Silk Worm Pest : रेशीम कीटकावरील उझी माशीचे नियंत्रण

Silk Farming : रेशीम कीटकाच्या अळीवर उझी माशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अळीचा किंवा कोषाचा मृत्यू निश्‍चित असतो. उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे साधारणतः ३० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.
Silk Worm Pest
Silk Worm PestAgrowon
Published on
Updated on

डॉ. सी. बी. लटपटे, डी. एन. मोहोड, डॉ. संजोग बोकन

Silk Worm Pest Management : रेशीम उद्योगामध्ये सर्वात जास्त नुकसानकारक कीड म्हणून ‘उझी माशी’ ओळखली जाते. रेशीम कीटकावर उपजीविका करणाऱ्या उझी माशीचे तीन प्रकार आहेत.

तुती रेशीम कीटकावरील उझी माशी (एक्झोरिस्टा बॉम्बीस)

मुगा रेशीम कीटकावरील उझी माशी (एक्झोरिस्टा सॉरबिलन्स)

टसर रेशीम कीटकावरील उझी माशी (ब्लेफेरिया झेबिना).

सध्या महाराष्ट्राबरोबर आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल आणि आसाम राज्यातही या तीनही प्रकारच्या रेशीम कीटकांवर उझी माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. उझी माशीचा रेशीम कीटकाच्या अळीवर प्रादुर्भाव झाल्यावर अळीचा किंवा कोषाचा मृत्यू निश्‍चित असतो. उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे साधारणतः ३० टक्क्यांपर्यंत नुकसान करते.

उझी माशीचा जीवनक्रम

प्रौढ

उझी माशीचा प्रौढ काळ्या करड्या रंगाच्या असून पाठीवर चार लांब रेषा असतात. नर माशी आकाराने मोठी आणि मादी माशीपेक्षा लांब असते.

नर माशी ५ ते १५ दिवस, तर मादी माशी २० ते २५ दिवस जगते.

रेशीम कीटकाच्या वाढीच्या पाचव्या व चौथ्या अवस्थेतील अळीच्या शरीरावर एक किंवा दोन अंडी घालते. मुगा रेशीम कीटकावरील उझी माशीची अंडी देण्याची क्षमता ९० ते ९०० पर्यंत असते.

उझी माशी रेशीम अळीच्या खंड वलयाच्या ठिकाणी अंडी घालते. वाढीच्या पाचव्या अवस्थेत उझी माशीची अळी रेशीम अळीच्या शरीरात ७ दिवस राहते.

अळी शरीराबाहेर पडल्यानंतर २४ तासांत उझी माशीचे रूपांतर कोष अवस्थेत (प्युपा) होते.

अंडी अवस्था

अंडी पांढऱ्या रंगाची असून व एका बाजूला निमुळती गोलाकार असतात.

तापमान बदलाप्रमाणे मुगा रेशीम कीटकावरील उझी माशीचा अंडी उबण काळ १५ दिवसांचा आहे. मराठवाडा विभागातील तापमानात उझी माशीने घातलेल्या अंड्यातून १ ते ३ दिवसांत अंड्यातून अळी बाहेर पडते.

Silk Worm Pest
Silk Farming : रेशीम कीटकावरील उझी माशीचे एकात्मिक नियंत्रण

अळी अवस्था

अळी पाय विरहित प्रकारची असून अळीचे शरीर १२ खंड वलयात (१ + ३ + ८) विभागलेले असते. अळी पिवळसर पांढऱ्या रंगाची असते.

अंड्यातून बाहेर पडलेली पहिल्या अवस्थेतील अळी तोंडाच्या हुकच्या साह्याने रेशीम कीटकाच्या त्वचेला छिद्र पाडून शरीरात प्रवेश करते.

अळीने आत प्रवेश केलेले काळसर छिद्र शेपटीसारखे उघडे असते. त्यातून उझी माशीच्या अळीला श्‍वसनासाठी हवेचा पुरवठा होतो.

अळी रेशीम कीटकाच्या शरीराच्या आतील द्रव्यावर उपजीविका करते.

अळीच्या पहिल्या दोन अवस्था प्रत्येकी अडीच दिवसांची असते. तिसऱ्या अवस्थेतील अळी रेशीम कीटकाच्या शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि रेशीम ग्रंथीचा ३ दिवस पडशा पाडते.

कोष अवस्था

रेशीम कीटकाच्या शरीरात पूर्ण वाढ झाल्यानंतर उझी माशीची अळी कोष अवस्थेत जाण्याअगोदर रेशीम अळीच्या शरीराच्या बाहेर पडते.

शेडमधील फरशीच्या फटीत किंवा जमिनीत उझी माशी कोष अवस्थेत जाते. कोष अवस्था ९ ते १८ दिवसांची असते. त्यानंतर कोषातून प्रौढ माशी बाहेर पडते.अशाप्रकारे २२ दिवसांत उझी माशी जीवनक्रम पूर्ण करते.

एकात्मिक व्यवस्थापन

रेशीम कीटकाच्या वाढीच्या चौथ्या किंवा पाचव्या अवस्थेत शरीरावर काळे डाग दिसताच अशा प्रकारच्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.

बिजगुणन केंद्रात वाढीच्या चौथ्या किंवा पाचव्या अवस्थेतील रेशीम अळीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या अशा अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.

बिजगुणन केंद्रात किंवा कोष गोदामात उझी माशी कोषात अंडी घालण्यापासून रोखण्यासाठी नायलॉन जाळीचे आच्छादन करावे.

बिजगुणन केंद्र किंवा प्रौढ संगोपनगृहात खिडकीच्या आतील व बाहेरील बाजूस पांढऱ्या ‘ट्रे’मध्ये उझीसाइडच्या दोन गोळ्या प्रतिलिटर पाणी या प्रमाणे ठेवाव्यात. त्यामुळे प्रौढ उझी माशीच्या प्रवेशास अटकाव करणे शक्य होते.

शंभर अंडिपुंजासाठी ६ लिटर उझीसाइड चौथ्या वाढीच्या अवस्थेत एक वेळा तर पाचव्या वाढीच्या अवस्थेत २ वेळा फवारणी केल्यास उझी माशीने दिलेली अंडी नष्ट होतात.

पाचव्या वाढीच्या अवस्थेत तुळशी पाला अर्काची फवारणी केल्यास उझीमाशी अळीवर अंडी घालत नाहीत.

रेशीम कीटक संगोपनगृहात कोंबड्या सोडाव्यात. जेणेकरून उझी माशीच्या सर्व अळ्या कोंबड्या खाऊन फस्त करतील.

Silk Worm Pest
Silk Farming : रेशीम कीटकावरील उझी माशीचे एकात्मिक नियंत्रण

प्रादुर्भावाची लक्षणे, नुकसानीचा प्रकार

रेशीम कीटकाच्या चौथ्या किंवा पाचव्या अवस्थेतील अळीवर उझी माशीची अंडी अवस्था दिसून येते. किंवा प्रादुर्भावग्रस्त अळीच्या शरीरामध्ये प्रवेश करण्यासाठी केलेले काळ्या रंगाचे छिद्र दिसते किंवा उझी माशीची अळी कोषातून बाहेर पडलेले काळ्या रंगाचे छिद्र दिसते.

वाढीच्या चौथ्या अवस्थेत उझी माशीचा प्रादुर्भाव झाला तर कोष विणण्याअगोदरच रेशीम अळी मृत पावते.

पाचव्या वाढीच्या अवस्थेत उशिरा उझी माशीचा प्रादुर्भाव झाल्यास, रेशीम अळी कमकुवत कोष तयार करते. अशा प्रकारच्या कोषातून उझी माशीच्या अळ्या बाहेर पडतात. अशा प्रकारचे कोष विनण करण्यासाठी सक्षम राहत नसून धागा तुकडे तुकडे स्वरूपात मिळतो.

उझी माशीच्या अळ्या रेशीम अळीचा पूर्ण फडशा पाडल्यानंतर तिच्या शरीरातून बाहेर पडते. त्यानंतर जमिनीवर रेंगतात व कोषावस्थेत जातात.

उशिरा प्रादुर्भाव झालेल्या रेशीम अळीतून उझी माशीच्या अळ्या बाहेर न येता, काही अंशी रेशीम कोषात देखील कोषावस्थेत जातात.

रेशीम कोषातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा रेशीम अळीच्या शरीरावर बसून पुन्हा मादी उझी माशी अंडी घालते.

जैविक नियंत्रण

परोपजीवी जैविक कीटक मात्रा निर्जंतुकीकरणानंतर सोडण्याची वेळ

निझोलायनेक्स थायमस या परोपजीवी कीटकाचे एनटी पाऊच २ पाऊच प्रति १०० अंडीपुंज जमिनीपासून ३ ते ४ फूट उंचीपर्यंत दुसऱ्या किंवा तिसऱ्या रॅकला मध्यम भागी लावावेत.

ट्रायचोप्रिया, एक्झेरिस्टोबिया फिलिपिन्सिस, टेट्रास्टिचस हावार्डी, डायहिनस स्पे. १० लक्ष प्रति १०० अंडिपुंज (चौथ्या वाढीच्या अवस्थेत : ८०००, पाचव्या वाढीच्या अवस्थेत : १६,००० व कोष काढणी केल्यानंतर ७६००० प्रौढ जैविक कीटक सोडावेत.) संगोपनगृह निर्जंतुकीकरण केल्यानंतर लगेच परोपजीवी कीटक न सोडता २ ते ३ दिवसांनी सोडावेत.

रासायनिक नियंत्रण

रासायनिक फवारणी फवारणीचा कालावधी

डायफ्लुबेन्झुरॉन व बेन्झॉइक ॲसिड रेशीम कीटकावर उझी माशीने अंडी दिल्यानंतर.

डॉ. सी. बी. लटपटे, ७५८८६१२६२२

(रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com