Fodder Species Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Cultivation : पौष्टिक चारा पिकांची लागवड

Team Agrowon

प्रमोदकुमार ताकवले, राहुल काळे

Fodder Production : उन्हाळी हंगामामध्ये हिरव्या चाऱ्याचा तुटवडा जास्त प्रमाणात दिसून येतो. हे लक्षात घेऊन उन्हाळी हंगामामध्ये पुरेशा हिरव्या चाऱ्यासाठी संकरित नेपियर, बाजरी, कडवळ, मका, चवळी या चारा पिकांच्या सुधारित जातींची लागवड करावी.

ज्वारी (कडवळ)

या पिकामध्ये ८ ते ९ टक्के प्रथिने तसेच २० ते २५ टक्के शुष्क पदार्थ असतात. हलकी जमीन व कमी पाणी अशा भागामध्ये ज्वारीची लागवड करावी. या पिकाची उत्तम वाढ होऊ शकते.

पेरणी पद्धतीने लागवड करण्यासाठी हेक्टरी ४० ते ५० किलो बियाणे वापरावे. लागवडीसाठी सीओएफएस- २९ सीओएफएस - ३१, मालदांडी, फुले रुचिरा, फुले गोधन या जातींची निवड करावी.

हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश खताची मात्रा द्यावी. दोन ओळींतील अंतर २५-३० सेंमी ठेवून पेरणी करावी. पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे.

पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये हायड्रोसायानिक ॲसिड हे विषारी द्रव्य असल्याने कापणी ४५ दिवसांच्या आत करू नये. पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना म्हणजेच पेरणीपासून ८५ ते ९० दिवसांनी कापणी करावी. बहुवर्षायू ज्वारीची पहिली कापणी पेरणीपासून ५० ते ५५ दिवसांनी जमिनीपासून ४ ते ५ इंच अंतर ठेवून करावी. नंतरच्या कापण्या ४५ ते ५० दिवसांनी कराव्यात. योग्य प्रकारे नियोजन केलेल्या ज्वारीपासून हेक्टरी ४० ते ४५ टन हिरवा चाऱ्याचे उत्पादन मिळते.

चवळी

हे द्विदल वर्गातील चाऱ्याचे उत्तम पीक आहे. ५५ ते ६० दिवसांत हे पीक घेता आहे. याचा चारा पालेदार, मऊ आणि सकस असतो. हिरव्या चाऱ्यामध्ये १६ ते १८ टक्के प्रथिने असतात. चवळी हे संपूर्ण पीक घेण्यास उत्तम आहे तसेच मिश्रपीक म्हणून मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या एकदल चारा पिकांतही घेता येते. चवळीचे बेवडही उत्तम असल्याने नंतरचे पीक जोमदार येते.

हेक्टरी ४० किलो बियाणे लागते. इतर एकदल वर्गीय पिकांमध्ये उदा. मका, ज्वारी, बाजरी मिश्रपीक म्हणून पेरणी करावयाची झाल्यास हेक्टरी २० किलो एवढे बी मिसळावे. मिश्रपीक पेरावे किंवा पेरताना एकदल पीक आणि चवळीचे २:२ ओळी हे प्रमाण ठेवावे.

लागवडीसाठी ईसी-४२१६, युपीसी-९२०२ या जातींची निवड करावी.

पेरणीनंतर ५५ ते ६० दिवसात कापणी करावी. हेक्टरी ३० ते ३५ टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

संकरित नेपियर

भरपूर उत्पादन आणि वर्षभर हिरवा चारा देणारे हे पीक आहे. हे गवत बहुवर्षायू, जास्त उत्पादन, जलद वाढणारे आहे. एकदा लागवड केल्यास हे पीक ४ ते ५ वर्षांपर्यंत उत्पादन देते.

लागवडीसाठी बाएफ संकरित नेपियर १०, बाएफ संकरित नेपियर-११, फुले यशवंत या जातींची निवड करावी. लागवड कांड्यापासून अथवा ठोंबापासून करतात. त्यासाठी हेक्टरी १८,००० ते २०,००० बेणे लागते. लागवड सरी वरंबा पद्धतीने करावी. दोन सरीतील अंतर हे ३ फूट ठेवून सरीच्या बगलेत एका बाजूला जमिनीत २ ते ३ इंच खोल २ फुटांच्या अंतराने लावावे.

लागवडीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी.

लागवडीपासून ७० ते ७५ दिवसानंतर पीक कापणीस तयार होते. त्यानंतरच्या कापण्या ४५ ते ५० दिवसांनी कराव्यात. हे बहुवार्षिक गवत असल्याने कापणी करताना २ ते ३ इंच जमिनीपासून वर कापावे. दर तीन ते चार कापणीनंतर ४० किलो नत्राची मात्रा द्यावी. या गवतापासून वर्षभरात ६ ते ७ कापण्या मिळतात. हेक्टरी १२० ते १५० टन हिरवा चारा मिळतो.

मका

हिरव्या चाऱ्याच्या निर्मितीसाठी बागायती भागामध्ये लागवडीसाठी योग्य आहे. हे पीक जोमाने वाढणारे, भरपूर उत्पादन देणारे, जनावरांच्या आवडीचे आहे.

यामध्ये २० ते २२ टक्के शुष्क पदार्थ आणि ९ ते १० टक्क्यांपर्यंत प्रथिने मिळतात. हे पीक मुरघास बनविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे लागते. आफ्रिकन टॉल, जे - १००६, सीओएचएम-८ या जातींची लागवड करताना दोन ओळींतील अंतर ३० सेंमी ठेवावे. हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश अशी खत मात्रा द्यावी.

कापणी साधारणतः पेरणीपासून ७० ते ७५ दिवसांपर्यंत पीक फुलोऱ्यात असेपर्यंत करावी. योग्य वेळी कापणी केल्यास हेक्टरी ५५ ते ६० टन हिरवा चारा मिळतो.

बाजरी

हे एकदल वर्गातील हिरवा चारा देणारे उत्तम पीक आहे. हा चारा पौष्टिक असतो.

चारा पालेदार, रसाळ, गोड, लव विरहित, मऊ, उंच वाढणारा, भरपूर फुटवे असणारा आहे. ५ ते ६ महिन्यांच्या कालावधीत तीन कापण्या मिळून भरपूर व चांगल्या प्रतीचा चारा मिळतो.

मार्च महिन्यात पेरणी करावी. ज्वारी व मक्यापेक्षा बाजरीला कमी पाणी लागते, जास्त उत्पादन मिळते.

हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी.

बाजरीचा हिरवा चारा तसेच वाळलेला चारा पौष्टिक असतो. यामध्ये ८.५ ते ९.५ टक्के प्रथिने असतात. मुरघास चांगला तयार होतो. दोन कापण्यांपासून हिरवा चारा आणि तिसऱ्या कापणीपासून धान्य आणि वाळलेला चाराही मिळतो.

हेक्टरी १० किलो बियाणे लागते. दोन ओळींतील अंतर ३० सेंमी ठेवून पेरणी करावी. लागवडीसाठी बाएफ बाजरा- १, बाएफ बाजरा-५, बाएफ बाजरा-६ या जातींची लागवड करावी.

चाऱ्यासाठी पहिली कापणी पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना म्हणजेच पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी करावी. खोडव्याची वाढ जोमदार होण्यासाठी पिकाची कापणी जमिनीच्यावर चार ते सहा इंच ठेवून करावी. दुसरी व तिसरी कापणी, पहिल्या व दुसऱ्या कापणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी करावी.

पिकाची उत्तम निगा ठेवल्यास पहिल्या कापणीतून हेक्टरी ५० ते ५५ टनापर्यंत हिरवा चारा मिळतो. नंतरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कापणीपासून हेक्टरी ३५ ते ४० टन हिरवा चारा मिळतो. अशाप्रकारे १५० ते १६० दिवसांत तीन कापण्यांपासून एकूण हेक्टरी १२० ते १३० टन हिरवा चारा मिळतो.

राहुल काळे, ७०२०११६४९४

(मध्यवर्ती संशोधन केंद्र, बाएफ, उरुळीकांचन, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT