Milk Business Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Business : विश्‍वासार्हता, गुणवत्तेवर दुग्ध व्यवसायाची भरभराट

Team Agrowon

चंद्रकांत जाधव

Dnyaneshwar Chaudhary Success Story : वडनगरी (ता. जि. जळगाव) येथील ज्ञानेश्‍वर चौधरी यांनी आजोबांच्या काळापासूनचा दुग्ध व्यवसाय अत्यंत चिकाटी, विश्‍वासार्हता व दुधाची गुणवत्ता यांच्या आधारे टिकवला व विस्तारला. सध्या ६०० लिटरपर्यंत दूध संकलन, रतीब व आता प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती यातून व्यवसाय भरभराटीस आणला आहे.

ज्ञानेश्‍वर साहेबराव चौधरी हे नाव जळगाव शहरात दुग्ध व्यवसायात चांगलेच परिचित आहे.
आजोबा दौलत चौधरी यांच्या काळापासून कुटुंबात सुरू असलेली या व्यवसायाची परंपरा त्यांनी मोठ्या चिकाटीने व प्रयत्नांतून जपली व विस्तारली आहे. आजोबा दौलत यांच्याकडे सुरुवातीला पाच म्हशी होत्या. साहेबराव (ज्ञानेश्‍वर यांचे वडील) यांनी व्यवसाय वाढविताना जळगावात त्रिमूर्ती डेअरी सुरू केली. पुढे साहेबराव व त्यांचे बंधू विभक्त झाले. मग त्यांची मुले ज्ञानेश्‍वर व कमलाकर यांनी न्यू त्रिमूर्ती डेअरी सुरू केली. वडिलांच्या निधनानंतर जुन्या डेअरीची जबाबदारी कमलाकर यांच्याकडे आली. तर ज्ञानेश्‍वर यांनी अलीकडे जळगावात श्री त्रिमूर्ती डेअरी सुरू केली. ज्ञानेश्‍वर सन १९९२ पासून दुग्ध व्यवसायात असून, त्यातील मोठा अनुभव व कौशल्य त्यांनी संपादन केले आहे. सध्या मुलगा अनिकेत व्यवसायात साथ देत आहे. पशुवैद्यकीय विषयाचे शिक्षण घेण्याचा त्याचा मानस आहे.

गोठा व्यवस्थापन- ठळक बाबी

-वडनगरी गावानजीक १९५ चौरस फुटांचा हवेशीर गोठा. ४० म्हशी (मुऱ्हा व जाफराबादी) व ३२ गायींचे (जर्सी व एचएफ) संगोपन. दर पाच वर्षांनी नवा रेडा व वळू आणला जातो. गोठ्यात जनावरांची चांगली पैदास करण्यावर भर.
-गोठा व्यवस्थापनासाठी पाच मजूर कार्यरत.
-दररोज पहाटे चार वाजेला कामांना सुरुवात. जनावरांना बसण्यासाठी काँक्रिटीकरण व्यवस्था.
-सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे देखरेख.
-गोठ्याचे महिन्यातून दोन वेळा निर्जंतुकीकरण.
-परिसरातच आठ एकर शेती. चार एकरांत संकरित नेपियर गवत. कोरड्या व हिरव्या चाऱ्या व्यतिरिक्त सरकी ढेप, स्टार्च, मक्यावर आधारित पशुखाद्य यांचाही वापर.
-गव्हाणीत चारा दिला जातो. त्यामुळे तो वाया जाण्याचे प्रमाण अल्प.
-पाण्यासाठी विहीर. मोठा जलकुंभ. चार दिवस पुरेल एवढा त्यात जलसाठा.
-चारा वाहतुकीसाठी बैलजोड्या. (एकूण तीन बैलजोड्या). दूध वाहतुकीसाठी चारचाकी वाहन.
-जातिवंत पशुधन व चोख व्यवस्थापनामुळे मरतुकीचे व वैद्यकीय खर्चाचे प्रमाण कमी.
-जर्सी गायी, मुऱ्हा व जाफराबादी म्हशी जळगावच्या उष्ण वातावरणात तग धरतात. त्यांच्या दूध उत्पादनावर परिणाम होत नसल्याचे दिसते.
-गोठा ‘आरसीसी’ स्वरूपात. त्यामुळे दुरुस्ती, अति पाऊस, वादळात नुकसान जोखीम कमी.

गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन

-गायी व म्हशींचे मिळून दररोज सुमारे ६०० लिटर दूध संकलन.
-प्रति गाय प्रति दिन सरासरी १२ लिटर, तर म्हैस सरासरी ११ लिटर
दूध.
-दर्जेदार आहार व्यवस्थापनामुळे दूध उत्पादनात सातत्य.
-म्हशींची खरेदी गुजरात, तर गायींची पंजाबहून.
-जातिवंत पशुधनाबाबतचे बारकावे ज्ञानेश्‍वर यांना माहिती असल्याने खरेदीत फसवणूक होत नाही.
-आजवरच्या दीर्घ प्रवासात चौधरी कुटुंबाने सुमारे चारशे ते साडेचारशे ग्राहक निर्माण केले आहेत.
-दररोज ४०० लिटर दुधाचे पिशवीतून रतीब. म्हशीच्या ‘रेग्युलर’ दुधाचा दर ७३ रुपये, स्पेशल दुधाचा दर ८२ रुपये व गायीच्या दुधाचा दर ५७ रुपये प्रति लिटर.
-शिल्लक दुधाची डेअरीत विक्री.
-दररोज ६० लिटर दूध वेगळे ठेवून त्यातील १५ लिटरपासून पेढे, २० लिटरपासून दही व अन्य पनीर व खवा यांची निर्मिती.

सर्वाधिक खर्च पशुखाद्यावर होतो. त्यासाठी दरमहा अडीच लाख रुपये तसेच पशुवैद्यकीय बाबींसाठी १५ हजार, मजुरी ५० हजार, इंधन, डेअरीचे भाडे आदींसाठी ५० हजार रुपये दरमहा लागतात.
दरमहा आठ लाखांची उलाढाल होते. लग्न सोहळे, सण आदींसाठी दुधाची उन्हाळ्यात मागणी वाढते. याकाळात पुरवठा व चोख वितरणासाठी तारेवरची कसरत होते. कर्मचारी काही कारणाने अनुपस्थित राहिल्यास चौधरी पितापुत्र कशाची उणीव तयार होऊ देत नाहीत. गोठ्यातील कामांपासून ते दूध वितरणापर्यतच्या सर्व कामांत ते तरबेज आहेत. अनिकेत दूध रतिबाचेही काम करतात. लवकरच पॅकिंग यंत्रणा आणणार असून, उत्पादनांची ‘ब्रॅण्ड’ने विक्री करणार आहेत. दूधपुरवठा, आर्थिक कामकाज व संपर्क यासाठी लवकरच ॲपची यंत्रणा राबविण्याचे चौधरी यांचे प्रयत्न सुरू आहेत.

चाऱ्याची साठवणूक

गोठ्यानजीक १०० बाय ३५ फूट लांबी रुंदी व १८ फूट उंचीचे गोदाम उभारले आहे. दरवर्षी किमान ७० टन चारा त्यात साठविला जातो. छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा जिल्ह्यातून चारा आणला जातो. यंदा साडेसहा रुपये प्रति किलो या दरात गव्हाची काड घेतली. दोन कर्मचारी हिरव्या चाऱ्याची कापणी व तो पशुधनाला खाऊ घालण्याच्या कामांत व्यस्त असतात.

शेणखताचा लाभ

दरवर्षी सुमारे १२५ ट्रॉली शेणखत प्राप्त होते. खतविक्रीतून दरवर्षी काही लाख रुपये मिळतात. यंदा २५०० रुपये प्रति ट्रॉली दराने विक्री केली. स्वतःच्या शेतातही त्याचा वापर होत असल्याने जमिनीची सुपीकता टिकवली आहे. गोठ्यातील मलमूत्रही शेणखतात सोडले जाते.
..............................................................................
ज्ञानेश्‍वर चौधरी, ९८६०२६४६७८
अनिकेत चौधरी - ९१४५५०७२०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT