अॅग्रोवन वृत्तसेवा
Sugar Indutery : पुणे ः साखरेसाठी ज्यूट गोण्यांचा वापर न केल्यास येत्या जानेवारीपासून साखर कारखान्यांना मासिक साखर विक्री कोटा दिला जाणार नाही, असा इशारा केंद्र शासनाने दिला आहे. मात्र, ज्यूट गोण्यांचा वापर वाढवता येणार नसल्याचे साखर उद्योगाने स्पष्ट केले आहे.
राज्याचा गाळप हंगाम येत्या ३-४ महिन्यांत सुरू होईल. केंद्राच्या आदेशानुसार, २०२४-२५ मधील साखर हंगामापासून साखर उत्पादनाच्या एकूण २० टक्के प्रमाणात ज्यूट गोण्यांचा वापर बंधनकारक केला गेला आहे. केंद्राच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या कारखान्यांना जानेवारी २०२५ पासून मासिक साखरविक्री कोटा मिळणार नाही, अशीही तंबी देण्यात आली आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, देशातील ज्यूट उत्पादकांना मदत करण्यासाठी ज्यूट गोण्यांचा वापर वाढविण्याची केंद्राची भूमिका आहे. ज्यूट उत्पादकांच्या हितासाठी १९८७ मध्ये वेगळा कायदादेखील करण्यात आला. हा कायदा अद्याप लागू आहे.
देशभर साखर उद्योगाकडून ज्यूट गोणी वापर किमान २० टक्के व्हावा, असे बंधन केंद्राने टाकले आहे. परंतु, हा वापर केवळ सात टक्क्यांच्या आसपास होतो आहे. त्यामुळे ज्यूट पॅकेजिंग मटेरिअल्स अॅक्ट १९८७ मधील कलम ३(१) मधील तरतुदीचा आधार घेत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने पुन्हा एक आदेश जारी केला आहे. ज्यूट गोण्यांच्या वापराबाबत घोषित टक्केवारीपेक्षा कमी वापर केल्यास कारवाईचे अधिकार केंद्राला आहेत.
परंतु, राज्यात आतापर्यंत कारवाईची घटना घडलेली नाही. राज्यातील साखर कारखान्यांना दरवर्षी साखर साठवणुकीसाठी २००० लाखांहून अधिक गोण्यांचा वापर करावा लागतो. त्यासाठी किमान ४०० लाख ज्यूट गोण्यांचा वापर अपेक्षित आहे. परंतु, उपलब्धता आणि आर्थिक गणित जुळत नसल्यामुळे बहुतेक कारखाने ज्यूट गोण्यांचा वापर टाळतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
खासगी साखर कारखान्याच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले, की केंद्र सक्ती करीत असले तरी ज्यूट गोण्यांमध्ये साखर साठवणे अजिबात योग्य नाही. मुळात, निर्यातीची साखर अशा गोण्यांमध्ये इतर देश स्वीकारत नाहीत. ज्यूटचे धागे साखरेत मिसळत असल्यामुळे आरोग्यविषयक मुद्दे उपस्थित होतात. याशिवाय प्लॅस्टिक गोण्याच्या तुलनेत ज्यूट गोणी चौपटीने महाग आहे. ज्यूट गोण्या वापरायच्या ठरवल्या तरी त्याचा पुरवठा वेळेत होत नाही. परिणामी कारखान्याचे वाहतूक व साठवणुकीचे नियोजन बिघडते. त्यामुळे ज्यूट गोण्यांची सक्ती केली तरी त्याचा वापर वाढविणे अवघड आहे.
उद्योगाला खूश करण्यासाठी खटाटोप
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले, की ज्यूट गोणीनिर्मिती उद्योगाला खूश करण्यासाठीच खटाटोप केला जात असतो. त्यामुळेच ज्यूट गोण्या वापराची आमच्यावर सक्ती केली जात आहे. परंतु, या गोण्यांचा वापर अजिबात परवडणारा नाही. सध्या वापरली जात असलेली प्लॅस्टिक गोणी सर्व अंगांनी उपयुक्त, किफायतशीर आणि आरोग्यदायी आहे. हा विषय उगाच ताणून धरण्यापेक्षा केंद्राने साखर उद्योगाची सोय विचारात घ्यायला हवी, असे आम्हाला वाटते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.