फ्यूचर्स किमती ः सप्ताह ९ ते १५ डिसेंबर २०२३
Commodity Market : या सप्ताहात निर्यातीवर बंदी घातल्याने कांद्याचे (पिंपळगाव) भाव १२ डिसेंबर रोजी रु. ३,४०० वरून रु. २,४०० पर्यंत घसरले. सप्ताहअखेर ते रु. २,३०० पर्यंत आले. कांद्याच्या किमती पुरवठ्यावर अवलंबून असतात. पुरवठ्याविषयी (उत्पादन व साठा) माहिती पुरेशी व विश्वासार्ह नसल्याने किमतीच्या चढ-उतारांमध्ये भर पडते. हे चढ-उतार ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यात अधिक होतात कारण या कालावधीत रब्बीचा साठा संपत जातो व किमती सर्वस्वी खरीप पिकावर अवलंबून राहतात.
गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी देशातील आवकेत नोव्हेंबर व डिसेंबर (८ तारखेपर्यंत)मध्ये अनुक्रमे २९ व २१ टक्क्यांनी घट झाली. खरीप पिकातील तुटीच्या अंदाजामुळे (पिंपळगाव) किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेने ऑक्टोबरमध्ये ६३ टक्क्यांनी, नोव्हेंबरमध्ये १६२ टक्क्यांनी व डिसेंबरमध्ये (८ डिसेंबरपर्यंत) १३१ टक्क्यांनी वाढ झाली. अजूनही उशिराच्या खरिपातील उत्पादनाचा अंदाज नाही; पण ते गेल्या वर्षातील उत्पादनापेक्षा कमी असेल असे मानले जाते. याचा परिणाम किमती वाढण्यावर व त्यानंतर लादलेल्या नियंत्रणावर झाला आहे.
टोमॅटोच्या किमती या सप्ताहात त्या पुन्हा घसरून रु. १,५०० वर आल्या आहेत. या सप्ताहात कापूस, हळद, हरभरा व मूग यांच्या किमती घसरल्या. तुरीच्या किमती वाढल्या. सोयाबीन व मका यांच्या किमती स्थिर राहिल्या. मार्च-एप्रिलनंतरच्या कापूस, मका व हळदीच्या फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा वाढत्या आहेत.
८ डिसेंबर रोजी संपलेल्या सप्ताहातील किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.३ टक्क्याने घसरून रु. ५५,६६० वर आले होते. या सप्ताहात ते ०.९ टक्क्याने घसरून रु. ५५,१८० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स भाव १.१ टक्क्याने घसरून रु. ५६,६०० वर आले आहेत. मार्च फ्यूचर्स भाव रु. ५८,००० वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक आहेत
कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात २ टक्क्यांनी घसरून रु. १,४०२ वर आले आहेत. फेब्रुवारी भाव रु. १,५३० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५१९ वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा १३.७ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत.
मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) गेल्या सप्ताहात रु. २,२०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी घसरून रु. २,२०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जानेवारी डिलिव्हरी) किमती रु. २,२१६ वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स किमती रु. २,२४२ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.५ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहेत. मक्याची देशातील आवक वाढती असली तरी मागणीसुद्धा वाढत आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १३,१०७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.३ टक्क्यांनी वाढून रु. १३,४१३ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. १४,७५२ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १० टक्क्यांनी जास्त आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात २.९ टक्क्यांनी घसरून रु. ५,८७५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे.
मूग
मुगाची स्पॉट किमत (मेरटा) रु. ८,५०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) रु. ५,१०१ वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.
तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात १.४ टक्क्याने वाढून रु. ९,३०० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. गेल्या दोन महिन्यांत तुरीच्या किमती वाढत होत्या; मात्र त्या सध्या कमी होत आहेत.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.