Khodwa Sugarcane Farming Management: खोडवा ऊस पिकासाठी ठिबक सिंचन वापरल्याने आवश्यकतेप्रमाणे हवे तेवढेच पाणी मुळाशी देता येते. ५० ते ५५ टक्के पाण्याची बचत होते. उपलब्ध पाण्यात ठिबकद्वारे दुप्पट क्षेत्र सिंचित करणे शक्य होते.
मुळाच्या कक्षेतील ओलावा आणि हवा यांचे संतुलित प्रमाण पीकवाढीच्या संपूर्ण कालावधीत राखले गेल्याने ऊस उत्पादन ३० ते ३५ टक्यांनी वाढते. नत्र, पालाशसाठी अनुक्रमे युरिया आणि पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश या पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा आणि स्फुरदासाठी फॉस्फोरिक आम्ल किंवा मोनो अमोनियम फॉस्फेटचा वापर ठिबकद्वारे मुळाच्या कार्यक्षेत्रात केल्याने खतांच्या मात्रेत ३० टक्के बचत होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होऊन तणनाशक, खुरपणीचा खर्च वाचतो.
पीकवाढीनुसार पाणी व्यवस्थापन :
१) नोव्हेंबरपासून फेब्रुवारी अखेर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवला जातो. खोडव्याच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत मुळांशी अपेक्षित पाणी, अन्न आणि हवा याचे संतुलित प्रमाण असणे अतिशय महत्त्वाचे आहे.
२) खोडव्याला अति पाणी हे ऊस, साखरेचे उत्पादन घटवते, तर सौम्य प्रमाणात पाण्याचा ताण उत्पादन वाढविते.
३) फुटवे फुटण्याच्या वेळेस जर जास्त पाणी दिले तर मुळाजवळ हवेचे प्रमाण कमी होते. फुटवे कमी निघतात.
४) उसाची उंची, कांड्याची लांबी वाढणे जरुरीचे आहे, कारण याच्यात साखर साठवली जाते, वजन वाढते.
५) तोडण्याच्या अगोदर १५ ते २० दिवस पाणी देणे थांबविल्यास उसातील साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
ऊस पिकाची पाण्याची गरज काढण्याचे सूत्र ः
ईटीसी = ईटीओ × केसी
ईटीओ = पीई × के पॅन
ईटीसी = पिकाची पाण्याची गरज (मिमी /दिन)
ईटीओ = संदर्भीय बाष्पोत्सर्जन (मिमी /दिन)
केसी = पीक गुणांक (क्रॉप कोईफिशंट)
पीई = उघड्या यूएस क्लास ए पॅनमधील बाष्पीभवन (मिमी /दिन)
के पॅन = पॅन कोईफिशंट (याची किंमत सरासरी ०.८ पकडली जाते)
पीक गुणांकाची (क्रॉप कोईफिशंट) किंमत ही पिकाच्या वयोमानानुसार म्हणजे वाढीच्या अवस्थेवर अवलंबून असते. खोडवा ठेवल्यानंतर पीक गुणांकाच्या किमती खालील तक्त्यात दिल्याप्रमाणे बदलतात.
तक्ता : उसवाढीच्या अवस्थेनुसार पीक गुणांक
तक्ता : ऊस पिकाचे जमिनीच्या खोलीनुसार पाण्याचे शोषण
तक्ता : ठिबक सिंचनासाठी महिनावर पाण्याची गरज
(टीप : आपापल्या भागातील बाष्पीभवनानुसार पाण्याची गरज बदलते. वरील तक्त्यामध्ये ठिबक सिंचन चालविण्याचा कालावधी काढण्यासाठी ५ फूट अंतरावर ठिबक नळी, दोन ड्रीपरमधील अंतर ४० सेंमी आणि ड्रीपरचा ताशी प्रवाह २ लिटर विचारात घेतलेला आहे.)
ठिबक सिंचनासाठी खतांची निवड:
- खतांच्या द्रावणामध्ये आवश्यक अन्नद्रव्याचे प्रमाण जास्तीत जास्त असावे.
- शेतीतील तापमानास खते पाण्यात लवकरात लवकर व पूर्णपणे विरघळणारी असावीत.
- खते पाण्यात विरघळताना किंवा विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचे अविद्राव्य स्वरूपात एकत्रीकरण होऊ नये.
- खतातील क्षारांमुळे गाळण यंत्रणा, ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद पडू नयेत. संचातील कोणत्याही घटकावर गंज चढू नये किंवा अनिष्ट परिणाम होऊ नये. खते शेतातील वापरासाठी सुलभ व सुरक्षित असावीत.
- खतांची पाण्यामध्ये असणाऱ्या मीठ व इतर क्षारांबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊ नये.
- एका वेळी एकापेक्षा जास्त खते एकत्रित देताना त्यांची आपापसांत कोणतीही अभिक्रिया होणार नाही अशीच खते एकत्रित द्यावीत.
१२ महिन्यांचे खोडवा पीक साधारणपणे १ टन ऊस निर्माण करण्यासाठी जमिनीतून १.१ किलो नत्र, ०.६ किलो स्फुरद आणि २.२५ किलो पालाश शोषून घेते. म्हणजेच हेक्टरी १५० टन ऊस उत्पादनासाठी जमिनीतून १५० किलो नत्र, ९० किलो स्फुरद आणि ३३७.५ किलो पालाश शोषून घेतले जाते. त्याप्रमाणात अन्नद्रव्य पुरवठा करणे जरुरीचे आहे.
ठिबक सिंचनाद्वारे खते देण्याच्या पद्धती :
ठिबक सिंचनाद्वारे प्रमाणबद्ध आणि मात्राबद्ध पद्धतीने खते देता येतात. प्रमाणबद्ध पद्धतीमध्ये खतांची तीव्रता खत देण्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये एकसारखी राहते. खत मात्रा व पाण्याचा प्रवाह सतत सारखा राहतो. ठिबक सिंचनातून खते देण्यासाठी फर्टिलायझर टाकी किंवा व्हेंचुरी किंवा फर्टीलायझर इंजेक्शन पंप या उपकरणांचा वापर केला जातो.
तक्ता : खोडवा उसासाठी ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन मार्गदर्शक तक्ता.
टीप :
१. वरील शिफारस ही सर्वसाधारण असून, प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या शेतातील मातीच्या रासायनिक पृथक्करणानुसार उसास खते देणे आवश्यक आहे.
२. वरील खतमात्रा दर दिवशी एक दिवसाआड किंवा आठवड्यातून एकदा याप्रमाणे देता येतो.)
तक्ता : ऊस वाढीच्या अवस्थेनुसार पीक गुणांक
खोडवा पिकाचे वय (दिवस)---वाढीची अवस्था---पीक गुणांक
० ते ६०---फुटवे फुटण्याचा कालावधी--- ०.५- ०.६
६१ ते १२०---फुटवे ते कांड्या सुरु होईपर्यंत--- ०.८ – १.०
१२१ ते ३००---जोमदार वाढीची अवस्था---१.० – १.१
३०१ ते ३७०---पक्वतेचा कालावधी---०.७५ – ०.८
तक्ता : ऊस पिकाचे जमिनीच्या खोलीनुसार पाण्याचे शोषण
जमिनीची खोली (सेंमी)---पाण्याचे शोषण (टक्के)
० ते २०---६२.०
२० ते ४०---२३.४
४० ते ६०---८.८
६० ते ८०---४.४
८० ते १००---१.४
तक्ता : ठिबक सिंचनासाठी महिनावार पाण्याची गरज
महिना---खोडवा ठेवल्यानंतरचे दिवस---पीई (मिमी./दिवस)--- के पॅन---पीक गुणांक---ईटीसी (दर दिवशी पाण्याची गरज लि./दिवस/एकर)---महिन्यासाठी एकूण पाण्याची गरज (लि.)---दर दिवशी ठिबक चालविण्याचा कालावधी (मिनिटे)
जानेवारी---३०---४.५---०.८---०.४---६४००---१९२०००---३५
फेब्रुवारी---६०---५.५---०.८---०.४---७८२०---२३४६००---४५
मार्च---९०---६.५---०.८---०.७---१६१८०---४८५४००---९०
एप्रिल---१२०---७.५---०.८---१.०---२६६७०---८००१००---१५०
मे---१५०---८.५---०.८---१.१---३३२४५---९९७३५०---१८५
जून---१८०---७---०.८---१.१---२७३८०---८२१४००---१५५
जुलै---२१०---६---०.८---१.१---२३४७०---७०४१००---१३०
ऑगस्ट---२४०---६.५---०.८---१.१---२५४२०---७६२६००---१४०
सप्टेंबर---२७०---६---०.८---१.१---२३४७०---७०४१००---१३०
ऑक्टोबर---३००---७.५---०.८---०.९---२४०००---७२००००---१३५
नोव्हेंबर---३३०---६---०.८---०.८५---१८१३०---५४३९००---१००
डिसेंबर---३६०---५---०.८---०.८---१४२२०---४२६६००---८०
एकूण पाण्याची गरज---७३,९२,१५० लिटर = ७३९२.१५ क्युबिक मी.
तक्ता : खोडवा उसासाठी ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन मार्गदर्शक तक्ता
खोडवा ठेवण्याचा कालावधी : नोव्हेंबर ते फेब्रुवारी
शिफारशीत खत मात्रा ः नत्र:स्फुरद:पालाश (१००:४६:४६ (किलो प्रति एकर)
खोडवा ठेवताना---शेणखत---गंधक---फेरस सल्फेट---झिंक सल्फेट---मॅंगेनीज सल्फेट---निंबोळी पेंड---बोरॉन
००---१० टन---२४ किलो---१० किलो---८ किलो---१० किलो---१०० किलो---२ किलो
खोडवा ठेवल्यानंतर
खते देण्याची वेळ---नत्र---स्फुरद---पालाश
००---मात्रा (टक्के)---युरिया (किलो /एकर )---मात्रा (टक्के)---फोस्फेरिक आम्ल (किलो /एकर )---मात्रा (टक्के)---म्युरेट ऑफ पोटॅश (किलो /एकर )
खोडवा ठेवल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत---१४---३०.३८---१४---१०.५०---१२---९.२४
खोडवा ठेवल्यानंतर ४६ ते १३५ दिवसांपर्यंत---५५---११९. ३५---५५---४१.२५---४६---३५.४२
खोडवा ठेवल्यानंतर १३६ ते १८० दिवसांपर्यंत---२४---५२.०८---२४---१८.००---२७---२०.७९
खोडवा ठेवल्यानंतर १८१ ते २१० दिवसांपर्यंत---७---१५.१९---७---५.२५---१५---११.५५
एकूण---१००---२१७---१००---७५---१००---७७
परिणामकारक पाऊस वजा जाता
पाण्याची प्रति एकरी गरज = ५८.९२,१५० लिटर.
= ५८९२ क्युबिक मी.
संपर्क ः अरुण देशमुख, ९५४५४५६९०२
(उप सरव्यवस्थापक आणि प्रमुख कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि., पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.