Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षान्त सोहळ्याचा कार्यक्रम दिमाखदार झाला. मात्र, या सोहळ्याला नाराजीची किनारही यंदा लाभली. राज्यपाल व इतर मान्यवरांच्या सुरक्षेच्या कारणामुळे बुधवारी (ता. पाच) झालेल्या दीक्षान्त सोहळ्याच्या नियोजनात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या काही गोष्टींना फटका बसला.
आचार्य पदवी, विविध प्रकारचे सुवर्ण व इतर पदक विजेते, उत्कृष्ट संशोधक, अधिकारी-कर्मचाऱ्यांना, विजेत्यांना एका रांगेत उभे करून सन्मानित केल्या गेले. यापूर्वी वरीलपैकी प्रत्येक गटातील पदक, पदवी विजेत्याला सन्मानाने व्यासपीठावर निमंत्रित करून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविले जात होते.
मात्र, वेळेच्या कारणाने यंदा नवीन पद्धत सुरू केल्याने कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, पालक तसेच विद्यार्थ्यांनीही कमालीची नाराजी व्यक्त केली. वेळ व सुरक्षेचे कारण देत अशाप्रकारे ‘रांगेत’ गौरविणे योग्य नसल्याचेही पालक म्हणाले. आमच्या मुलांनी मेहनतीने आजचे हे यश मिळवले होते.
किमान त्यांचा मान्यवरांनी प्रमाणपत्र देऊन सन्मान केला असता तर नक्कीच आनंद वाढला असता, असे बोलत काही पालकांनी भावना व्यक्त केली. तर राजभवनातून नियोजन निश्चित झाल्याने विद्यापीठ प्रशासनाला काहीही करणे शक्य नव्हते, असे सांगण्यात आले आहे.
‘पसायदानही गायब’
पसायदान हे एक शाश्वत व सकारात्मक भाव असलेल्या संस्काराचं प्रतीक आहे. सहकार्य आणि कृतज्ञतेची शिकवण देते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ दीक्षान्त सोहळ्यात दरवर्षी ‘पसायदान’ हा कार्यक्रमाचा एक भाग राहत आलेला आहे. यंदा पसायदानाला वगळण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मोठ्या मेहनतीने पीएचडी पदवी संपादन केली. आज माझ्यासाठी गौरवाचा क्षण होता. राज्यपाल, कृषिमंत्र्यांच्या हस्ते ही पदवी घेण्यासाठी आपण उत्सुक होतो. सोहळ्यासाठी नातेवाईकही आज येथे आले होते. प्रत्यक्षात एकाचवेळी सर्वांना पदवी ‘बहाल’ करण्यात आली. यामुळे मनात किंचित नाराजीची भावना तयार झाली. कदाचित त्यांच्या प्रोटोकॉलमुळे हे नियोजन बदलले असावे.- आचार्य पदवी मिळवलेली विद्यार्थिनी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.