Nagar News : संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील जनावरांना मुबलक प्रमाणात चारा मिळेल, यादृष्टीने चाऱ्याचेही नियोजन करण्यात यावे. ज्या भागामध्ये जनावरांसाठी चाऱ्याची आवश्यकता भासणार आहे, त्या ठिकाणी चाराडेपो सुरू करण्यात यावेत.
गावनिहाय टंचाई निवारणाचा आराखडा तयार करण्यात येऊन प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या एसओपीचे तंतोतंत पालन करावे, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टंचाई आढावा बैठकीत दिले. टंचाईग्रस्त गावांना पाणी साठवणीसाठी टाक्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. २२) टंचाई परिस्थितीवर करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार राम शिंदे, प्राजक्त तनपुरे, मोनिका राजळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी प्रमुख उपस्थित होते. आमदार बबनराव पाचपुते हेही दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झालेला आहे. आगामी काळात संभाव्य टंचाईसदृश परिस्थितीच्या निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे. टंचाईसदृश्य परिस्थितीमध्ये टंचाई असलेल्या गावातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळावे, यासाठी पाणी वितरणाचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावे.
पाणी वाटपावेळी गावामध्ये तलाठी व ग्रामसेवकांनी उपस्थित राहून प्रत्येक नागरिकाला पाणी मिळेल यादृष्टीने कार्यवाही करावी. पाणीपुरवठ्यासाठी पाणी उद्भव निश्चिती करण्याबरोबरच उद्भवातील पाणी वापरण्यासाठी योग्य आहे, काय याबाबत पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात यावी.
पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरची आतून नियमितपणे स्वच्छता करण्यात यावी. नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याच्यादृष्टीने पाणी शुद्धीकरणासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावेत. उद्भवातून घेण्यात आलेले पाणी गावातील विहिरीमध्ये न टाकता गावांना पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देण्यात याव्यात.
या वेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने सूचना केल्या आहेत. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित होते
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.