Pune News : राज्याच्या डोंगरी भागातील भात आणि नाचणीच्या उत्पादनात घट येत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. डोंगरी भागात अतिपावसामुळे इतर पिके घेण्याचा पर्याय नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मदतीची याचना केली आहे. कृषी विभागाने मात्र नुकसानीचा दावा फेटाळत यंदा चांगल्या उत्पादनाचा दावा केला आहे.
कृषी आयुक्तालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात १५ लाख हेक्टरवर धान (भात) तर ७० हजार हेक्टरच्या पुढे नाचणीची लागवड झालेली आहे. धान व नाचणी उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाने प्रयत्न केलेले आहेत. तसेच, कीड, रोगांमुळे या पिकांची मोठी घट होत असल्याची स्थिती राज्यात नाही. काही तुरळक गावांमध्ये अपवादात्मक नुकसान असू शकते. उलट, या पिकांची उत्पादकता यंदा चांगली राहणार असून उत्पादनदेखील वाढण्याचा आमचा अंदाज आहे.
राज्यात यंदा शेतकऱ्यांनी नाचणीचा पेरा वाढवला होता. गेल्या पाच वर्षांमधील नाचणीचा पेरा बघता कृषी विभागाने नाचणीखालील सरासरी क्षेत्र ७८ हजार हेक्टर इतके निश्चित केले होते. यंदा पेरा मात्र वाढूनदेखील उत्पादन वाढणार नाही, असे शेतकऱ्यांना वाटते. यंदा नाचणीत ‘विल्ट’ हा बुरशीजन्य रोग आल्याचा अंदाज आहे. तो शेतभर पसरून त्यात पूर्ण पीक नष्ट होते.
पश्चिम घाटात हा रोग दिसून येत असून कृषी विभागाला त्याचा पत्ता नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.शास्त्रज्ञांच्या मते, डोंगरी भागात धानाची काळजी घेणारा शेतकरी नाचणीला मात्र दुय्यम पीक मानतो. त्यामुळे नाचणीत प्रतिबंधक उपाय किंवा खुरपण्या केल्या जात नाही. यंदा पाऊस, गरम व दमट हवामानाची स्थिती होती.
परिणामी, मर रोग पसरला असावा. राज्यात नाचणीचे उत्पादन यंदा ८८ हजार टनाच्या पुढे राहील, असे आधी गृहीत धरण्यात आले होते. तसेच, उत्पादकता प्रतिहेक्टरी ११२४ किलोच्या पुढे जाईल, असे वाटत होते. परंतु, नाचणी उत्पादक पट्ट्यातील स्थिती बघता उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे.
कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात धानाच्या उत्पादनातदेखील घट अपेक्षित आहे. परंतु, कृषी विभागाने ते मान्य केलेले नाही. विधानसभा निवडणुका आणि बदल्या, बढत्यांमुळे अस्थिर असलेल्या कृषी विभागाने यंदा पीक संरक्षणाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे. राज्यात २०२३-२४ मधील हंगामात ३५.८९ लाख टन धानाचे उत्पादन झाले होते.
आमच्या पहिल्या अंदाज अहवालानुसार, यंदा (२०२४-२५) मात्र धानाचे उत्पादन घटून ३४ लाख टनाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांमधील धानाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी २०२८ किलोच्या आसपास येत असते. यंदा उत्पादकता घटणार आहे.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, राज्यात सर्वसाधारणपणे भाताला उपयुक्त स्थिती होती.
मात्र, घाट क्षेत्रातील डोंगराळ भागात तपकिरी तुडतुड्यांनी शिरकाव केला. यामुळे काही भागात उत्पादकता निश्चितच घटू शकते. कारण, गेली तीन हंगाम तपकिरी तुडतुडा दिसला नव्हता. या रसशोषक किड्यांच्या प्रादुर्भावामुळे पिके जळून गेल्यासारखी दिसू लागली आहेत. कृषी विभाग व कृषी विद्यापीठांनी या किडीबाबत शेतकऱ्यांना सावध केले होते.
परंतु पीक कापणीला आल्यामुळे आता फवारणीचा खर्च नको,’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी बांधला. परंतु, त्यामुळेच काही भागात किडींमुळे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, धानावर यंदा मध्येच ऊन व पुन्हा पाऊस या स्थितीमुळे कडा करपा रोग आला होता. परंतु, शेतकऱ्यांनी त्यावर वेळीच उपाय केल्यामुळे नुकसान झाले नाही, असे निरीक्षण वडगाव मावळच्या कृषी संशोधन केंद्राने नोंदवले.
भातावर यंदा कापणीच्या टप्प्यात तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे काही गावांमध्ये या कीडीमुळे उत्पादनात घट शक्य आहे.डॉ. नरेंद्र काशिद, प्रभारी अधिकारी, वडगाव मावळ कृषी संशोधन केंद्र, पुणे
नंदुरबारपासून ते कोल्हापूरच्या सह्याद्री पर्वतरांगेत डोगर उतारावर नाचणी पिकवली जाते. दमटपणा व पावसामुळे काही भागात बुरशीजन्य मर रोग पसरून नाचणीचे नुकसान झाले आहे. नुकसानीबाबत पालघर, भोर भागातून तक्रारी येत आहेत. मात्र, कोल्हापूर भागात रोग आढळून आलेला नाही.डॉ. योगेश बन, प्रकल्प प्रमुख, नाचणी संशोधन केंद्र, कोल्हापूर
आम्ही वडिलोपार्जित भात, नागली व वरईची शेती करतो आहोत. यंदा कष्टाने पेरलेली चार एकरांवरील नाचणी व वरई जळून गेली आहे. शासनाने आमची दखल घ्यावी.शेतकरी रामभाऊ खंडु जाधव, सांगवी वेखो, पोष्ट पांगरी, ता. भोर, जि. पुणे
माझी दोन एकर भातशेती होती. यंदा उत्पादन निम्मे आले आहे. आमच्या गावातील बहुतेक शेतकऱ्यांना यंदा भाताचा उतारा कमी मिळतो आहे.लक्ष्मण कचरे, भात उत्पादक, बोपेगाव, ता. भोर, जि. पुणे
माझी दोन एकर भातशेती होती. यंदा उत्पादन निम्मे आले आहे. आमच्या गावातील बहुतेक शेतकऱ्यांना यंदा भाताचा उतारा कमी मिळतो आहे.लक्ष्मण कचरे, भात उत्पादक, बोपेगाव, ता. भोर, जि. पुणे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.