Learning Opportunities : निपुण भारत हे राष्ट्रीय अभियान शिक्षणामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसनाकरिता हे अभियान मुख्यतः सुरू करण्यात आले असले, तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे यामध्ये लक्ष देण्यात येत आहे. बालकांना कोणतीही गोष्ट सहज साध्य करता येण्यासाठी त्यांच्या पायाभूत स्तरांमध्ये अध्ययनात त्यांना संरक्षक, सुरक्षित, सुखद व आनंददायी वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे. वर्गातील प्रत्येक मुलाला राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये अपेक्षित असलेले वातावरण देण्याकरिता शिक्षकांनीही अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन नीटपणे समजून घेतलेले आहे.
उत्तम अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून देणे, प्रयोग करण्यास वाव देणे, शोध घेण्याची संधी देणे, निगा राखणे, प्रतिसाद देणे असे उत्कृष्ट प्रमाणके मान्य करण्यात आलेली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खेळाद्वारे अध्यापनाचे विविध मार्ग, पर्यावरणकेंद्री आणि मनोरंजक उपक्रम, आवडीचा शनिवार, मोठ्या अक्षरांची पुस्तके भेट आदी गोष्टी या वर्षाच्या शैक्षणिक सत्रात सुरू करण्यात आलेल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे पाठीवरील ओझे हे कधी कधी मजुरांसारखे वाटते. त्यामुळे पुस्तकांचे आणि वह्यांचे तसेच इतर शालेय साहित्याचे ओझे कमी करून विद्यार्थ्यांना ‘दप्तराविना’ जगाची ओळख पटवून देण्यासाठी कृतीतून शिक्षण दिल्या जात आहे. एकीकडे दप्तरांचे ओझे आणि दुसरीकडे डोक्यावरील अभ्यासाचे ओझे कृतिशील शिक्षणामुळे निश्चितच कमी होणार आहे. ‘नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ने अर्थातच, ‘एनसीईआरटी’ने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा शिक्षण मंत्रालयाने नुकताच आढावा घेतलेला आहे. आता विद्यार्थ्यांना ‘बॅगलेस डे’च्या आधुनिक काळात स्थानिक पर्यावरण आणि लोककला प्रकारांची माहिती करून दिल्या जाणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात आणखी भर पडून विद्यार्थी चौकस होण्याच्या दृष्टिकोनातून असे नावीन्यपूर्ण शिक्षण उपयोगाचे आहे, असे अभ्यासकांचे देखील मत झालेले आहे. त्या अनुषंगाने शिक्षणामध्ये स्थित्यंतराचा काळ (बदलाचा काळ) सध्या झपाट्याने पुढे येत आहे. यामुळे विद्यार्थी अद्ययावत राहून अध्ययनात आणखी पुढे सरसावतील. ‘एनसीईआरटी’शी संबंधित ‘पीएसएस सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकॅशनल एज्युकेशन’ने शाळांमध्ये दप्तराशिवाय दिवस या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी आणि दैनंदिन अभ्यास आनंदी होण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत.
दप्तराशिवायचे जे दिवस असतील त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना काही कौशल्ये शिकायला मिळणार आहेत. पारंपरिक शिक्षणातून वैशिष्ट्यपूर्ण शिक्षणाकडे विद्यार्थी मार्गक्रमण करतील. व्यापक अर्थाने कौशल्यांचा विकास करण्याकरिता अथक परिश्रम घेण्यात येत आहेत. विविध कलाप्रकारांबरोबर क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे म्हणून प्रोत्साहन देण्यात येत आहे आणि अशी शिफारस करण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांना स्थानिक पर्यावरण आणि परिसंस्थेची माहिती करून देण्याबरोबरच शुद्ध पेयजलाचे महत्त्व पटवून देणे, स्थानिक प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या प्रजातींची ओळख करून देणे, स्थानिक स्मारकांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना त्यांची माहिती करून देणे, याबाबतीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सूचनांच्या संदर्भाने सखोलता, विविधता आणि सुटसुटीतपणा आणण्यावर भर देण्यात येईल, असेही शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अन्वये इयत्ता सहावी ते आठवी दरम्यानच्या विद्यार्थ्यांना दहा दिवसांसाठी ‘बॅगलेस डे’मध्ये सामावून घेण्यात यावे, अशीही सूचना करण्यात आलेली आहे.
अहवाल लेखन...
जिल्हा आणि तालुक्याच्या स्तरावर विविध शैक्षणिक संस्थांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात येणार आहे. स्थानिक ऐतिहासिक, सांस्कृतिक पर्यटन स्थळांची ओळखही विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून त्यांना मार्गदर्शन होणार आहे. स्थानिक कलाकारांसोबत संवाद साधण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या सर्व गोष्टींचा सारांश रूपाने अहवाल लिहावा लागणार आहे.
आनंददायी शनिवार
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमाचे आयोजन जून महिन्यापासून सुरू झालेले आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, सामाजिक-भावनिक कौशल्य विकसित करणे, शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करून मुलांना सक्षम बनवणे, संभाषण कौशल्य विकसित करणे, रस्ते सुरक्षा जपणूक, आरोग्य रक्षण, दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन, नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य, आत्मविश्वास निर्माण करणे आणि नैराश्यावर मात करण्याची क्षमता निर्माण करणे आदी उद्देशाने हा उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. याकरिता योगासने, कथाकथन, संभाषण, गीतगायन, वक्तृत्व स्पर्धा, तर्कसंगत विचार, वैज्ञानिकता, रचनात्मक कल्पनाशक्ती, निसर्ग सहवास आणि निरीक्षण व नोंदी करणे, सहानुभूती, साहस, सहकार्य, समन्वयाने कामे करणे, अनुभवलेखन, नेतृत्व विकास, नैतिक मूल्ये जोपासणे आदी संदर्भाने नियोजनावर भर देण्यात येत आहे. सर्वार्थाने सर्व विद्यार्थी माणूस म्हणून घडविण्यासाठी हा उपक्रम परिणामकारक आहे.
दुसरा एक महत्त्वाचा उपक्रम
बालवयात नजर कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाचन करताना त्रास होतो. अशा विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने ‘लार्ज प्रिंट’ म्हणजेच, मोठ्या अक्षरांमध्ये छपाई असलेली पुस्तके शाळेतून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. बालभारतीतर्फे मोठ्या अक्षरांमध्ये पुस्तके छापलेली असून ही पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहेत. सर्व शिक्षा अभियानातून पाठ्यपुस्तके मोफत दिली जातात. नियमित विद्यार्थ्यांना ए-फोर आणि काही विद्यार्थ्यांसाठी तीच पुस्तके ए-थ्री म्हणजेच अडीच पट आकाराची आहेत. मराठी, उर्दू आणि सेमी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना अशी पुस्तके मिळणार आहेत.
भाषा साहित्य पेटी, गणित साहित्य पेटी, विज्ञान साहित्य कीट, खेळाचे साहित्य शाळांना मिळालेले आहे. ई-लर्निंग प्रणालीचा वापरही काही शाळांमध्ये होत आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वेळेवर मिळत असत. या वर्षी शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहेत. पण अद्याप गणवेश शाळांपर्यंत पोहोचले नाहीत. इथे मात्र अनियमितता झालेली दिसते. मुख्यमंत्र्यांनी थोड्याच दिवसांत चांगल्या दर्जाचे शालेय गणवेश विद्यार्थ्यांना मिळतील, असे सभागृहात नुकतेच सांगितले आहे. एकंदरीतच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध संधी आणि सोयी सुविधांची उपलब्धी शासनाकडून होत आहे.
(लेखक रानमेवा शेती साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.