तम मिळविण्यासाठी स्लरी, सरकी पेंड, गूळ आणि केएसबी यांचे मिश्रण तयार करून ते टाकीमध्ये ६ दिवस भिजत ठेवले. सहाव्या दिवशी वस्रगाळ करून ठिबकद्वारे त्याचा बागेस वापर करण्यात आला आहे.

बहर धरल्यापासून ६ दिवसांच्या अंतराने नॅनो पोटॅशच्या तीन फवारण्या घेण्यात आल्या आहे. त्यामुळे फळांना चांगला रंग व चकाकी येण्यास मदत होते.

सध्या ढगाळ हवामान आणि पाऊस अशी स्थिती आहे. त्यामुळे फळांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या घेण्यात आल्या आहेत.

मागील २ महिन्यांपूर्वी बागेवर

क्रॉपकव्हरचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे बागेतील फळांचे उन्ह, पाऊस आणि गारपीट यापासून संरक्षण होण्यास मदत मिळते.

आगामी कामकाज

आगामी काळात बागेतील फळांचा दर्जा राखण्यावर भर देण्यात येईल. पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फळ काढणीस सुरुवात होईल. डाळिंबाचा दर्जा, चकाकी आणि आकार योग्य राखण्यासाठी प्रयत्न केले जातील.

सध्याच्या हवामान स्थितीत फळांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी बागेचे नियमित निरीक्षण करून आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यावर भर दिला जाईल. गरज भासल्यास शिफारशीत बुरशीनाशकांचा वापर केला जाईल.

बागेत अन्नद्रव्ये तसेच कीड-रोग व्यवस्थापनावर भर देण्यात येईल. अन्नद्रव्यांच्या मात्रा आलटून-पालटून दिल्या जातील.

सध्या पावसाळी स्थिती असल्यामुळे सिंचनाची आवश्यकता वाटत नाही. परंतु जमिनीतील वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचनावर भर दिला जाईल.

- कांतिलाल काळे, ९५५२१३१३९८

(शब्दांकन : सुदर्शन सुतार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Nutrients: पीकवाढीसाठी गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे महत्त्व

Oilseed Sowing: तेलबिया पेरणी स्थिर; सूर्यफूल पेरा रखडला

Artificial Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्तेमागील पायाभूत तंत्रज्ञान

Turmeric Quality: जानेफळ येथे हळद गुणवत्ता सुधार विषयावर प्रशिक्षण

Livestock Shed Management: आधुनिक तंत्रज्ञानातून गोठ्याचे स्मार्ट व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT