Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Business : पाणीटंचाई, कमी दरामुळे दूध उत्पादकांची कोंडी

Milk Rate : राज्यात गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर २५ ते २६ रुपयांवर खाली आला आहे, यामध्ये खर्चाची तोंडमिळवणी करताना शेतकऱ्यांची नुसती तारेवरची कसरत सुरू आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : राज्यात गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर २५ ते २६ रुपयांवर खाली आला आहे, यामध्ये खर्चाची तोंडमिळवणी करताना शेतकऱ्यांची नुसती तारेवरची कसरत सुरू आहे. तर दुसरीकडे तीव्र होत चाललेल्या टंचाईच्या झळा आणि पशुखाद्याच्या वाढत्या दराने त्यात आणखीनच भर टाकली आहे. परिणामी, राज्यातील दूध उत्पादकांची मात्र पुरती कोंडी झाल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र हे देशातील दूध उत्पादनातील (Milk Production) आघाडीवरील राज्य आहे. राज्यात सर्वाधिक रोज सव्वा दोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते. त्यात खासगी संघाकडे साधारण १ कोटी ८० लाख लिटर आणि उर्वरित ४५ लाख लिटर हे सहकारी संघाकडे संकलन होते. राज्यातील सर्वाधिक ७० ते ८० टक्के दूध हे खासगी संघांना दिले जाते, अर्थातच, दुधाच्या संपूर्ण बाजारावर खासगी दूध संघांचे वर्चस्व आहे.

राज्यातील प्रमुख खासगी संघाशिवाय आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरातमधील ५ ते ८ खासगी संघ राज्यातील दूध संकलन करतात. गाईच्या दुधासाठी किमान ३४ रुपये दर देण्याचे बंधन राज्य सरकारने या आधीच घातलेले आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही, उलट तो दर २५ ते २६ रुपयांवर खाली आला आहे. वास्तविक, सध्या दुधाला मागणीचा काळ आहे, त्यामुळे दर वाढणे अपेक्षित आहे. पण या उद्योगातील ‘लॅाबी’ ते जाणीवपूर्वक होऊ देत नाही, असे सांगण्यात येते.

दूध दराची (Milk Price) ही परिस्थिती एकीकडे असताना त्यात आता टंचाईच्या झळा आणि पशुखाद्याच्या वाढत्या दरामुळे आणखी भर पडली आहे. प्रामुख्याने राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सांगली, नगर या दूध पट्ट्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढतो आहे, तशी टंचाईची तीव्रता वाढत आहे आणि पाण्यासह हिरव्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

पशुखाद्याची बॅग पूर्वी १५०० रुपयांना मिळायची, आता ती १८०० रुपयांवर गेली आहे. तर कडबाही १० हजार रुपयांच्या पुढे आहे. पाण्याअभावी हिरवा चारा दुरापास्तच होत आहे. येत्या काही दिवसात त्याच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चोहोबाजूंनी कोंडी झाली आहे.

‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’

राज्यातील खासगी संघांनी गेल्या काही महिन्यांत सातत्याने विविध कारणे देत दुधाचा खरेदीदर ३९ रुपयांवरून टप्प्या-टप्प्याने कमी करुन २७ रुपयांवर आणला आहे. अनेक संघांनी यावर शक्कल लढवताना गावस्तरावरील दूध संकलन केंद्रांनाच त्यांच्या वाहतूक कमिशनमधून एक रुपया पुढे शेतकऱ्यांना देऊन २७ रुपयांचा दर द्यावा, अशी सूचना केली आहे.

पण अनेक संकलन केंद्रे हा बोजा आपण का सहन करावा म्हणत २५ ते २६ रुपयांचा दर देऊन मोकळे होत आहेत, पण सर्वाधिक नफा खाणारे प्रमुख खासगी संघ मात्र हे सध्या ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ होऊ पाहत आहेत.

शेतकरी सोसतोय रोजच तोटा

दूध उत्पादकांना गाईच्या दुधाला प्रतिलिटरसाठी हिरवा-कोरडा चारा, पशुखाद्य तसेच मिनरल पावडर, औषधे असा साधारण प्रतिलिटरला प्रतिदिन २८ रुपयांचा खर्च येतो. पण सध्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर मिळतो, या हिशोबाने रोज प्रतिलिटरला साधारण ३ रुपयांचा तोटा सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (गाईनुसार त्यात बदल होऊ शकतो.)

अनुदान अडकले नियम-अटींच्या कचाट्यात

गाईच्या दूधदराच्या घसरत्या दरामुळे जानेवारीमध्ये केवळ एक महिन्यासाठी गाईच्या दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण त्यासाठी जनावरांचे टॅगिंग करण्यासह आधीच्या निर्णयानुसार प्रतिलिटर किमान २९ रुपये आणि नंतर २७ रुपये दर दूध संस्थांनी दिला, तरच अनुदान देण्याचे बंधन घालण्यात आले. पण दूध संस्थांनी त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या. तर अनेक ठिकाणी अद्यापही नियम-अटींच्या कचाट्यात हे अनुदान अडकले आहे.

माझ्याकडे ७० गाई आहेत, रोज किमान ४०० लिटरचे संकलन होते. मी पूर्णपणे दूध व्यवसायावरच आहे. पण आजघडीला पूर्णपणे तोट्यातला व्यवसाय करतो आहे. प्रतिलिटर २५ रुपये दराने काय होणार आहे. पण पर्याय नाही, सरकारने याबाबत गांभीर्य बाळगणं गरजेचे आहे.
- शिवानंद होनमुटे, दूध उत्पादक, कळमण, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT