Mango Orchard  Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Orchard : आंबा बागेत वाढ नियंत्रकाच्या वापराची घाई नको!

डॉ. भगवानराव कापसे

Mango Farming Management : आंबा बागेतून चांगल्या उत्पादनासाठी

चांगला आणि नियमित मोहर येणे गरजेचे असते. आपल्याकडे आंबा मोहोराच्या बाबतीत अनेक प्रकारच्या समस्या आहेत. काही वाणांना एक वर्षाआड फळधारणा होते. उदा. दशहरी, लंगडा. काही वाणांना अनियमित फळधारणा होते. उदा. हापूस. मात्र, काही वाण अतिशय नियमित फळधारणा देणारे आहेत.

त्यात नीलम, तोतापुरी आणि अलीकडे निघालेले विविध संकरित वाण - रत्ना, सिंधू, आम्रपाली, मल्लिका सोनपरी या वाणांचा समावेश होतो. त्याच प्रमाणे केसर या वाणाला दरवर्षी फळधारणा होत असली तरी एक वर्ष भरपूर, तर दुसऱ्या वर्षी थोडी कमी फळधारणा होते.नियमित व भरपूर फळधारणेसाठी आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया बारकाईने समजून घेऊ.

आंब्यामधील मोहोर निर्मितीची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आंब्यामधील गर्भधारणा ही आपल्या भागात नियमित मोहर येण्याचा काळ असतो त्याच्या तीन ते साडेतीन महिने अगोदर होत असते. म्हणजेच या तीन ते साडेतीन महिन्याआधीपासून मोहर येणारी काडी हळूहळू पक्व होणे आवश्यक असते. काडीमध्ये कर्बोदके (कार्बोहायड्रेट्‌स) आणि नत्राचे योग्य प्रमाण तयार झाले की काडी पक्व झाली असे म्हणता येते.

त्याचबरोबर काडीमध्ये फ्लोरिजीन या आभासी संजीवकांचे प्रमाण वाढलेले आवश्यक असते. काडीमध्ये नत्र हे कार्बोहायड्रेटच्या तुलनेत कमी असल्यास गर्भधारणा होऊन मोहर येण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने होते. बागायतदारांना बागेचे व्यवस्थापन करताना काडी योग्य पद्धतीने पक्व करून घेणे म्हणजेच काडीतील नत्राच्या प्रमाणात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त पातळीवर ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

आंबा काडीच्या पक्वतेचा कालावधी

वाणपरत्वे वेगवेगळा असतो. उदा. हापूसमध्ये नवीन नवती आल्यानंतर मोहर येण्यासाठी सात ते आठ महिने लागतात, तर केसरमध्ये नवीन काडी पक्व होण्यासाठी तीन ते साडेतीन महिने पुरेसे होतात. नीलम, तोतापुरी या वाणांमध्ये मात्र नवीन येणाऱ्या काडीवरसुद्धा फळधारणा होऊ शकते.

केसर बागेतील काडी पक्वतेचा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न करता येतात. त्यामुळे बागेत लवकर मोहर आणून एप्रिल सुरुवातीपासूनच फळांचे उत्पादन सुरू होऊ शकते. हंगामाच्या सुरुवातीलाच फळे आणता आल्यास त्यांना चांगला दर मिळू शकतो. घाऊक बाजारात दोनशे रुपये प्रति किलो असलेला दर पुढे हळूहळू कमी होत १५ -२० मेपर्यंत ६०-७० रुपये प्रति किलोपर्यंत कमी होत जातो. म्हणजे आपली फळांची काढणी निदान १५ ते २० मेपर्यंत पूर्ण होणे जास्त फायद्याचे ठरू शकते.

छाटणी

आंबा बागेची साधारण पंधरा ते वीस मेपर्यंत काढणी होताच गरजेप्रमाणे छाटणी घ्यावी लागते. या वर्षी आता बहुतेक शेतकऱ्यांनी छाटणी केली असून, अशा बागेमध्ये आता नवीन पालवीसुद्धा दिसू लागली आहे. ही नवीन आलेली पालवी पोपटी रंगाची झाल्यावर पक्वता लवकर गाठण्यासाठी ०-५२-३४ आणि ०-०- ५० या खताच्या ७ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

ही पालवी पक्व होऊन त्यावर पुन्हा ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये दुसरी पालवी कशी येईल हे पाहावे. या दुसऱ्यांदा आलेली पालवीही लवकरात लवकर पक्व करून घेण्यासाठी ०-५२-३४ आणि ०-०- ५० अशा खतांच्या योग्य प्रमाणात १२ ते १५ दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या घेता येतात. ऑक्टोबरच्या अखेर पोटॅशिअम नायट्रेट (चार टक्के) ४० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे एक फवारणी घ्यावी.

हमखास मोहरासाठी वाढ नियंत्रकांचा वापर

पॅक्लोब्युट्राझोल या वाढ नियंत्रकाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आंब्याला लवकर व भरपूर मोहर येत असल्याचे प्रयोगांमध्ये सिद्ध केले. हे रसायन झाडांतर्गत नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या जिबरेलिक आम्लाच्या निर्मितीला आणि कार्यप्रणालीला तात्पुरता विरोध करते. या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यामुळे झाडाच्या नवीन पालवीच्या वाढीकडे जाणारी सर्व शक्ती झाडाच्या प्रजोत्पादनाकडे वळवली जाते. परिणामी मोहर निर्मितीला ताकद मिळते.

वाढ नियंत्रक न दिलेल्या झाडाच्या तुलनेत वाढ निरोधक दिलेल्या झाडांना ८२ ते ८५ टक्के अधिक मोहर येऊन, आंब्याच्या उत्पादनात २.६० ते २.८६ पटीने वाढ होत असल्याचे प्रयोगात दिसून आले आहे. वाढनियंत्रकाच्या वापरामुळे आंब्याला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात येणारी नवीन फूट ५ टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहते. इतकेच नाही तर नवीन फुटव्याची लांबीही बरीच कमी राहत असल्याचे दिसून आले. प्रयोगामध्ये झाडाला नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण मोहर आला.

वाढ नियंत्रकाचा वापर कसा करावा?

योग्य मशागती खाली असलेल्या फळातील झाडांना तज्ज्ञांनी शिफारस केल्याप्रमाणे वाढ नियंत्रक योग्य मात्रेत व पद्धतीने योग्य वेळी देणे गरजेचे असते. म्हणजे झाडाचे वयोमान, वाढ अथवा फळांच्या प्रतीवर कोणताही प्रतिकूल परिणाम न होता अपेक्षित अधिक उत्पादन मिळू शकते. त्यासाठी पुढील काही मुद्दे शेतकऱ्यांनी कायम लक्षात ठेवावेत.

योग्य वेळ :

पॅक्लोब्युट्राझोल आंबा झाडांना वर्षातून एकदा जुलैअखेर ते ऑगस्टपर्यंत देता येते. जुलैच्या शेवटपर्यंत चांगला पाऊस होऊन उन्हाळ्यात पाणी उपलब्धतेची खात्री झाल्यास त्याचा वापर करावा. मात्र जर तोपर्यंत चांगला पावसाळा झाला नाही आणि उन्हाळ्यात सिंचनासाठी पाणी विहिरीला किंवा शेततळ्यात पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत थांबावे. जर ऑगस्टच्या शेवटपर्यंतही पाऊस कमी झाला आणि आपले उन्हाळ्यातील सिंचनासाठी कमी पाणी उपलब्धता राहिल्यास त्या वर्षी हे रसायन वापरू नये. कारण त्याचा वापर केलेल्या बागेस उन्हाळ्यात बागेस गरजेइतके पाणी उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा झाडांवर अतिरिक्त ताण (शॉक) बसतो.

योग्य मात्रा

सुरुवातीला बाजारात आलेल्या पॅक्लोब्युट्राझोलमध्ये मूलभूत रसायनाचे प्रमाण २३ टक्के इतके होते. आज बाजारामध्ये विविध कंपन्यांचे पॅक्लोब्युट्राझोल उपलब्ध आहे. मात्र त्यातील टक्केवारी व विश्वासार्हता तपासूनच त्याचा वापर करावा. आता पुढील मात्रा देत असताना पॅक्लोब्युट्राझोल (२३ टक्के) गृहीत धरून मात्रा देत आहे. अन्य टक्केवारीसाठी ही मात्रा भिन्न असू शकते.

त्यासाठी झाडाच्या विस्तार किंवा व्यास मीटरमध्ये मोजावा. उदा. उत्तर दक्षिण दीड मीटर आणि पूर्व पश्‍चिम तीन मीटर असल्यास, त्याची सरासरी सव्वा दोन मीटर होते. प्रत्येक रनिंग मीटरला तीन मिलि पॅक्लोब्युट्राझोल असे साधे गणिती सूत्र लक्षात ठेवावे. उदाहरणातील सव्वा दोन मीटर व्यासासाठी प्रति रनिंग मीटर तीन मिलि या प्रमाणे पावणेसात मिलि पॅक्लोब्युट्राझोल द्यावे लागेल.

एखाद्या झाडाला चुकून किंवा काही कारणाने शिफारशीत मात्रेपेक्षा कमी मात्रा दिल्यास अपेक्षित परिणाम (म्हणजेच मोहर) मिळत नाही.

एखाद्या झाडाला गरजेहून अधिक मात्रा दिली गेल्यास त्याचे विपरीत परिणाम दिसू शकतात. उदा. या झाडाला खूप आखूड व दाटीवाटीने फूट येते. मोहराचे तुरेही आखूड आणि गुच्छात येतात. तसेच झाडाच्या फांद्यातूनही मोठ्या प्रमाणात मोहर फुटलेला दिसतो. अशी लक्षणे दिसलेल्या झाडाला पुढील वर्षी वाढ नियंत्रक देऊ नये किंवा निम्मी मात्रा द्यावी.

देण्याची योग्य पद्धत

झाडाच्या विस्तारानुसार या रसायनाची मात्रा निश्‍चित केल्यानंतर झाडाच्या बुंध्याभोवती ठराविक अंतराने ठरावीक खोलीचे खड्डे खोदावेत. आंबा बागेतील प्रत्येक झाडाच्या बुंध्याभोवती खते घालण्यासाठी आळे केलेले असते. त्याच्या आत साधारणपणे एक फुटावर दुसरे एक वर्तुळ करावे. त्याच्या परिघावर साधारणपणे तीस सेंटिमीटर अंतराने कुदळीने १२ -१५ सेंटिमीटर खोलीचे खड्डे खोदावेत. सदर झाडासाठी निश्‍चित केलेल्या मात्रेमध्ये साधारणपणे दहा मिलिसाठी तीन लिटर पाणी मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण आपण खोदलेल्या छोट्या खड्ड्यामध्ये समप्रमाणात ओतावी. हे खड्डे लगेच मातीने व ओंजळभर शेणखताने बुजवून घ्यावेत. त्याभोवती वीतभर अंतरावर लहान आळे करून द्रावण ओतल्यास ते झाडास योग्य प्रकारे लागू होते.

साधारणपणे जुलै ऑगस्ट या पावसाळी महिन्यात वापरण्याची शिफारस आहे. पावसामुळे वापरलेले रसायन वाहून जाणार नाही, याची काळजी घ्यावी. द्रावण देतेवेळी बाग वाफशात असेल, हे पाहावे. आंब्याची लागवड घन पद्धतीने (म्हणजे ५ × ५ मीटर अंतरावर) किंवा अतिघन पद्धतीने केलेली असल्यास आणि चांगली वाढ झालेल्या झाडांच्या वयाच्या चौथ्या वर्षी विस्ताराप्रमाणे वाढ नियंत्रकाचा वापर करावा. त्या आधी बागेतील तणांचा बंदोबस्त केलेला असावा.

वाढ नियंत्रक दिलेल्या झाडाची मशागत

वाढ नियंत्रकाचा वापर केलेल्या बागेत मोहर लवकर व अधिक प्रमाणात येतो. त्यासाठी बागेला नियमित सिंचन आणि शिफारशीपेक्षा सव्वा ते दीड पट अधिक खतमात्रा देणे आवश्यक असते. वाढ नियंत्रकाच्या वापरामुळे झाडाला फक्त लवकर व अधिक मोहर लागतो. आलेला मोहर, फुले व फळांच्या संरक्षणासाठी शिफारशीप्रमाणे बुरशीनाशके, कीटकनाशके यांच्या फवारणीचे नियोजन करावे.

झाडावरील फळे काढण्याच्या सहा ते आठ महिने आधी झाडाला जमिनीतून वाढ नियंत्रक दिलेले असते. फळे काढण्याच्या वेळेपर्यंत त्याचा झाडांतर्गत अंश अत्यल्प राहिल्याचे दिसते. जागतिक संघटनेने ठरवून दिलेल्या (०.०५ मिलिग्रॅम प्रति किलो) पातळीपेक्षा कितीतरी कमी (०.०१ ते ०.०३ मिलिग्रॅम प्रति किलो) अवशेष फळांमध्ये शिल्लक असू शकतात. त्यामुळे उत्तम दर्जाच्या वाढ नियंत्रकाचा वापर करून दर्जेदार आंबा उत्पादन घ्यावे.

डॉ. भगवानराव कापसे, ९४२२२९३४१९ (लेखक निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT