Decrease in water discharge from dams 
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : राज्यातील धरणांतून विसर्ग सुरूच

Dam Water Discharge : मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यांवर पावसाचा जोर कायम

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Rain Update : पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर कायम आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्‍चिम भाग आणि घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यांवर सर्वाधिक २०५ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढत असून, अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग अजूनही सुरूच आहे.

राज्यातील काही भागांत पावसाचा प्रभाव कमी अधिक होत आहे. परंतु पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. प्रामुख्याने शिरगाव, आंबोणे, दावडी, डुंगरवाडी, खोपोली या घाटमाथ्यांवर १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे या भागात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाच्या जोर असला, तरी अधूनमधून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना, कासारसाई, चासकमान, कळमोडी, वडीवळे, गुंजवणी, वीर, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, मुळशी अशी १४ धरणे ८० टक्क्यांहून अधिक भरल्याने या सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

नगरमधील अकोले, नाशिक, पुणे या भागांत भंडरदरा, गंगापूर, मुळा, आढळा, दारणा, कडवा या धरणांतील पाणीसाठा ७० टक्क्यांहून अधिक झाला आहे. तर कोयना धरणात ८०.०७ टक्के, धोम ७९.८९ टक्के, दूधगंगा ८५.११ टक्के, राधानगरी ९८.४३ टक्के भरले आहे. नगर, सोलापूर, खानदेशात पावसाचे प्रमाण कमी असून, अधूनमधून सरी बरसत आहेत. सांगली जिल्ह्यातील वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून दुसऱ्या दिवशीही विसर्ग कमी करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. यामुळे सोयाबीन, भुईमूग, भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाधित पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

कोकणात पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरी पावसाची संततधार सुरूच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून, वारा मात्र कायम आहे. सिंधुदुर्गमधील भेडशी मंडलात ७०, रत्नागिरीतील मंडणगड, म्हाप्रळ, देव्हारे मंडलात १०३ मिलिमीटर पाऊस पडला. तर पालघरमधील वाडा, कोणे, कांचगड ४५, मनवर ४५, तलसरी ६८, रायगडमधील कळंब मंडलात १०० मिलिमीटर पाऊस पडला. कोकणातील सर्वच नद्या भरून वाहत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत असलेले मोडक सागर, तानसा, विहार, तुलसी ही सर्व धरणे १०० टक्के, तर मध्य वैतरणा ८९.५१ टक्के भरले असून, भातसा ७९.३८ टक्के, अ.वैतरणा ६३.०८, बारावे ७३.३३, मोराबे ७७.१७, तिलारी ८६.३४, अर्जुना १०० टक्के, तर गडनदी ८०.०८ टक्के, देवघर ६०.३०, सूर्या ८२.१९ टक्के भरले आहे. तर अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे भात पिकांचे नुकसान झाले आहे.

विदर्भात पावसाचा जोर मंदावला आहे. तर अमरावतीतील सावळीखेडा मंडलात ५४, चिखलदरा ५३, सेमडोह ४९, चुर्णी ४८ मिलिमीटर पाऊस झाला. गडचिरोलीतील गडचिरोली ५९, येवळी ४९, ब्राह्मणी ६१, एटापल्ली ७५, चातगाव ६१, कर्वाफा ४६, मुरूमगाव ४१ मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. परंतु मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांत अजूनही पाण्याचा येवा सुरूच आहे. त्यामुळे गोसीखुर्द ३३.७४ टक्के, तोतलाडोह ८५.३२, काटेपूर्णा ४८.९९, ऊर्ध्व वर्धा ६९.१६ टक्के भरले आहे. मराठवाड्यात पाऊस नसला तरी अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. धरणक्षेत्रात अजूनही जोरदार पाऊस नसल्यामुळे धरणांतील पाणीपातळीत फार वाढ झालेली नाही. सध्या जायकवाडी धरणात ७.२३ टक्के, येलदरी ३१.२८, पेनगंगा ४३.६७ टक्के, तेरणा २७.६० टक्के, विष्णुपुरी ८८.४६, सिद्धेश्‍वर २४.८२ टक्के पाणीसाठा झाला असून, माजलगाव, मांजरा, दुधना या धरणांत अजूनही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही.


मंगळवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)
कोकण : अंगाव ५५, गोरेगाव ७०, नेरळ ६६, कशेळे ५९, वौशी ६३, खोपोली ६९, पाली, आटोने ६९, जांभूळपाडा ७७, बिरवडी ५४, कोलाड ५५, पोलादपूर, कोंडवी, वाकण ५७.
मध्य महाराष्ट्र : उंबरठाणा ५०, पेठा ६०, बामणोद ६१, माले, मुठे ७०, कार्ला १३३, खडकाळा ५०, लोणावळा ९६, वेल्हा ६३, पानशेत ५४, बामणोली ६३, केळघर ७३, करहर ५१, तापोळ, लामज ५५, कडगाव ६३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT