Sugarcane Summer Management Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Summer Management : उन्हाळ्यातील ऊस व्यवस्थापन

Sugarcane Farming : मार्च ते जून या कालावधीत तीव्र उष्ण तापमान व पाण्याची कमतरता यामुळे उसाच्या विविध वाढीच्या अवस्थांवर परिणाम होतो. या कालावधीत सरीत पाचट पसरून त्यावर प्रतिटन पाचटासाठी ८ किलो युरिया, १० किलो सुपर फॉस्फेट आणि १ लिटर पाचट कुजवणाऱ्या जिवाणूचा वापर करावा.

Team Agrowon

आर. एन. गायकवाड, डॉ. ए. डी. कडलग

मार्च ते जून या कालावधीत तीव्र उष्ण तापमान व पाण्याची कमतरता यामुळे उसाच्या विविध वाढीच्या अवस्थांवर परिणाम होतो. या कालावधीत सरीत पाचट पसरून त्यावर प्रतिटन पाचटासाठी ८ किलो युरिया, १० किलो सुपर फॉस्फेट आणि १ लिटर पाचट कुजवणाऱ्या जिवाणूचा वापर करावा. पाण्याच्या दोन पाळींतील अंतर २० दिवसांपेक्षा जास्त वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.

फेब्रुवारी ते जून या कालावधीत उसावर पाण्याचा ताण पडून उत्पादनामध्ये घट दिसून येते. ताज्या उसात वजनाच्या ७० टक्के वजन पाण्याचे असते. प्रकाश संश्‍लेषण क्रियेमुळे उसामध्ये साखर तयार होते. साखर हा पदार्थ कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयुगाने बनतो. यातील हायड्रोजन हा केवळ पाण्यातून मिळतो. त्यामुळे पाणी नसेल तर हायड्रोजन मिळणार नाही. साखर निर्मिती होणार नाही. पेशीच्या रिक्तिकेमध्ये मुबलक पाणी असल्यास पेशी फुगलेल्या राहतात. पेशी फुगलेल्या असतील तरच फुटवे येणे, उसाच्या कांड्या वाढणे, कांड्यांची लांबी वाढते. उसाच्या १ ग्रॅम शुष्क वजनासाठी २५० ग्रॅम पाणी शोषण केले जाते.

पाणी व्यवस्थापन

मार्च ते जून या कालावधीत तीव्र उष्ण तापमान व पाण्याची कमतरता यामुळे उसाच्या विविध वाढीच्या अवस्थांवर परिणाम होतो. या कालावधीत तापमानात वाढ झाल्यामुळे पिकातील ओलाव्यात घट होते.

या कालावधीत दिवस व रात्रीच्या तापमानातील फरक कमी होऊन रात्रीचे तापमान वाढलेले असते.

जमिनीतील उपलब्ध पाणी कमी होऊन मुळाच्या जवळील तापमान वाढून त्यांची कार्यक्षमता कमी होते.

परिणामी, मुळाद्वारे पाणी व अन्नद्रव्याच्या शोषणात घट होते.

उसाच्या पानावरील पर्णरंध्राद्वारे होणारे बाष्पीभवन कमालीचे वाढते.

आडसाली उसाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो, कारण ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेत असतो.

पूर्वहंगामी ऊस देखील पूर्ण वाढीच्या अवस्थेत असतो. वाढ खुंटते, कांड्यांची लांबी व जाडी कमी होते.

सुरू व खोडवा उसामध्ये तापमान वाढ झाल्यामुळे खोड किडीचा प्रादुर्भाव वाढतो.

सुरू व खोडवा उसाला फूट कमी होऊन गाळप योग्य उसांची संख्या कमी मिळते, परिणामी उत्पादनामध्ये घट येते.

पाण्याच्या ताणाचे

होणारे परिणाम

पाने बुडक्याकडून शेंड्याकडे वाळत जातात.

मुळांची कार्यक्षमता घटते, त्यामुळे पाणी व अन्नद्रव्यांचे अपुरे शोषण व प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते.

अन्नरसाचे विविध भागांना होणारे वहन कमी होऊन, परिणामी कांड्याची व पानांची लांबी, रुंदी कमी होते. हरितद्रव्याचे प्रमाण घटते.

तंतुमय पदार्थाचे प्रमाण वाढून उसात दशीचे प्रमाण वाढून वजन, साखर उतारा घटतो.

आडसाली, पूर्वहंगामी उसाची वाढ खुंटून कांड्यांची लांबी, जाडी कमी होते.

सुरू, खोडवा उसात फुटव्यांचे प्रमाण कमी होऊन गाळपालायक उसाच्या संख्येत घट होते.

पीक व्यवस्थापन

बाष्पीभवन पात्राचा वापर करून एकूण ७५ मिमी बाष्पीभवन झाल्यावर पिकास पाणी द्यावे.

समपातळीत सऱ्या सोडाव्यात. लागण व मोठी बांधणी मिळून हेक्टरी पाच ते सात टन गांडूळ खताचा वापर करावा.

पाण्याच्या पाळीतील अंतर ठरवण्यासाठी टेंसीओमीटरचा वापर करावा. त्यामुळे प्रति हेक्टरी पाणी कमी लागते.

पिकास पाण्याचा ताण सहन करण्याची सवय लावण्यासाठी डिसेंबरपासून फेब्रुवारीअखेर पर्यंत पाण्याचे पाळीतील अंतर दोन तीन दिवसांनी वाढवत जावे. त्यामुळे पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची नैसर्गिक क्षमता वाढते. पिकाची मुळे अधिक खोलवर जाऊन खालच्या थरातील उपलब्ध पाण्याचा वापर करतात.

जमिनीतील उपलब्ध पाण्याचे प्रमाण ५० टक्क्यांच्या आसपास घटेल तेव्हाच पाणी द्यावे.

पालाश खताची मात्रा (६० किलो प्रति हेक्टर) लागणीच्या वेळी जमिनीतून द्यावी.

लागण करताना बेणे म्युरेट ऑफ पोटॅशचे २ टक्के द्रावण किंवा ४ टक्के मॅग्नेशिअम सल्फेट किंवा ४ टक्के (हिराकस) फेरस सल्फेट मध्ये पाच मिनिट बुडवून त्यानंतर लागण करावी.

युरिया २ टक्के (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी), म्युरेट ऑफ पोटॅश २ टक्के (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात संयुक्त द्रावणाची फवारणी पिकावर लागणीनंतर ६०, १२० व १८० दिवसांनी करावी.

लागणीचे बेणे शिळे झाल्यास चुनखडीचे पूर्ण विद्राव्य स्वरूपातील २ टक्के द्रावण तयार करून त्यात बेणे २ तास बुडवून नंतर लागण करावी.

पाचट सरीत पसरून त्यावर प्रतिटन पाचटासाठी ८ किलो युरिया, १० किलो सुपर फॉस्फेट आणि १ लिटर पाचट कुजवणाऱ्या जिवाणूचा वापर करावा.

पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर २० दिवसांपेक्षा जास्त वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.

वाऱ्यापासून संरक्षण म्हणून शेताच्या पश्‍चिमेस व उत्तरेस शेवरी लावावी, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित होतो.

सेंद्रिय खताचा वापर करून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवावे. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

खोडव्यामध्ये पाचटाचे आच्छादन करावे, त्यावर एकरी ५० किलो युरिया, ८० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि २ लिटर पाचट कुजवणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा.

- आर. एन. गायकवाड, ९८८१३२७३५५

(पीक उत्पादन व संरक्षण विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट,

मांजरी (बु), पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT