Kharif Crop
Kharif Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop : अर्ध्या खरिपानं आताच मान टाकलीय.. ; शेतकरी हतबल

Suryakant Netke

Ahmednagar News : ‘उशिराने सुरु झालेल्या कमी पावसावरच पेरण्या, कापूस लागवड केली. पावसाळ्याचे दोन महिने उलटले, अजून पाऊस नाही. आता पिकांची वाढ खुंटलीय, १८ दिवसापासून पाऊस आला नाही. पिके माना टाकू लागले आहेत. अर्ध्या खरिपाने आताच मान टाकलीय.’ पूर्व भागात तीव्रता अधिक असली तरी संपूर्ण नगर जिल्ह्यात अशीच स्थिती आहे. तूर, मुग, उडीद, कापूस, बाजरी, सोयाबीन पिकांना अधिक फटका बसला आहे.

नगर जिल्ह्याच्या पूर्व भागात नगर, पाथर्डी, शेवगाव, पश्चिम भागात पारनेर, नगर तालुका, राहुरी, नेवासा, दक्षिणेत कर्जत, श्रीगोंदा, जामखेड तालुक्याचा बराच भाग, तर उत्तरेत कोपरगाव, राहुरी, राहाता, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर तालुक्याचा भाग येतो. नगर जिल्ह्याच्या बहुतांश भागात पुरेसा पाऊस नाही. जिल्ह्यात आतापर्यंत खरिपाची ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ५ लाख ८८ हजार ६२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालीय. त्यात कापूस, सोयाबीनचे क्षेत्र मोठे आहे.

जिल्ह्याचा पूर्व भाग, करंजी घाट, बालाघाट परिसरातील गावांसह शेवगाव तालुक्यातील शेती पावसावरच अवलंबून आहे. तूर, कापूस, बाजरी, सोयाबीन पिकांचा हा पट्टा. अगदी शंभर किलोमीटरपर्यंतची पिके कोमेजलेली दिसली. चापडगावाहून पुढे गेले की बोधेगाव शिवारात कापसाच्या शेतात परमेश्वर तांबे हे तरुण शेतकरी कापसाची मशागत करत होते. ते म्हणाले,‘‘दोन-तीन एकर सरकी लावलीय.

आतापर्यंत तीन फुटावर जायला हवी होती, पण अजून भुईच सोडली नाही. दरवर्षीच्या तुलनेत दहा-वीस टक्केही उत्पन्न येईल की नाही सांगता येत नाही.’’ निंबेनांदुर शिवारात नामदेव रामचंद शिंदे शेतात काम करत होते. ते म्हणाले,‘‘कापूस, तुरीची लागवड केलीय. खत पेरलयं, मशागत केलीय, पण पाऊस नाही. वाढ खुंटल्याने आधीच नुकसान होणार आहे, पण अजून काही दिवस पाऊस आला नाही, तर सारेच पीक जाईल असे वाटते.’’

नगर तालुक्यातील नेप्ती, खातगाव टाकळी, जखणगाव, हिंगणगाव, हिवरेबाजार, निमगाव वाघा, भाळवणी, पिंपळगाव वाघा, दैठणे गुंजाळ, सारोळा अडवाई, पुणे रस्त्याला चास, कामरगाव, भोयरे पठार, भोयरे खुर्दपर्यत अनेक गावांत काही अपवाद वगळले तर पेरणीच नाही. जेथे पेरले तेथे उडीद, मुग, काही भागात फुलपीके असतात. तेथेही फारशी वेगळी परिस्थिती नाही. वाढ खुंटली, अजून कुठेही कापसाला पाते लागले नाही, मुगाला शेंगा लागल्या नाही. अर्धे उत्पादन घटणार हे स्पष्ट झालेय, अजून आठ दिवस पाऊस आला नाही तर सगळाच खरीप देगा देणार असल्याची भीती आहे.

नगर, पारनेरमधील तालुक्याच्या पश्चिम भागात यंदा फुलपिकांनाही फटका बसणार असल्याचे दिसत आहे. कर्जत, श्रीगोंदा, तालुक्यांत अनेक भागात पाऊस नसल्याने पिके वाया गेली आहेत. राहाता, राहुरी, पारनेर, कोपरगाव, संगमनेरमधील पठार भाग, श्रीरामपूर,तालुक्यातील बहुतांश भागात फारशी वेगळी स्थिती नाही. बहुतांश भागात खरिपाची पिके अडचणीत आहेत. जेथे पाणी उपलब्ध आहे तेथे पाणी देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र तरीही पन्नास टक्के नुकसान होणारी हे निश्चित असल्याचे दिसतेय.

‘‘यंदा पाच एकर कापसाची लागवड केलीय. आतापर्यंत तीन ते चार फुटापर्यंत वाढ व्हायला पाहिजे होती. मात्र पाऊस नसल्याने वाढ खुंटलीय. उघडीप असल्याने मशागत सुरु आहे. मात्र उत्पादनात अर्ध्यापेक्षा जास्त घट होणार असे दिसतेय.’’
- लक्ष्मण वाल्हेकर, शेतकरी, चापडगाव, ता. शेवगाव, जि. नगर

तीस मंडळात अल्प पाऊस

नगर जिल्ह्यात ९७ महसुल मंडळे आहेत. प्रशासनाकडील नोंदीनुसार नगर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७५ टक्के पाऊस व्हायला हवा होता. केवळ ४२ टक्के झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत ११३ टक्के पाऊस झाला होता. साठपेक्षा अधिक महसुल मंडळात पन्नास टक्क्याच्या आता, वीस मंडळात ७० टक्के तर केवळ पंधरा मंडळात शंभर टक्के पाऊस आहे. राहुरी तालुक्यात आतापर्यंत २२ टक्के, संगमनेरमध्ये २४ टक्के, संगमनेरमध्ये २९ टक्के पाऊस आहे.

नगर जिल्ह्यात खरीपस्थिती...

  • पुरेसा पाऊस नाही, १८ दिवसांपासून उघडीप.

  • पिकांची वाढ खुंटली, सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक पिके धोक्यात.- तूर, कापूस, सोयाबीनसह मुग, उडदाच्या उत्पादनाला बसणार फटका.

  • पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही पाऊस नसल्याने दुष्काळाची चाहुल.

  • भंडारदरा भरले, निळवंडे, मुळात चांगला पाणीसाठा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Export : साखर निर्यातीचे वास्तव

Loksabha Election 2024 : पुणे, शिरूर, मावळसाठी आज होणार मतदान

Violation of Code of Conduct : आचारसंहिता भंगाच्या दीड हजार तक्रारींवर कारवाई

Summer Heat : उन्हामुळे केळी, भाजीपाल्याला फटका

Pre Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व वादळी पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT