
Dairy business : सातारा व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर सांगवी गाव (Sangvi Village) आहेत. ऊस हे इथले प्रमुख पीक असून, दुग्ध व्यवसायालाही चांगली चालना मिळाली आहे. साहजिकच मोठ्या प्रमाणात चारा पिकेही घेतली जातात. गावातील ७० टक्के शेतकरी शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय करतात.
त्यातीलच एक आहेत. दत्तात्रेय विजय वाघ. ते प्रगतिशील शेतकरी असून, त्यांची बागायती साडेचार ते पाच एकर शेती आहे. वडिलांच्या काळापासून त्यांच्याकडे हा व्यवसाय सुरू आहे.
दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर दत्तात्रेय यांनीही शेतीची जबाबदारी घेत घरचा दुग्ध व्यवसाय पुढे सुरू ठेवला. गोठ्यातील कालवडी न विकता त्यांचे संगोपन करण्यावरच भर दिला. त्यामुळे टप्प्याटप्प्याने गायींच्या संख्येत वाढ होत गेली. मोठा खर्च न करता साध्या पद्धतीचा छप्पर असलेला गोठा बांधला.
संख्या वाढत जाईल तसा मग तो बांधीव स्वरूपाचा केला. सुरुवातीच्या टप्प्यात दिवसाला शंभर लिटरपर्यंत दूधसंकलन होऊन ते डेअरीला जायचे. त्या वेळी मुरघास निर्मितीही सुरू केली. जवळपास २० वर्षे या पद्धतीने दुग्ध व्यवसाय सुरू होता.
गोठ्यातील सुधारणा
सन २०१८ च्या सुमारास फलटण येथील गोविंद मिल्क डेअरीच्या सहकार्याने दत्तात्रेय यांना पंजाबातील दुग्ध व्यवसाय पाहण्याची संधी अभ्यासदौऱ्यातून उपलब्ध झाली. तेथील आधुनिक तंत्रज्ञान व गायींची दूध देण्याची क्षमता अधिक का आहे याचा अभ्यास त्यांनी केला.
त्यानंतर आजगायत पंजाबात सुमारे पाच अभ्यासदौरे दत्तात्रेय यांनी केले आहेत. त्यातून प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या गोठा व्यवस्थापनात सुधारणा केल्या. मुक्त संचार पद्धती फायदेशीर वाटल्याने सुरुवातीला कालवडींसाठी त्याचा वापर केला.
टप्प्याटप्प्याने सर्वच गायींचे संगोपन त्यानुसार सुरू केले. आज ६० बाय ५० फूट आकाराचे तीन मुक्तसंचार गोठे उभारले आहेत. त्यामध्ये एचएफ संकरित जातीच्या ४० गायी व २५ कालवडी आजमितीला आहेत. दिवसाला २५ लिटर दूध देणाऱ्या बहुतांश, तर कमाल ३५ लिटरपर्यंत दूध देणाऱ्याही काही गायी आहेत. आपल्या दुग्ध प्रकल्पाचे मंगलमय डेअरी असे नामकरण केले आहे.
कालवडी निर्मिती
पंजाब दौऱ्यात दत्तात्रेय यांनी दर्जेदार कालवडी निर्मितीचे शास्त्र समजून घेतले. लुधियाना येथील पशू प्रदर्शन पाहिले. आपल्याकडील गायी दररोज १२ लिटरपर्यंत दूध देतात. तर पंजाबात वार्षिक सरासरी काढली, तर दररोज तेथील गायी २५ ते ३० लिटर दूध देतात.
तसेच तेथील गायींचे दुग्धोत्पादन आपल्याकडील गायींपेक्षा दीड पट ते दुप्पट असल्याचे दिसून आले. अभ्यास करताना त्यामागील प्रमुख कारण दर्जेदार ‘इम्पोर्टेड सिमेन’ असल्याचे दिसून आले.
त्यानंतर शेतकऱ्यांनी त्याची मागणी केल्यावर गोविंद डेअरीने या सिमेनची उपलब्धता करून दिली. त्याआधारे वाघ यांच्याकडे १५ कालवडी तयार होत आहेत. त्यातून दूध उत्पादनाची सरासरी १२ लिटर वरून १८ लिटरवर जाण्यास मदत मिळणार आहे.
दत्तात्रेय यांनी नुकतीच पावणेतीन वर्षांच्या कालवडीची पावणेदोन लाख रुपयांना विक्री केली आहे. आधुनिकता, यांत्रिकी करणाची जोड दिली आहे. ‘गोविंद मिल्क’च्या कामधेनू गोवंश सुधार योजनेअंतर्गत कृत्रिम रेतन सुधारणा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात सहभाग घेतला आहे.
कालवडी जन्मल्यानंतर चीक दूध पाजणे, वाढीनुसार आहार व्यवस्थापन, वेळच्या वेळी लसीकरण, वजनाच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. पुढील पाच वर्षांत पंजाबाप्रमाणे वार्षिक दूध उत्पादनाची सरासरी गाठणे शक्य असल्याचे दत्तात्रेय सांगतात.
व्यवस्थापनातील ठळक बाबी
१) मुक्त संचार गोठ्यात गायींना आवश्यकतेनुसार पाणी पिता यावे यासाठी सायफन पद्धतीचा वापर.
२) गायीला वजनानुसार दररोज ३५ ते ४० किलो चारा.
३) वर्षातून एक वेळ जंतनाशक, लाळ्या खुरकूत आदींसाठी लसीकरण.
४) गोठ्यात सहा मजूर. यामध्ये चारा, कुट्टी तयार करण्यापासून दूध काढण्यापर्यंत सर्व दैनंदिन कामांचा समावेश. कामांच्या पद्धतीने मजुरी दिली जात असल्यामुळे प्रत्येक गाईवर त्यांचे बारकाईने लक्ष राहते.
५) दर्जेदार चारा मिळावा यासाठी वर्षभरात २०० टन मुरघास निर्मिती. गरजेनुसार अन्य शेतकऱ्यांकडून चाऱ्याची खरेदी.
६) दूध काढण्यासाठी मिल्किंग मशिनचा वापर.
७) दैनंदिन ४५० ते ५०० लिटर, तर महिन्याला सुमारे १५ हजार लिटरपर्यंत दूध संकलन होते.
८) प्रति लिटर ३७ ते ३८ रुपये दर मिळतो. दुधाची मासिक उलाढाल सहा लाख रुपयांपर्यंत होते.
९) गावातील २० गोपालकांनी गोधन पशुपालक बचत गट स्थापन केला आहे. त्यात दत्तात्रेय यांचा समावेश. गटाच्या माध्यमातून पशुखाद्य विक्री केंद्र. सर्व पशुपालक या ठिकाणी एकत्र येत असून, समस्या, उपाय याविषयी संवाद होत असतो.
१०) गावात दत्तात्रेय यांचे शीतकेंद्रही आहे. तेथे दररोज सरासरी चार हजार लिटर दूध संकलन होते. मार्गदर्शन
११) गोविंद मिल्क ॲण्ड मिल्क प्रॅाडक्ट्सचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.