Pune news : आमच्या गावात पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी पीक विमा कंपनीची पोरं आली. तुमचं नुकसान जास्त दाखवतो, तुम्हाला जास्त पीक विमा भरपाई मिळेल, असे सांगून पैसे घेऊन गेले, असे अनुभव जालना, बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर, लातूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सांगितले. असे प्रकार सध्या राज्यात सगळीकडे दिसून येत आहेत.
गावाच्या वेशीपासून ते राज्याच्या राजधानीपर्यंत एकच चर्चा सुरु आहे, ती म्हणजे पीक विम्याची. विमा कंपन्यांचे प्रतिनिधी गावागावात जाऊन नुकसानीचे सर्वेक्षण करत आहेत. एकतर आता शेतकऱ्यांकडे जाऊन सर्वेक्षण करण्याला खूपच उशीर झाला. नियमाप्रमाणं १० ते १२ दिवसांमध्ये सर्वेक्षण व्हायला पाहिजे. नुकसान झालेल्या पिकाची परिस्थिती आता बदललेली असू शकते. मग तुमचे नुकसान दिसत नाही, ते लावण्यासाठी पैसे द्या. पैसे दिले नाही तर नुकसान कमी दाखऊ, जास्त नुकसान दाखवायचे असेल तर पैसे द्या, अशी अडवणूक विमा कंपनीचे प्रतिनिधी करत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या प्रकारामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले आहेत.
यासोबतच विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना नुकसान जास्त दाखवून जास्त भरपाई मिळवून देण्याचे अमिष दाखवतात. त्यामुळे अनेकदा शेतकरी स्वतःहून पैसे देतात, असंही काही शेतकऱ्यांनी सांगितलं. पण खरचं विमा कंपन्यांच्या या प्रतिनिधींना पैसे घेऊन जास्त नुकसान दाखवता येतं का? तर काही वेळा करता येतं. पण एकाच गावातील, तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील सर्वच पैसे देणाऱ्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान दाखवता येत नाही. सर्वच शेतकऱ्यांचं नुकसान जास्त दाखवलं तर कंपनीचं दिवाळं निघेल.
शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी काही लोकांचं नुकसान जास्त दाखवलं जातं. पण बहुतांशी शेतकऱ्याचं नुकसानीची टक्केवारी जास्त दाखवलं की क्षेत्र कमी दाखवतात. किंवा क्षेत्र जास्त दाखवलं की नुकसानीची टक्केवारी कमी दाखवतात. म्हणजे गणित एकच येतं. पण आम्ही पैसे दिले त्यामुळे आमचं नुकसान जास्त दाखवलं, असा समज शेतकऱ्यांचा होत असतो. या गैरप्रकारात काही लोकांना फायदा होतोही पण एकूण विचार केला तर शेतकऱ्यांची पिळवणुकच होते.
बरं विमा कंपनीच्या प्रतिनिधीने शेतकऱ्यांकडून पैसे घेतले तरी रितसर तक्रार होत नाही. याबाबत आम्ही कृषी आयुक्तालयाकडे चौकशी केली. शेतकऱ्यांनी अशा गैरप्रकाराला बळी पडू नये, असे आवहन कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे यांनी केले. पीक विमा योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी चांगला आधार ठरू शकते. या योजनेतील गैरप्रकार दूर व्हावेत ही जबाबदारी जशी सरकार, विमा कंपन्यांची आहे तशी आपलीही आहे. शेतकरी पैसे देतात म्हणून आम्ही घेतो, आम्ही पैसे घेतल्याची एखादी तक्रार दाखवा, अशी उत्तर या लोकांकडून मिळत असतात. प्रत्येक शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात भरपाई मिळावी यासाठी पीक विमा योजनेला चांगलं वळण देण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी एकतर अशा लोकांना पैसे देऊ नयेत आणि कुणी मागत असेल तर त्याची रितसर तक्रार करावी.
शेतकऱ्यांनी कुणालाही पैसे देऊ नयेत. कुणी पैसे मागत असतील तर शेतकऱ्यांनी रितसर त्याची तक्रार करावी. संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल. गुन्हेही दाखल करू.- विनयकुमार आवटे, सहसंचालक, कृषी आयुक्तालय, पुणे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.