Implementation of Preventive Measures against Silkworms : रेशीम उद्योगात नुकसान होण्यामागील सर्वात मुख्य कारण म्हणजे रेशीम कीटकांवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव. रेशीम कीटकांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर उपाय करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी अधिक महत्त्वाची ठरते. रेशीम कीटकांचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी संगोपनगृह, त्याचा परिसर आणि संगोपनगृहात रेशीम उत्पादनासाठी वापरण्यात येणारी उपकरणे यांचे योग्य पद्धतीने निर्जंतुकीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. रोगग्रस्त रेशीम किडे रोगजनकांना संगोपनाच्या वातावरणात बाहेर टाकतात आणि तेच संक्रमणाचे स्रोत बनतात. रोगास कारणीभूत असलेल्या रोगजनकांचा नाश करणे याला निर्जंतुकीकरण म्हणतात. त्यासाठी रासायनिक नियंत्रण पद्धती अत्यंत प्रभावीपणे काम करते. त्याविषयी माहिती घेऊ.
निर्जंतुकीकरणाचे वेळापत्रक
संगोपन पूर्ण झाल्यावर
रोगग्रस्त अळ्या, खराब कोष गोळा करून जाळून नष्ट करावेत.
फॉर्मेलिनने फ्युमिगेशन करून रोटरी माउंटेज निर्जंतुक करावे.
संगोपन घर आणि उपकरणांचे प्रथम निर्जंतुकीकरण करावे.
नवीन संगोपन करण्यापूर्वी ५ दिवस आधी
उपकरणांची स्वच्छता करून घ्यावी.
त्यानंतर उपकरणे उन्हामध्ये वाळवावीत.
नवीन संगोपन करण्यापूर्वी ४ दिवस
चुन्याच्या द्रावणाने संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण करावे.
नवीन संगोपन करण्यापूर्वी ३ दिवस
संगोपनगृह आणि उपकरणांचे दुसरे निर्जंतुकीकरण करावे.
नवीन संगोपन करण्यापूर्वी २ दिवस
संगोपनगृहाभोवती ५ टक्के ब्लिचिंग पावडर आणि विरलेला चुना यांच्या मिश्रण टाकून धुवून घ्यावे.
संगोपनगृहातील खिडक्या वायुवीजनासाठी उघडून ठेवाव्यात.
संगोपनगृह आणि उपकरणांचे निर्जंतुकीकरण
संगोपनगृहाचे पॉवर स्प्रेअरच्या मदतीने शिफारशीत जंतुनाशकाद्वारे दोन वेळा निर्जंतुकीकरण करावे. प्रत्येकवेळी एका जंतुनाशकाने निर्जंतुकीकरण करावे. मागील संगोपनात ग्रासेरी किंवा व्हायरल फ्लॅचेरीचा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास, ०.३ टक्के विरलेला चुना वापरून पर्यायी निर्जंतुकीकरण करण्याची देखील शिफारस केली जाते.
जंतुनाशक द्रावणाचे प्रमाण
प्रति चौरस मीटर मजला क्षेत्र : १.५ लिटर किंवा
प्रति चौरस फूट मजला क्षेत्र : १४० मिलि
शिफारस केलेली जंतुनाशके
ब्लिचिंग पावडर (२ टक्के) अधिक ०.३ टक्के विरलेल्या चुनाच्या द्रावण.
०.०५ टक्के अस्त्रा द्रावण
२.५ टक्के सॅनिटेक किंवा सेरिक्लोर अधिक ०.५ टक्के विरलेला चुन्याचे द्रावण.
०.२ टक्के सेरिफीट सोल्यूशन
०.३ टक्के विरलेला चुना द्रावण
जंतुनाशक द्रावण बनविण्याची पद्धती
ब्लिचिंग पावडरचा वापर
फवारणीसाठी १०० लिटर पाणी घ्यावे. त्यानंतर दोन किलो ब्लिचिंग पावडर आणि ३०० ग्रॅम विरलेला चुना घेऊन त्यात थोडेसे पाणी घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट उरलेल्या पाण्यात मिसळून द्रावण व्यवस्थित ढवळून घ्यावे. द्रावण १० मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर निर्जंतुकीकरणासाठी वरवरचे द्रावण वापरावे.
अस्त्रा द्रावण
संगोपनगृह तसेच आजूबाजूचा परिसर आणि संगोपनगृहातील उपकरणे निर्जंतुकीकरणासाठी ०.०५ टक्के तीव्रतेच्या अस्त्रा द्रावणाची शिफारस करण्यात आली आहे.
०.०५ टक्के तीव्रतेचे अस्त्रा द्रावण तयार करण्यासाठी १०० लिटर पाण्यात ५० ग्रॅम अस्त्रा पावडर मिसळून घ्यावी. काठीच्या मदतीने व्यवस्थित ढवळून
जंतुनाशक पाण्यात चांगले मिसळून घ्यावे. हे द्रावण जंतुनाशक द्रावण २ तास तसेच ठेवून त्यानंतर फवारणीसाठी वापरावे.
सॅनिटेक किंवा सेरिक्लोर अधिक विरलेल्या चुन्याचे द्रावण
शंभर लिटर प्रमाणचे सॅनिटेक किंवा सेरिक्लोरचे द्रावण तयार करण्यासाठी बादलीमध्ये २५० ग्रॅम ॲक्टिवेटर क्रिस्टल्स (स्फटिक) घेऊन २.५ लिटर सॅनिटेक किंवा सेरिक्लोर सोल्यूशन त्यात मिसळून घ्यावे. द्रावण चांगले ढवळून १० मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर ९७.५ लिटर पाण्यात तयार द्रावण अधिक ५०० ग्रॅम विरलेला चुना घालून द्रावण पुन्हा चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर तयार द्रावणाचा निर्जंतुकीकरणासाठी वापर करावा.
सेरिफीट द्रावण
१०० लिटर पाण्यामध्ये २०० ग्रॅम सेरिफीट पावडर मिसळून चांगली विरघळवून घ्यावी. त्यानंतर द्रावण ३० मिनिटांसाठी स्थिर ठेवून नंतर फवारणीसाठी वापर करावा.
विरलेला चुना द्रावण तयार करणे
पेस्ट तयार करण्यासाठी ३०० ग्रॅम विरलेला चुना पावडर थोडे पाणी घेऊन त्यात मिसळून पेस्ट तयार करावी. तयार पेस्ट उरलेल्या पाण्यात घालून द्रावण चांगले ढवळून घ्यावे. त्यानंतर तयार द्रावण १० मिनिटे तसेच ठेवून नंतर फवारणीसाठी वापरावे.
(टीप : वरीलपैकी कोणत्याही एका जंतुनाशकाचे द्रावण तयार करून फवारणी करावी. आलटून पालटून फवारणीसाठी वापर करावा.)
बेड निर्जंतुकीकरण वेळापत्रक
(वापर : धुरळणीद्वारे)
रेशीम अळीने कात टाकल्यानंतर अंकुश किंवा विजेता आणि विजेता सप्लिमेंट यापैकी कोणत्याही एक जंतुनाशकाचा खालीलप्रमाणे वापर करावा.
अंकुश : ३ ते ४ ग्रॅम प्रति चौरस फूट प्रत्येक कात टाकणीनंतर (मोल्टनंतर) आणि अंतिम अवस्थेच्या तिसऱ्या व पाचव्या दिवशी
विजेता : ५ ग्रॅम प्रति चौरस फूट प्रत्येक कात टाकणीनंतर आणि अंतिम अवस्थेच्या चौथ्या दिवशी
विजेता सप्लिमेंट : ४ ते ५ ग्रॅम प्रति चौरस फूट चौथ्या अवस्थेच्या तिसऱ्या दिवशी आणि अंतिम अवस्थेच्या दुसऱ्या व सहाव्या दिवशी बुरशीजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी.
(वरील सर्व जंतुनाशकांना केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, म्हैसूर यांची शिफारस आहे.)
रेशीम संगोपनगृहात रोग प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी
संगोपनगृहात प्रवेश करण्यापूर्वी अस्त्रा किंवा ब्लिचिंग पावडरच्या द्रावणाने हात स्वच्छ धुवावेत.
संगोपनगृहात प्रवेश करण्यापूर्वी पायांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ उथळ ट्रेमध्ये अस्त्रा किंवा ब्लिचिंग पावडरचे द्रावण ठेवावे.
संगोपनगृहातील रोगग्रस्त, मृत आणि अति लहान आकाराच्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
संगोपनगृहाची स्वच्छता केल्यानंतर तेथील कचरा गोळा करून जाळून नष्ट करावा.
तुतीची पाने निर्जंतुकीकरण केलेल्या स्वतंत्र खोलीत ठेवावीत. तसेच रेशीम अळ्यांना दर्जेदार तुतीची पाने खाद्य म्हणून द्यावीत.
रेशीम अळ्यांची निरोगी वाढ होण्यासाठी संगोपनगृहात इष्टतम तापमान, आर्द्रता आणि अंतर राखावे.
संगोपनगृहात अळ्या मोल्टसाठी स्थिरावतात, त्यावेळी बेडवर चुना पावडरची धुरळणी करावी.
अशोक जाधव, ९०७५०८८७५५
(संशोधन विस्तार केंद्र, केंद्रीय रेशीम बोर्ड, वस्त्र मंत्रालय, भारत सरकार, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.