Mumbai News : वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या १७ पुरस्कारांची सोमवारी (ता. २४) घोषणा करण्यात आली. रोहोड (ता. साक्री, जि. धुळे) येथील कन्हैय्यालाल बहुउद्देशीय संस्थेची यंदाच्या सामाईक पुरस्कारासाठी तर उल्लेखनीय कृषी योगदान पुरस्कारासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कास्ट प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी अनुक्रमे एक लाख आणि ५१ हजार रुपये रोख सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे.
ज्येष्ठ कृषी पत्रकार आणि ‘सकाळ ॲग्रोवन’चे स्तंभलेखक श्रीकांत कुवळेकर यांना कृषी पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ३५ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, विश्वस्त आमदार इंद्रनील नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत घोषणा केली.
दरवर्षी वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असून १ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.
यंदा चार पुरस्कारांची वाढ करण्यात आल्याचे सांगत अध्यक्ष बारवाले म्हणाले, की कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घेण्यासाठी प्रतिष्ठानने पुरस्कारांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. ३५ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे सर्व पुरस्कारांचे स्वरूप आहे.
यंदा नागपूर येथील कॅप्टन डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री यांना शास्त्रज्ञ व साहित्य पुरस्कार, जळगाव येथील शेतकरी लुमकान इस्माइल शेख यांना कृषी निर्यात पुरस्कार तर नागपूरच्या कळमेश्वर येथील भीमराव कडू फलोत्पादन पुरस्कार, नाशिकच्या निफाड येथील भाजीपाला व रोपवाटिका संवर्धन पुरस्कार, सांगलीच्या जत येथील दगडू व कविता लोखंडे यांना दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन पुरस्कार, सांगोला, सोलापूर येथील वैजीनाथ घोंगडे यांना जलसंधारण पुरस्कार जाहीर करण्यात आला. पत्रकार परिषदेला सचिव दीपक पाटील, सीईओ शशिकांत तुळवे उपस्थित होते.
अन्य पुरस्कार असे...
जैवविविधता संवर्धन पुरस्कार : राजेश कुरुप, नाशिक
आधुनिक फुलशेती पुरस्कार : डॉ. भाग्यश्री पाटील, पुणे
आधुनिक कृषी यंत्र निर्मिती स्टार्टअप पुरस्कार : अजित खर्जुल, नाशिक
सामाजिक वनीकरण पुरस्कार : संजीव करपे, कुडाळ
शेतीकेंद्रीत ग्राम विकास पुरस्कार : मु. पो. परुळेबाजार, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग
नावीन्यपूर्ण शेतकरी पुरस्कार ः राहुल रसाळ, पारनेर, अहमदनगर
नैसर्गिक शेती पुरस्कार ः वासुदेव गायकवाड, पंढरपूर, सोलापूर
कडधान्य संवर्धन पुरस्कार : शरद पवार, वाळवा, सांगली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.