Village Development  Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development : शेतीसह ग्रामविकासालाही दिशा

 गोपाल हागे

गोपाल हागे

Agriculture Development : कणखर स्त्री घराच्या बरोबरीने शेती, पूरकव्यवसायाचाही आधार बनते. असेच काहीसे महागाव (ता. बार्शीटाकळी, जि.अकोला) येथील प्रमिला शेषराव ढोरे यांच्याबाबत म्हणता येईल. पतीच्या अपघाती निधनानंतर कोसळलेल्या संकटात मुलांचा सांभाळ करताना शेतीच्या बरोबरीने सामाजिक जीवनात ओळख तयार करण्यात त्यांनी यश मिळवले. सहावीपर्यंत शिकलेल्या प्रमिलाताई गावच्या सरपंच म्हणूनही यशस्वीपणे धुरा सांभाळत आहेत. कुटुंबाबरोबरीने गावाच्या मार्गदर्शक त्या बनल्या आहेत.

२००५ मध्ये प्रमिलाताईंचे पती शेषराव यांचे विजेचा धक्का लागून निधन झाले. कुटुंबासाठी हा खूप मोठा आघात होता. पती निधनानंतर प्रमिलाताईंनी कुटुंबप्रमुख म्हणून शेतीची सूत्रे हातात घेतली. कुटुंब आणि कोरडवाहू शेतीचा डोलारा सांभाळताना त्यांची आर्थिक कसरत होत होती. काहीवेळा अर्थार्जनासाठी प्रमिलाताईंनी घरकामासोबतच गावशिवारात शेतीमध्येही मजुरी काम करावे लागले. पतीच्या मृत्यूनंतर सहा एकर शेतीची जबाबदारी घेत पारंपरिक पीक पद्धती ऐवजी नवनवीन प्रयोग करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. त्यांना दोन मुली, दोन मुले आहेत. मोठा मुलगा दिवाकर हा वाहतूक व्यवसाय करतो, दुसरा मुलगा ज्ञानेश्‍वर हा शेतीमध्ये मदत करतो.

पारंपरिक पद्धतीने पहिल्यांदा कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, तीळ, ज्वारी लागवड असायची. परंतु टप्याटप्याने शेतीमध्ये सिंचनासाठी विहीर, कूपनलिका या सुविधा तयार करून बागायती पिकांच्या लागवडीस त्यांनी चालना दिली. सध्या कापूस, सोयाबीन, कांदा, भाजीपाला पिकांसाठी रासायनिक खते, कीटकनाशकांच्या वापरामुळे उत्पादन खर्च वाढलेला आहे. पीक उत्पादन आले तरीही तुलनेने दर कमी मिळत असल्याने खर्च आटोक्यात आणणे गरजेचे होते. जमिनीची सुपीकता आणि आर्थिक खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी प्रमिलाताईंनी सेंद्रिय खते,कीडनाशकांचा वापर वाढवला. जमीन सुपीकतेसाठी गांडूळ खत,जीवामृत, हिरवळीच्या खतांच्या वापरावर भर दिला आहे. फवारणीसाठी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्काचा वापर सुरु केला. पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खते, सेंद्रिय कीडनाशकांच्या वापराचे पिकावर चांगले

परिणाम त्यांना दिसून आले. त्यामुळे गावातील शेतकरी देखील सेंद्रिय खते, कीडनाशकांच्या वापराकडे वळले आहेत.

प्रयोगशील शेतीच्या दिशेने...

ढोरे कुटुंबाने शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतीला नवी दिशा दिली आहे. पोकरा प्रकल्पात गावाचा समावेश झाल्याने प्रमिलाताईंनी शेती विकासासाठी योजनेतील विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे संपर्क साधला. यातून वीस गुंठे क्षेत्रावर दोन शेडनेटची उभारणी केली. यामध्ये सिमला मिरची आणि काकडी लागवड केली जाते.

गटाच्या माध्यमातून धान्य प्रतवारी केंद्र आणि साठवण्यासाठी गोदाम बांधले आहे. घराजवळील विहिरीपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या शेतात पाइपलाइन टाकून पाणी नेले. विहिरीवर सौर पंप बसवला आहे. दुसऱ्या शेतामध्ये रोजगार हमी योजनेतून विहीर खोदली आहे. या विहिरीला चांगले पाणी लागले आहे. प्रमिलाताईंकडे तीन गाई असून त्यांचे शेण, मूत्राचा बायोगॅससाठी वापर केला जातो. स्लरी शेतामध्ये सेंद्रिय खत म्हणून वापरली जाते.

प्रमिलाताईंच्या मार्गदर्शनाखाली मुलगा ज्ञानेश्‍वर याने शेतीला नवी दिशा दिली आहे. गेल्या हंगामात दोन एकरामध्ये त्यांनी केळी लागवड केली. या लागवडीसाठी रोहयोतून त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले. केळी पिकाला ठिबक सिंचन केले आहे. केळीची २५ किलोपर्यंत रास मिळत आहे. सध्या काढणी सुरू झाली असून, परिसरातील व्यापाऱ्यांना विक्री केली जाते. केळीमध्ये सुरुवातीला आंतरपीक म्हणून काकडीची लागवड केली. त्यातून ८० हजारांचे उत्पन्न मिळाले. यामुळे केळी लागवडीचा काही प्रमाणात खर्च निघाला. काकडी लागवडीमुळे केळी पिकामध्ये प्राथमिक अवस्थेत, उष्णतेच्या काळात आद्रता मिळाली. परिणामी, केळी रोपांच्या वाढीसाठी फायदा झाला. शेतीमधील प्रयोगशीलतेमुळे ज्ञानेश्‍वर यांना कृषी विभागातर्फे पुरस्कार जाहीर झाला आहे.

घराजवळील अडीच एकर क्षेत्राचा काही भाग हा सखल असल्याने पावसाळ्यात पीक लागवड करणे अवघड जाते. तसेच विहिरीतील पाणीपातळी वर असल्याने त्यातील पाणी शेतात येत होते. त्यामुळे शेती पाणथळ झाली होती. यावर ढोरे यांनी उपाय शोधला. शेताला लागून असलेल्या नाल्यापर्यंत उताराच्या दिशेने पाइपलाइन करून विहिरीतील अतिरिक्त पाणी निचरा केल्याने जमीन पाणथळ होण्यापासून वाचली आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्येही पावसाळ्यातही पीक घेणे शक्य झाले आहे. शेती विकासामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची चांगली साथ मिळाली आहे.

ग्रामविकासामध्ये सहभाग

२० डिसेंबर २०२२ पासून प्रमिलाताई गावच्या सरपंच म्हणून काम करीत आहेत. त्यांनी गावशिवारात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. शिक्षण, पिण्याचे पाणी, सांडपाणी, घनकचरा, स्मशानभूमी, अंतर्गत रस्ते, नाल्या, शौचालयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. गावातील सांडपाणी हे शोषखड्डे तयार करून जागेवरच मुरवले जाते. शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यास स्वच्छ पाणी मिळण्यासाठी आरओ प्रकल्प बसविला आहे. शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम सुविधा आहे. गावशिवारातील सहा एकर शासकीय जागेवर फणस, आंबा, सीताफळ, साग आदी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. गावातील ग्रामपंचायतीच्या जमिनीवर कूपनलिका खोदून त्यावर सौरपंप बसविला आहे. त्यामुळे नवीन लागवड केलेल्या रोपांना ठिबक सिंचनाने पाणी देणे सोपे जाते.

गावशिवाराला मिळाली दिशा...

आर्थिक उत्पन्न वाढीच्यादृष्टीने ढोरे कुटुंबाने पारंपारिक पिकांपेक्षा फळबागा, भाजीपालावर्गीय पिकांकडे लक्ष केंद्रित केले. हीच बाब गावातील शेतकऱ्यांसाठी प्रेरक ठरली. ढोरे यांच्यासह परिसरातील शेतकरी कांदा बीजोत्पादनासाठी पुढे आले. कांदा पिकाच्या कडेने परागीकरणासाठी मोहरी लागवड केली जाते. यामुळे मधमाशांची संख्या वाढली, त्याचा कांदा बीजोत्पादनास फायदा झाला. तसेच भाजीपाला लागवड क्षेत्रामध्येही चांगली वाढ होऊ लागली आहे.

प्रमिला ढोरे, ९२७१२६२६१९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Production : सोयाबीन उत्पादन घटणार

Electricity Bill : सरसकट शेतीपंपांचे वीजबिल माफ करण्याची मागणी

Nuksan Bharpai : अतिवृष्टिग्रस्तांसाठी ५४८ कोटींवर निधीची गरज

Land Dispute : कोट्यवधींच्या सरकारी जमिनीची परस्‍पर विक्री

Diesel Smuggling : समुद्रात खुलेआम डिझेल तस्‍करी

SCROLL FOR NEXT