१) खानदेशात पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड (Jalgaon News)
पावसाळा लांबल्यामुळे आधीच उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच त्यातच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने पिकांची स्थिती बिकट होत आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यांत ही समस्या कायम आहे.
त्यामुळे संतप्त झालेल्या जळगाव जिल्ह्यातील फुपनगरी येथील शेतकऱ्यांनी याप्रश्नी जळगाव येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी जळगावात धडक दिली.
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या तळोदा तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून, बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच केळी, पपई, ऊस, कापूस यांसारख्या नगदी पिकांवर अधिक भर देतात. पावसाळा लांबल्याने उकाड्यात मोठ्या प्रमाणावर भर झाली आहे.
२) जळगाव जिल्ह्यात धरणांतून शेतीसाठी पाणी बंद (Water Dam)
जळगाव अद्याप जिल्ह्यात मॉन्सून दाखल झाला नाही. यामुळे जिल्हा प्रशासन पाणी टंचाईबाबत अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर प्रकल्पाचे सर्व दरवाजे बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले असून, त्यानुसार सर्व दरवाजे बंद करण्यात आले.
जिल्ह्यातील अतितापमानाने विहिरींची पाणी पातळी घटली आहे. बोदवड, यावल, भुसावळ आणि जामनेर तालुक्यांतील भूजल पातळीत ०.३५ मीटरने घट झाली. यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी आता केवळ पिण्यासाठी आरक्षीत आहे.
धरणाचे काही गेट सुरू होते. मात्र, तेही आता बंद करण्यात आले आहेत. सिंचन प्रकल्पातील पाणी ऑगस्टपर्यंत पुरले पाहिजे, त्या अनुषंगाने उपाययोजना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.
३) धुळे जिह्यात पाणीटंचाईचे सावट (Water Shortage)
धुळे जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पांत केवळ २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी या काळात २३ टक्के जलसाठा होता. अक्कलपाडा प्रकल्पातही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३.०४ टक्के जलसाठा कमी झाला आहे.
अनेक लघू प्रकल्पांतही जलपातळी घटल्याने पाऊस लांबल्यास चिंता वाढणार आहे. त्यामुळे पाण्याची बचत आवश्यक आहे. अर्थात, टंचाई निवारणासाठी विविध प्रकल्पांतून पाणी सोडले आहे,
त्यामुळे देखील या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट झाल्याचे दिसते. दरम्यान, सुलवाडेत दोन टक्के, करवंदमध्ये ५.०४, तर सोनवद प्रकल्पांत यंदा तुलनेने १०.१७ टक्के जलसाठा अधिक आहे.
४) नंदुरबार जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे पूर्ण (Crop Damage Suevey)
नंदुरबार जिल्ह्यातवादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त भागात महसूल व कृषी विभागाच्या पथकाने पंचनामे पूर्ण केले आहेत. त्यात शहादा व तळोद्यातील केळी पिकाचे सुमारे ५०० हेक्टरवर नुकसान झाले आहे.
तळोदा तालुक्यातील सुमारे दीडशे हेक्टरवरील केळी पिकाचे तर जवळपास चारशे घरांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. पंचनामे पूर्ण झाल्याने आता प्रशासनाने संबंधितांना त्वरित नुकसान भरपाई मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, अशी आशा नुकसानग्रस्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
५) पूर्वहंगामी कापूस लागवडी संकटात (Cotton Cultivation)
खानदेशात पाऊस लांबल्याने कोरडवाहू कापसाची लागवड सुरू झालेली नाही. तसेच पूर्वहंगामी कापूस पिकालाही उष्णतेचा फटका बसत आहे. खानदेशात ९० टक्के पूर्वहंगामी कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. ही लागवड सुमारे सव्वालाख हेक्टरवर आहे. सकाळपासून उष्णता असते. रात्री १० पर्यंत उष्ण वारे वाहतात.
कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसवरच आहे. यामुळे पिकाची स्थिती हवी तशी नाही, कापूस उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. वाढत्या उष्म्यामुळे मुळात नाजूक असलेले हे पीक मुबलक पाण्याअभावी करपत आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी लागवड केली, मात्र पावसाने पाठ फिरविल्याने ते संकटात सापडले आहेत.
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उन्हाच्या तीव्रतेमुळे कापसाची कोवळी रोपे करपू लागली आहेत. ठिबकचा उपयोग कमाल शेतकऱ्यांनी केला आहे. पण विजेचा पुरवठा व्यवस्थित नसतो. अनेकांची जमीन हलकी, मुरमाड आहे. अशा क्षेत्रात सिंचनास काही तास विलंब झाल्यास कोवळे कोंब होरपळतात.
रोपे होरपळण्याचे प्रमाण २० ते २५ टक्के आहे. त्यात नांग्या भरण्यासाठी बियाणे आणावे लागत आहे. एक एकरात सव्वा पाकिटे बियाणे यामुळे यंदा लागत आहे. यात उत्पादन खर्च वाढला आहे. अनेकांच्या कूपनलिका आटत आहेत. अमळनेर, पारोळा, धुळ्यातील धुळे, शिंदखेडा भागांत जलसाठे मुबलक नाहीत. यामुळे नवी अडचण तयार होत आहे. मुरमाड क्षेत्रात रोज सिंचन करावे लागते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.