Pune News : राज्यातील विविध ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. तर विविध ठिकाणी जल्लोष पाहायला मिळत आहे.
कल्याणमध्ये बत्ती गुल
कल्याण लोकसभा मतदार संघातील मतमोजणीस सुरूवात होताच सकाळी आठ वाजताच लाईट गेली. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. तसेच येथे पत्रकार कक्षात लाईट गेल्याने अंधार पसरला होता. तर मोबाईलच्या रेंजमध्ये अडथळा आला होता.
रावेर मतदारसंघात मतमोजणी थांबली
जळगाव मधील रावेर मतदारसंघात ईव्हीएम मशिनच्या बॅटरीवरून गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. येथे मशीन बॅटरी फुल्ल कशी अशी विचारणा करत पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी हरकत घेतल्याने मतमोजणी थांबवण्यात आली होती.
धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष
दरम्यान धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी सहाव्या फेरीअखेर ७७ हजार ९०७ मतांची आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. येथे मतदान केंद्राबाहेरच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडले.
कोल्हेंच्या विजयाची मिरवणूक
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिरूर मतदार संघात अमोल कोल्हे यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर आहेत. त्यामुळे तेच विजयी होतील अशी सध्याची स्थिती आहे. यावरून शिरूर मतमोजणी केंद्रावर अमोल कोल्हे यांच्या विजयाची मिरवणूक काढण्यात आली आहे
अमरावतीत हनुमान चालीसा पठण
अमरावतीत बळवंत वानखेडे आघाडी आसल्याचे चित्र आहे. येथे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि पती आमदार रवी राणा यांच्याकडून हनुमान गडी येथे हनुमान चालीसा पठण सुरू केले आहे.
कोल्हापूरमध्ये मशीनमध्ये तांत्रिक बिघाड
कोल्हापूरमधील दोन्ही मतदार संघ यंदा चांगलेच चर्चेत आले होते. यावेळी मतमोजणी दरम्यान कागलमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. दुसऱ्या फेरीवेळीच असा तांत्रिक बिघाड झाल्याने एकच खळबळ उडाला होता. दरम्यान दुपारी १२:३० वाजेनंतर कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
हिंगोलीत मशीनमध्ये बिघाड
हिंगोलीमध्ये मतमोजणी प्रक्रिया सुरू होताच मशीनमध्ये बिघाड झाला. सेनगाव तालुक्यात मतदान केंद्रावरील बूथवर बिघाड झाल्याने ती पेटी सहाय्यक निवडणूक अधिकारी उमाकांत पारधी यांनी ताब्यात घेतली.
संभाजीनगरमध्ये बाचाबाची
छत्रपती संभाजीनगर मतदान केंद्रावर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्ये आणि पोलिसांच्यात वाद झाला. येथे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना आत जाण्यापासून पोलिसांनी रोखल्याने पोलिसांशी राजपूत यांच्यासह कार्यकर्त्यांनी वाद घातला.
नाशिकमध्ये काहीसा गोंधळ
नाशिकमध्ये मतमोजणी वेळी उमेदवारांच्या प्रतिनिधीने ईव्हीएम मशीनची माहिती आणि मतमोजणीतील काही कागदपत्रे बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. यावरून येथे काहीसा गोंधळ उडाला. यावरून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.