Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstorm Crop Damage : नाशिकमध्ये गारपिटीमुळे शिवारात उरले फक्त पिकांचे अवशेष

मिरचीचा पहिला तोडा करून बाजारात भाजीपाला नेला होता. दर चांगले असल्याने दोन पैसे होतील अशी अपेक्षा होती. मात्र गारपीट सुरू झाली आणि काही क्षणातच सर्व कोलमडलं.

मुकुंद पिंगळे

Nashik Weather News : एकीकडे पदरमोड करून भांडवल उभं केलं, पाण्याची सोय करण्यासाठी कर्ज काढून पाइपलाइन केली. आता ७ ते ८ प्रकारची वेगवेगळी भाजीपाला पिके केली. मात्र सिंचनासाठी दिवसा कधी लाइट मिळालीच नाही, त्यामुळे रात्रीचा दिवस करून पिकांना पाणी दिले.

मिरचीचा पहिला तोडा करून बाजारात भाजीपाला नेला होता. दर चांगले असल्याने दोन पैसे होतील अशी अपेक्षा होती. मात्र गारपीट सुरू झाली आणि काही क्षणातच सर्व कोलमडलं. आज आठ दिवस झाले अन्नाचा घास गोड लागत नाही.

शेतात जाण्याची इच्छासुद्धा उरली नाही. लाखो रुपये गुंतवून पिके उभी केली. मात्र गारपिटीने फक्त पिकांचे शेतात पिकांचे सांगाडे उरले आहेत, अशी विवंचना शेणीत (ता. इगतपुरी) येथील तरून प्रयोगशील शेतकरी गोकूळ जाधव यांनी मांडली.

रविवार (ता. ९) रोजी रात्री ८ वाजता टपोऱ्या आकाराच्या गारा पडल्या. सकाळी ८ वाजता त्या गारा वितळल्या. गारांचा आकार मोठा असल्याने फटक्यात सर्वच पिके घायाळ झाली. भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात शेणीत, बेलू, साकुर, नांदगाव परिसरात होत्याच नव्हतं झालं.

गारांचा मार बसल्याने फळ व पालेभाज्या पिकांची नासाडी झाली आहे. आता या शिवारातून वास येऊ लागला आहे.गत खरीप हंगामात भाजीपाला पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. मात्र त्यातून सावरून शेतकरी पुन्हा उभे राहिले.

बँका अर्थसाह्य करत नसल्याने घरोघरी शेतकऱ्यांनी सोने तारण ठेवून कर्ज घेऊन उन्हाळी भाजीपाला लागवडी केल्या होत्या. मात्र हातात दोन पैसे येण्यापूर्वीच अस्मानीचा घाला शेतकऱ्यांचे संकट ठरत आहे.

आता हातात काहीच भांडवल शिल्लक नाही. मशागत करण्याचीसुद्धा इच्छाच राहिली नाही, अशी विवशता शेतकऱ्यांनी मांडली.

पंचक्रोशीत कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, भेंडी, कांदा, मधू मका, कारले, दोडके, काकडी, कलिंगड, खरबूज, वांगी यासह कोथिंबीर, पालक, मेथी या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनी केलेली चारा पिके खराब झाली आहे.

अनेक ठिकाणी भाजीपाला लागवड उध्वस्त झाल्याने परिसरात भयाण शांतता आहे. या भागात कधी नव्हते एवढे मोठे संकट शेतकऱ्यांवर आले आहे.

दुःख सांगताना आईच्या डोळ्यांत पाणी...

‘‘सोन्यासारखे पीक लेकराने उभे केलं. कामात तहान भूक विसरून जाऊन राबायचं. दिवसा लाइट नसल्याने बिबट्याची भीती असूनसुद्धा शेतात रात्री बेरात्री जाऊन पाणी भरण्यासाठी जायचा. मात्र पिकवलेला शिवार एका रात्रीतून भुईसपाट झाला.

यापूर्वी ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले होते. त्यातून सावरलो. आता ७ ते ८ पिकांचे नुकसान झाल्याने हातातून सर्वच काही गेलं आहे, आमच्यावर आभाळ कोसळलं.’’ अशी हेलावून टाकणारी प्रतिक्रिया गोकूळ यांच्या आई सौ. लता प्रकाश जाधव यांनी दिली.

गेल्या १०० वर्षांत असं संकट नाही...

आमचे आई वडील सांगायचे, असे नुकसान कधीच झाले नाही. गेल्या १०० वर्षांत कधीच एवढे मोठे संकट आले नव्हते. इतक्या गारा कधीच पडल्या नाही. या गारा तीन दिवस राहिल्या. सारं बागायत क्षेत्र वाया गेले आहे. भात काढणी झाल्यानंतर त्या भांडवलावर भाजीपाला पिके घेतो.

मात्र यंदा उन्हाळी भाजीपाला पिके घेऊनही पुन्हा एकच पिकावर आलो आहोत. हातातून सगळे निघून गेले आहे, असे कातरत्या आवाजात साकुर (ता. इगतपुरी) येथील नुकसानग्रस्त शेतकरी केरू कोंडाजी सहाणे यांनी सांगितले.

...अशी आहे भीषण परिस्थिती

- गारपिटीने कांद्याची पात तुटली, मार बसल्याने कांद्याला पातच नाही. तर काढणीपूर्वीच वाफ्यात कांद्याची सड

- टोमॅटो लागवडी गारांच्या फटक्यात पूर्णतः उद्‍ध्वस्त, काही शेतकऱ्यांनी लागवडी उपटून टाकल्या

- मधुमका, वेलवर्गीय पिकांचे फक्त अवशेष शेतात उभे

- शेडनेट, पॉलिहाउसवर गारांचा खच साचल्याने जवळपास १० ते १५ ठिकाणी ते जमीनदोस्त होऊन नुकसान

- काढणीस आलेला शेतीमाल गारांच्या फटक्यात खराब झाल्याने सड होऊन आता वास सुटल्याने जनावरेही शेतात येईनात.

- मोठ्या प्रमाणावर भांडवल वाया गेल्याने आता पुढील मशागत व शेती कामे ठप्प

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachhu Kadu : शेतकरी प्रश्‍नांना बगल देत धार्मिक, जातीय मुद्यांचा वापर

Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

SCROLL FOR NEXT