Latur News: यंदा मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे अवैध मार्गाने खत विक्री करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. खरिपासाठी शेतकऱ्यांना आवश्यक खते घरपोच देण्याच्या नावाखाली काही खत विक्रेते व कंपन्या बेकायदा खतांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
त्या आधारे जिल्हा परिषदेतील मोहीम कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांच्यासह संबंधित कृषी विभागाच्या पथकाने निलंगा तालुक्यातील निटूर व खडक उमरगा शिवारात धाड टाकली. यात विविध प्रकारच्या मात्रा असलेले खत, १ लिटर व १०० मिली लिक्विड असलेल्या रसायनाचे ४८ नग आणि वाहतूक करणारी वाहने असा एकूण ११ लाख ७८ हजारांचा माल जप्त केला.
संबंधित कंपनी प्रतिनिधींसह वाहनचालकांविरुद्ध पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, रासायनिक खते उत्पादन कंपनीच्या प्रतिनिधीने संबंधित अधिकृत खत व रसायने विक्री करणाऱ्या परवानाधारक दुकानदारांना या मालाची विक्री न करताच त्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे.
निलंगा पंचायत समितीचे कृषी अधिकारी नाथराव रामभाऊ शिंदे यांना तालुक्यातील निटूर व खडक उमरगा शिवारात अवैधरित्या रासायनिक खत विक्री वाहनाच्या माध्यमातून केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी मोहीम अधिकारी बिडबाग यांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर बिडबाग यांनी तालुका कृषी अधिकारी एन. एन. कुटवाड, निलंगा पंचायत समितीचे कृषी सहायक ए. बी. गोसावी यांच्या मदतीने शनिवारी (ता. ३०) दुपारी निटुर व खडक उमरगा शिवारात छापा टाकला. यात एक ट्रक व टेम्पोतून खताची बेकायदा विक्री सुरू असल्याचे आढळून आले. सम्राट ॲग्रो इंडस्ट्रीज, गट क्रमांक ३१५/१, चिंचोली एमआयडीसी ५ वे क्रॉस
इंडस्ट्रियल एरिया सोलापूर, इन्व्हाईस क्रमांक ००६ असे नाव असलेला रासायनिक खतांच्या ५० किलो वजनाच्या ४६ बॅग (किंमत ४३ हजार ९३० रुपये), वरुण बायोपोटॅश (डीपीएम) ४ बॅग (किंमत ४ हजार ३२० रुपये), इंडोसील - ७० (इंडो सिलिकॉन ग्रॅन्यूल) ३२ बॅग (किंमत २८ हजार ८०० रुपये), सुरक्षा सइल कंडिशनर (भू सुधार पावडर) ११ बॅग (७ हजार ४८० रुपये), सोया तूर स्पेशल (बायोएक्स ट्रॅक अँड मायक्रो न्यूट्रिएंट लिक्विड) १ लिटरचे ३५ नग (किंमत ६१ हजार २५० रुपये),
८ जर्मीनेट (अन इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट) १०० मिली १३ नग (किंमत ५ हजार ८५० रुपये) तसेच प्रोम - ४० बॅग (सिल कंडिशनर/ भू सुधार पावडर) १३ बॅग, ३ वरुण बायोपोटॅश (डीपीएम) १७ बॅग (किंमत १ लाख २६ हजार ४५० रुपये) तसेच ट्रक व टेम्पोसह एकूण ११ लाख ७८ हजार ८० रुपयांचा माल पंचासमक्ष पंचनामा करून जप्त केला. तसेच खताचे नमुने विश्लेषणासाठी लाख
सील मोहर बंद केला आहे. तालुका कृषी अधिकारी नाथराव रामभाऊ शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाकुर तालुक्यातील डोंग्रज येथील टेम्पो वाहनचालक मोहसीन मुंजेवार, शिरूर तालुक्यातील आरी येथील वाहनचालक विशाल आरीकर तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे कुमठे येथील येथील कंपनी प्रतिनिधी सज्जन गावडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.